आरक्षण की मृगजळ ?

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रो-कबड्डीप्रमाणेच प्रो-दही हंडीला ही खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.तसेच दहीहंडीला आता खेळाचा दर्जा मिळाल्यामुळे गैविंदानाही आता शासनाच्या इतर सुविधांचाही लाभ देण्यात येईल अशी घोषणा केली आहे.त्यानुसार आता दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना गोविंदा पथकातील खेळाडूंचा दुर्घटना झाली तर अशा गोविंदांना व त्यांच्या नातेवाईकांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजनाही आखण्यात आली आहे. त्यानुसार दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य,दहीहंडीच्या मानवी मनो-यावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य, एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य मिळणार आहे.वास्तविक दहीहंडी हा प्रकारच मुळात विशिष्ट धर्माशी संबंधित धार्मिक उत्सव असल्याने निधर्मी सरकारने यात आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदविण्याचे काम नाही.हे काम संबंधित खेळ/उत्सव आयोजित करणा-याचे आहे.

नव सरकार आहे सगळीकडे बदनाम झाल्यामुळे जनतेत लोकप्रिय होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असेल इथपर्यंत ठीक आहे . परंतु प्रशासनाचा अनुभव नसताना आणि दही हंडी हा काही राष्ट्रीय खेळ नसताना केवळ आणि केवळ बेगडी हिंदुत्वाची झापडे डोळ्याला लावल्यामुळे कुठलाही सारासार विचार न करता याविषयी घेतलेला आरक्षणाचा निर्णय मात्र सरकारची अपरिपक्व आणि दयनीय अवस्था दर्शविणारी आहे.

हा आदेश केवळ या वर्षीसाठी लागू असला तरी मानवी मनो-याच्या मृत आणि अपंगत्व आलेल्यांसाठी शासकीय नोकरीत 5 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा केली गेली आहे.
मुळात प्रो-कबड्डी प्रमाणे प्रो-दहीहंडी हा निर्णयच सपशेल चुकीचा आहे.कारण दहीहंडी हा उत्सव राहिलेला नाही. गटबाजी आणि स्थानिक सत्ता संघर्षात शक्ती प्रदर्शन दाखविणा-यांचे ते एक माध्यम बनलेले आहे.अन्यथा गोविंदांच्या जिवाची पर्वा न करता दहीहंडीसाठी कोट्यावधी रुपयांची बोलीच लागली नसती.शासकीय नोकरीत 5 टक्के आरक्षण जाहीर केले गेले असले तरी गोविंदा पथकात हवशे नवशे गवशे असे अनेक गोविंदा असतात आणि त्या सर्वांच्याच जीवाची जोखीम असते. त्यामूळे त्यांना विमा संरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे.मात्र या सगळ्या गोविंदा मधून आरक्षण कुणाला आणि कसे दिले जाणार आहे. हा एक मोठा गूढ प्रश्न आहे.
मानवी मनो-यावरील वरच्या थरावर चढतो त्याला , प्रत्यक्ष हंडी फोडतो त्याला, मनो-यातील मधल्या थरातील गोविंदांना की एकदम सुरुवातीला पाया मजबूत करतात त्या गोविंदांना ? याबद्दल कुठलेच स्पष्ट निर्देश दिले गेले नाहीत.

गोविंदा मग तो अगदी वर चढलेला असो की त्याला वर उंचावर जाण्यासाठी खाली तळाशी उभे राहून भक्कम अशी फळी तयार करणारा गोविंदा असो सगळ्यांची श्रेणी सारखी आणि तितकीच महत्वाची असते खालच्या शिवाय मधले आणि मधल्या शिवाय वरचे आणि या सर्वांशिवाय दहीहंडी फोडणा-याचे कुणाचेच काही चालत नाही. म्हणजे ते सगळे एकमेकांना पूरक असतात. त्यामुळे आरक्षण द्यायचेच झाले तर संपूर्ण गोविंदा पथकाला दिले जाणार आहे का ? अन्यथा खेळाडूंना आंदोलक म्हणून रस्त्यावर उतरून राजकारण करायला भुकेले पुढारी तयारच असणार आहेत. मग आट्यापाट्या,सूर- पारंब्या,गोट्या, कॅरम पब्जी खेळणारे इतर खेळाडू प्रतिक्षेत आहेतच !

✒️विठ्ठलराव वठारे(अध्यक्ष,जन लेखक संघ,महाराष्ट्र)
joshaba1001@gmail.com

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED