प्रवेश सोहळा व शेतकरी मेळावा संपन्न

95

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड((दि.25सप्टेंबर):-राजकारणाच्या आखाड्यात अनेक मोठी झाडे तुम्ही आजपर्यत लावली आहेत. मात्र, त्या झाडांनी तुम्हाला फळे आणि सावली कधीच दिली नाही. त्यामुळे राजकीय दबाव आणि सरंजामी मानसिकतेला धडा शिकवल्या शिवाय आता पर्याय नाही, याची जाणीव झालेल्या प्रत्येक मतदार बंधु आणि भगिनीने गंगाखेड विधानसभेच्या माळरानावर रत्नाकर गुट्टे नावाचं झाड लावून महाराष्ट्र राजकीय इतिहासाला कलाटणी दिली आहे. परंतु तुम्ही लावलेल्या झाडाच्या पारंब्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अधिक मजबूत करा, अशी अपेक्षा गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केली.

पूर्णा तालुक्यातील ताडकळस मधील नवा मोढा येथे आयोजित केलेल्या जाहीर प्रवेश सोहळा आणि शेतकरी मेळावा कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चेअरमन डिगंबर शिराळे यांच्यासह मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादजी मुरकुटे, रासप जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, माजी सैनिक शेख गुलाब नबी साहेब, पूर्णा तालुकाध्यक्ष गणेशजी कदम, तालुकप्रभारी कैलास काळे, प्रभारी सुभाषराव देसाई, रासप तालुकाध्यक्ष जगन्नाथ रेनगडे, मेळाव्याचे स्वागताध्यक्ष मारोती मोहिते उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, स्मशानभूमी, सभागृह, शादीखाना, सभामंडप अशा विविध कामांसाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत असतो. त्यासाठी मुंबई-दिल्ली वाऱ्या करुन कोट्यावधींचा निधी खेचून आणतोय. तरी सुद्धा मतदार संघातले काही प्रश्न, अडचणी, समस्या आणि कामे शिल्लक आहेत. याची मला जाणीव आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राहिलेली कामे सुध्दा मी पूर्ण करणार आहे. तसेच गंगाखेड विधानसभेत मी जास्तीत-जास्त लक्ष पूर्णा तालुक्याकडे देत असतो. रस्त्याच्या कामासाठी मी नुकताच ६५ कोटींचा निधी आणला आहे. त्यातले ३० कोटी रुपये एकट्या पूर्णा तालुक्यातील रस्त्यासाठी दिले आहेत. त्यामुळे मी विकासाला कुठेही कमी पडत नाही. म्हणून, तुम्ही सुध्दा माझ्या पाठीशी असेच खंबीरपणे उभे राहा.

माझी आणि तुमची हि साथ अशीच कायम राहिल्यास या मतदार संघाचा कायापालट केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पूर्णा तालुक्यातील सहाच्या सहा जागांवर आपले उमेदवार विजयी करुन मला ताकद द्या. कारण, तुम्ही माझी स्फूर्ती आणि ऊर्जा आहात.
याप्रसंगी ताडकळस, खांबेगाव, रामापूर, कळगाव, वझुर, गोळेगाव, फुलकळस, महागाव आणि शिरकळस मधील शेकडो नागरिकांनी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळात प्रवेश जाहीर केला. तसेच मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनीही मनोगते व्यक्त केले.

यावेळी सुदाम वाघमारे, हबीब पठाण, नारायणराव मोरे, पशुपती शिराळे, विकास अंभोरे, बापूराव डुकरे, शिवाजीराव अवरगंड, उत्तमराव शिंदे, दत्तराव पौळ, वेंकटेश पवार, नवनाथ भुसारे, राजेभाऊ गाडेकर केशवराव गव्हाळे, कैलास शिंदे, मारोती मोहिते, दीनानाथ दुधाटे, शेख इस्माईल, विशाल गाढवे, उत्तम (नाना) आंबोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सैनिक शेख गुलाब नबी यांनी तर सूत्रसंचालन लक्ष्मण राऊत तर आभार तालुकाध्यक्ष गणेश कदम यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन मित्रमंडळाचे युवा तालुकाध्यक्ष मारोती मोहिते यांनी केले होत.

तब्बल ४२ वर्ष वास्तव्य केल्यानंतर अतिक्रमणाची नोटीस मिळालेल्या ‘त्या’ १७७ कुटुंबियांना मी प्रत्यक्ष भेट दिली. सर्वांशी बोललो. वस्तुस्थिती समजून घेतली. त्यावेळी बोलताना माझ्या काही माय-माऊल्या खूप रडल्या. त्यामुळे मी फारचं अस्वस्थ झालो आणि थेट मुंबईला जाऊन महसूल मंत्री यांच्या जवळ बसून ‘त्या’ नोटीसांना स्थगिती दिली. मात्र, गंगाखेड ते मुंबई प्रवासात मला माझ्या माऊंल्यांच्या डोळ्यातले अश्रु तसेच्या तसे दिसत होते. त्यामुळे मी दोन दिवस झोपलो नाही. परंतु, तुमची घरे नियमित करण्यासाठी मी प्रशासनाची दोन हात करायलाही तयार आहे. मात्र, तुम्ही कोणत्याही भामट्यांच्या किंवा दलालांच्या नादी लागून कागदावर सही किंवा पैसै देऊ नका, असेही आवाहन आ.डॉ.गुट्टे यांनी आपल्या भाषणातून ‘त्या’ कुटुंबियांना केले.

सर्वसामान्य माणसांसाठी साहेब अहोरात्र काम करतात. त्यामुळेच त्यांच्यावर व्यक्तीगत टिका-टिप्पणी केली जाते. परंतु त्या सगळ्यांना साहेब नेहमीच पुरुन उरलेत. अगदी, परवाच साहेबांनी तब्बल दीड हजार दिव्यांग बांधवांना आवश्यक ते साहित्य वाटप केले आहे. त्यामुळे साहेबांच्या चांगल्या कामात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांनी कधी कोणाला चष्मा तरी वाटला आहे का? असा रोखठोक सवाल राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे यांनी विरोधकांना उद्देशून केला आहे.

प्रवेश करुन गर्दी करण्यापेक्षा लोकांची कामे करुन दर्दी व्हा
राजकारणाच्या चौकटी बाहेर जाऊन साहेब काम करतात. त्यामुळे मी सुध्दा नुकताच साहेबांकडे आलो आहे. पण, मला इथं जो मान-सन्मान मिळतोय, तो राष्ट्रवादीत कधीच मिळाला नाही. साहेबांचं नेतृत्व फारच वेगळं असल्याचं दररोज जाणवत आहे. त्यामुळे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळात दररोज अनेकांचे प्रवेश होत असतात. परंतु, प्रवेश करुन गर्दी करण्यापेक्षा लोकांची कामे करुन दर्दी व्हा, असा कानमंत्र मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे यांनी देताच उपस्थितांनीही टाळ्यांची दाद दिली.