सायगावमध्ये आयोजित केलेली पाणी परिषद म्हणजे बैल गेला आणि झोपा केला – डॉ.मोहन शेलार

33

🔸काम मंजूर झाल्यावर पाणी परिषद आयोजित करणे म्हणजे श्रेय घेण्याचा प्रकार ; डॉ.मोहन शेलार यांची टीका

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.18सप्टेंबर):-उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला नुकतीच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या विशेष प्रयत्नांतून चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून पुणेगाव- दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याचे विस्तारीकरण आणि काँक्रीटीकरणाची निविदा प्रक्रिया काही दिवसातच सुरू होणार आहे. मात्र काही मंडळींना पाण्याच्या प्रश्नांबाबत उशिरा जाग आली. त्यांच्याकडून पाणी परिषदा आयोजित केल्या जाताय, हा प्रकार म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’ असा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती मधील माजी गटनेते डॉ. मोहन शेलार यांनी यांनी केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, सतत दुष्काळाच्या छायेत असलेला येवला तालुक्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी छगन भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून येवला मतदारसंघात सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविले जात आहे. दरसवाडी-डोंगरगाव कालव्यासाठी केवळ दरसवाडी तलावावर अवलंबून न राहता भुजबळ साहेब यांनी गोदावरी खोऱ्याच्या हिशोबामध्ये नसलेले पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी १२ जोड तलावानद्वारे अडवून १० किलोमीटरच्या बोगद्यातून पूर्वेकडे पुणेगाव धरणात आणले.हे कुणा येवलेकरांच्या स्वप्नात सुद्धा नव्हते.अशा या स्वप्नवत असलेल्या मांजरपाडा प्रकल्पाची स्वप्नपूर्तीसुद्धा झाली आहे. याचं संपूर्ण श्रेय हे छगन भुजबळ साहेब यांचेच आहे. शासनस्तरावर आणि प्रत्यक्ष काम करताना अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला.मांजरपाडामुळे पुणेगाव धरणात अतिशय मुबलक पाणी येत असूनसुद्धा केवळ कालव्याची वहन क्षमता कमी असल्याने आणि लिकेजमुळे पुढे पाणी यायला अडचणी आल्या.या पुणेगाव-दरसवाडी आणि दरसवाडी डोंगरगाव कालव्याची वहन क्षमता वाढवणे आणि लायनिंग केल्याशिवाय येवल्यात पुरेसे पाणी जाणार नाही याचा विचार करून या कामांसाठी भुजबळ साहेब गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नात होते.

उर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या चतुर्थ अहवालास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याशिवाय ही कामे मार्गी लागणार नव्हती. त्यामुळे गोदावरी मराठवाडा महामंडळ,मेरीच्या महासंचालकांची राज्य तांत्रिक सल्लागार समिती,अर्थ विभागाची व्यय अग्रक्रम समिती आदी विविध स्तरावरील मान्यतेनंतर सोमवार दि.१२ सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आता आठवडाभरात याबाबतचा शासन निर्णय निघून या कामांची निविदा प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे.तसेच त्यामुळे लवकरच पुणेगाव दरसवाडी आणि दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे विस्तारीकरण व अस्तरिकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे डोंगरगावपर्यंत पाणी पोहचून येवलेकरांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की,आता पाणी परिषदा घेऊन काही मंडळी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. येवला मतदारसंघात आता पाणी परिषदा घेण्याची वेळ गेली असून छगन भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून मतदारसंघ हा पाणीदार होत आहे. त्यामुळे पाणी परिषदा घेऊन जनतेच्या भावनांशी न खेळता श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका डॉ. मोहन शेलार यांनी केली आहे.