पीएफआयचे बीडमधील कार्यालय सील; जिल्हा अध्यक्षासह एकाला कोठडी

48

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.29सप्टेंबर):-पीएफआय संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर बुधवारी रात्री बीडमधील पीएफआयचे कार्यालय महसूल विभागाने सील केले. दरम्यान, बीड शहर पोलिसांनी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह अन्य एकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीएफआय संघटनेच्या बीड येथील माजी जिल्हाअध्यक्षाला एटीएसने अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बीडमध्ये संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते.

केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घालताच बीड शहर पोलिस स्टेशनचे रवी सानप व सहकाऱ्यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फिरोज मोमीन व कामरान खान यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बीड शहरातील जुना बाजार भागातील संघटनेचे कार्यालय महसूल विभागाने सील केले. यावेळी तहसीलदार सुहास हजारे यांच्यासह महसूल व पोलीस अधिकारी उपस्थित होते.