मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

आज १७ सप्टेंबर, आजचा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले मात्र मराठवाडा प्रांत हा पारतंत्र्यातच होता. पूर्वी मराठवाडा हैदराबाद संस्थांनात विलीन होता. हैदराबाद संस्थानावर निजाम उर उस्मान अली खान निजाम उल मुल्क आसफजाह याचे राज्य होते. निजामाने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र हैदराबाद संस्थानातील जनता भारतात सामील होण्याच्या बाजूने होते. निजामाच्या संस्थानातून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम आंदोलन सुरू झाले. हैदराबाद संस्थानाची लोकसंख्या त्यावेळी दीड कोटीच्या वर होती. या संस्थांनात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग होता. मुक्ती संग्राम सुरू झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रिझवी याने जनतेवर खूप अत्याचार केले. दुसऱ्या बाजूला स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य संग्राम वेगात सुरू होता.

मराठवाडा मुक्ती संग्राम मराठवाड्यातील गावागावात लढला जात होता. यात हजारो स्वातंत्र्य सैनिक पुढे आले. स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतरही निजाम शरण येत नाही उलट जनतेवरील अन्याय अत्याचार वाढतच आहे हे पाहून १३ सप्टेंबर १९४८ रोजी भारत सरकारने हैदराबाद संस्थानात पोलीस कारवाई सुरू केली. सरदार वल्लभभाई पटेल हे त्यावेळी भारताचे गृहमंत्री होते. ते खूप धाडसी होते त्यांच्या धाडसी आणि अचूक निर्णयाने जनतेस न्याय मिळाला. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे चार वाजता कारवाई सुरू झाल्यावर २ तासात नळदुर्ग व सांयकाळ पर्यंत तुळजापूर, परभणी ते मणीगड, कनेरगाव भारतीय फौजांनी सर केले. चाळीसगावहुन निघालेल्या फौजेने कन्नड,दौलताबाद काबीज केले. १५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करून भारतीय फौजा पुढे निघाल्या. भारतीय फौजांपुढे निजामाच्या फौजेचे काही चालले नाही.

अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचा सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस याने शरणागती पत्करली. सेनाप्रमुखच शरण गेल्याने निजामही शरण आला. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या गुलामीतून मुक्त झाले. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानावर तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील निजामाच्या अन्यायी राजवटी विरुद्धचा लढा मराठवाड्यातील जनतेने यशस्वी केला . तेंव्हापासून आजचा दिवस म्हणजे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणून साजरा केला जातो. मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या स्वातंत्र्य सैनिकांना मानाचा मुजरा. सर्व मराठवाडा वासीयांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

पुणे, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED