नांदगावपेठ टोलनाका स्थानांतरणाबाबत आ. सुलभाताई खोडके यांची केंद्रीयमंत्री नितीन गडकरींशी चर्चा

28

🔺अमरावती- मोर्शी मार्गावरील नागरिकांच्या टोलमुक्तीसाठी दिले निवेदन

✒️शेखर बडगे(अमरावती, जिल्हा प्रतिनिधी)

मो:-9545619905

अमरावती( दि-६जुलै): राष्ट्रीय महामार्ग क्रं ६ ला अमरावती ते नागपुर पर्यंतचा मार्ग जोडला गेला आहे . या राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठ येथे पहिला टोल नाका येतो. महामार्ग प्राधिकरणाद्वारे हा टोल नाका अमरावती ते कारंजा घाडगे मार्गा करीता देण्यात आलेला आहे. या महामार्गाला जोडून मोर्शी, वरुड व अमरावती हा रस्ता असून त्या मार्गावरील वाहनांना सुद्धा नांदगावपेठ टोलनाक्यावर टोलशुल्क भरावा लागतो . वास्तविक पाहता मोर्शी -वरुड कडून येणाऱ्या वाहनधारकांद्वारे या राष्ट्रीय महामार्गाचा केवळ ४- ५ किलोमीटर साठीच वापर केला जातो . परंतु भुर्दंड मात्र ५० किलोमीटर करीता सोसावा लागतो . त्यामुळे अमरावतीमधून महामार्ग गेल्या पासून या मार्गावर मोर्शी- वरुड वासियांना आवागमन करतांना टोलवसुलीचा आर्थिक फटका सहन करावा लागतो . यासोबतच अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीतील नांदगाव पेठ पोलीस स्टेशन सुद्धा टोलनाकाच्या पुढे गावाजवळ येते . त्यामुळे अमरावती मधील राहटगाव, शेगाव , रंगोली लॉन या परिसरातील जवळपास 40 हजार नागरिकांना नांदगाव पेठ पोलीस स्टेशनची निगडीत कामे करतांना टोल नाका पार करूनच जावे लागत असल्याने नांदगाव पेठ टोलनाक्यावर विनाकारण टोलचा भुर्दंड भरावा लागत आहे . या बाबीला घेऊन शहरी व ग्रामीण भागातील नागरिक , व शेतकरी बांधवांच्या वतीने अमरावतीच्या आमदार सौ . सुलभाताई खोडके यांना निवेदन सादर करण्यासह या समस्येवर तोडगा काढण्यात यावा, अशी विनंतीपूर्ण मागणी करण्यात आली होती. या बाबीची तात्काळ दखल घेऊन आमदार सुलभाताई खोडके यांच्यावतीने विधिमंडळाच्या कामकाजाच्या दरम्यान गेल्या ३ मार्च रोजी नांदगाव पेठ ( अमरावती) जवळील टोलनाक्याची जागा बदलविण्या बाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यादरम्यान नागरिकांच्या सुविधे करिता उचित निर्णय घेण्यात यावा अशी आमदार महोदयांच्या वतीने यावेळी मागणी करण्यात आली होती. परंतु नंतर कोविड -19 मुळे यासंदर्भात कुठलाही निर्णय होऊ शकला नाही. ही बाब लक्षात घेता आमदार सुलभाताई खोडके यांच्यावतीने दिनांक ५ जुलै २०२० रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेबांना निवेदन पाठविण्यात आले . यासोबतच केंद्रीय मंत्री महोदयांशी या बाबीला घेऊन दूरध्वनीवर चर्चा करतांना या विषयाचे गांभीर्य पटवून देऊन त्यांना या विषया संदर्भात अवगत करण्यात आले. दरम्यान आगामी आठ दिवसांमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्राचे प्रमुख – अनुप कुमार, महाराष्ट्र शासन तसेच नांदगाव पेठ टोलनाका व संबंधित महामार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम करणाऱ्या आयडियल बिल्डर्स यांची संयुक्त बैठक बोलाविण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यासह आदेशित करणार असल्याचे केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी यांनी आ. सुलभाताई खोडके यांना सांगितले . या बैठकीनंतर काय निर्णय होतो , यावरून आपण संबंधित प्राधिकरणाशी चर्चा करून जनहितावह निर्णय घेऊ ,असे सांगून त्यांनी आमदार महोदयांना आश्वस्त केले . यादरम्यान नामदार गडकरी यांच्याशी संवाद साधतांना सी. आर. एफ. चे प्रस्ताव तसेच नव्या प्रस्तावासंदर्भातही आ .सुलभाताई खोडके यांनी चर्चा केली . यावर सद्या निर्माणाधीन कामे तथा नवीन कामांना घेऊन पर्याप्त निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या वतीने आमदार सुलभाताई खोडके यांना आश्वस्त करण्यात आले.