राणी दुर्गावती कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंताचा सत्कार सोहळा संपन्न

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.24ऑगस्ट):-नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे जिल्हा शाखा- गडचिरोली आणि सायकल स्नेही मंडळ यांच्या विद्यमाने राणी दुर्गावती कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत गौरव समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाप्रमुख डॉ चंद्रकांत लेनगुरे, शाळेचे पर्यवेक्षक पुरूषोत्तम ठाकरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. देवानंद कामडी उपस्थित होते.

याप्रसंगी इयत्ता दहावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थिनींचा काव्यमंचाच्या वतीने सन्मानपत्र व ग्रंथभेट देऊन यथोचित गौरव करण्यात आला. डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांनी गुणवंत विद्यार्थिनींचे कौतुक करून कविता कशी लिहावी याबाबत उत्तम भाष्य केले. प्रा. कामडी यांनी काव्यमंच द्वारा राबविण्यात येत असलेल्या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून लेखनकलेबाबत विचार मांडले. डॉ. चंद्रकांत लेनगुरे आणि पुरूषोत्तम ठाकरे यांनी सादर केलेल्या, कवितांना उत्तम प्रतिसाद मिळाला.

प्रास्ताविक पुरूषोत्तम ठाकरे यांनी केले. यावेळी बंडोपंत बोढेकर म्हणाले की,”कवींच्या सन्मानासाठी झटणाऱ्या नक्षत्राचं देणं काव्यमंचाचे राज्यव्यापी विविधांगी कार्य जनमनाला दिशादर्शक ठरले आहे. दहावीत गुणवंत ठरलेल्यांचा सत्कार केल्याने गुणवंतांसोबत इतरांनाही नवी उर्जा मिळत असते. ग्रामीण भागात असलेल्या साहित्यिक ऊर्जेचे सादरीकरण होणे गरजेचे आहे.‌विद्यार्थीवर्गात काव्य लेखन उर्मी दाटून यावी यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.‌संध्याताई येलेकर यांनी केले तर‌ आभार कु. प्राची भुरसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रकाश सोनवणे, धनराज ठेमस्कर, जितेंद्र रायपुरे आदींचे सहकार्य मिळाले. नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणेचे संस्थापक राष्टीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांच्या पुढाकाराने प्रत्येक जिल्हास्तरावर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत आहे, हे विशेष.

गडचिरोली, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED