एसपींचा दणका! ‘माझी इच्छा पूर्ण कर…’; सहकारी पोलीस महिलेस ब्लॅकमेल करणारा अंमलदार निलंबित

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.16सप्टेंबर):-माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, अशी धमकी देत महिला अंमलदारास अश्लील मेसेज पाठवून ब्लॅकमेल करणाऱ्या अंमलदारास पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी १३ सप्टेंबरला निलंबनाचा दणका दिला. माजलगाव येथे १० सप्टेंबरला ही घटना घडली होती.

हरिश्चंद्र खताळ, असे निलंबित अंमलदाराचे नाव आहे. हरिश्चंद्र खताळ व पीडित महिला अंमलदार ग्रामीण ठाण्यात कार्यरत आहेत. २०२१ पासून ते २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत हरिश्चंद्र खताळ याने व्हॉटसअॅप मेसेज करून या महिलेस त्रास दिला. ८ सप्टेंबरला रात्री घरी येऊन माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, असे म्हणत धमकावून विनयभंग केला होता. त्यानंतर त्याची पोलीस पत्नी शिवकन्या निंगुळे हिने पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाक नाही तर तुझ्यावर, तुझ्या नातेवाईकांवर ३०६ नुसार गुन्हा दाखल करून तुझी बदनामी करीन, तुला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी धमकी दिली होती.

पीडित महिला अंमलदाराच्या फिर्यादीवरून पो.कॉ. हरिश्चंद्र खताळ व पो.ना. शिवकन्या निंगुळे या दाम्पत्यावर शहर ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली होती. गैरवर्तन केल्याचा ठपका ठेऊन पो.कॉ. हरिश्चंद्र खताळवर निलंबनाची कारवाई केली. १३ रोजी याबाबतचे आदेश काढल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED