वनश्री महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन

29

✒️वशीम शेख(विशेष प्रतिनिधी,कोरची)मो:-9404925488

कोरची(दि.29):-स्थानिक कोरची येथील वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची जयंती *’राष्ट्रीय क्रीडा दिन’* म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. आर. एस. रोटके हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. एस. एस. दोनाडकर तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एम. डब्ल्यू. रुखमोडे, प्रा. प्रदिप चापले, प्रा. एस. एन. धिकोडी, प्रा. जी. टी. देशमुख हे उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रमुख मार्गदर्शक प्रा. एस. एस. दोनाडकर म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे ध्येय असून त्यांच्या शारीरिक विकासासाठी विविध क्रीडा प्रकारांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या विविध आव्हानांना सामोरे जायचे असेल तर विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध मैदानी क्रीडा प्रकारांत सहभागी होऊन आपली क्रीडात्मक कौशल्ये विकसित करावी व शरीर काटक आणि बळकट करावे, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. आर. एस. रोटके यांनीही मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका आपल्या प्रास्ताविकातून शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. एम. डब्ल्यू. रुखमोडे यांनी विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. देविका देवांगण हिने केले तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. प्रदीप चापले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक व महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थीनी यांनी मौलिक सहकार्य केले.