आंबेडकरवाद-सोयीचे व्यक्तीकेंद्री राजकारण!

26

महाराष्ट्रातील बहुसंख्य कर्मचारी वर्ग आपल्या बाजूने करून रिपब्लिकन नेत्यांची आर्थिक बाजूच लुळी केली. कर्मचारी संघटना उभी केली. बामसेफच्या शाखा तालुक्यात सुरू झाल्या. प्रत्येक शासकीय कार्यालयात बामसेफ दिसू लागली. त्या काळात नोकरीवर लागलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कांशीराम यांनी आपल्याकडे ओढले. संपूर्ण देशात बाबासाहेब पोहोविल्याचे सांगितले. खऱ्या अर्थाने येथून रिपब्लिकन नेतृत्वाला उतरती कळा लागली. नेतेही धोके ओळखू शकले नाही. व्यक्ती केंद्री राजकारणात ते स्वतःला शोधू लागले. पण समाज त्यांच्यापासून दूर जातो हे कधीही त्याला कळले नाही. रिपब्लिकन चळवळ अधू झाल्यानंतर राजकारणात निर्माण झालेली राजकीय पोकळी कांशीराम यांनी पुन्हा भरून काढली. केडर बेस राजकारणाची समाजाला भुरळ घालू लागले.

दीक्षाभूमीवर ५ ऑक्टोबरला ८ लाखांपेक्षा अधिक आंबेडकरी, बौद्ध अनुयायी आल्याची चर्चा आहे. गेल्या ६६ वर्षांपासून अनुयायांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बौद्ध आणि आंबेडकरी विचार आणि प्रचाराचे केंद्र वाढत असल्यानेच अनुयायांची संख्या वाढत आहे, यावर कोणाचेही दुमत होणार नाही. १४ ऑक्टोबरला १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ७ लाख अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि दिली. याला आता ६६ वर्षे पूर्ण होत आहे. गेल्या ६६ वर्षांत बरेच पाणी वाहून गेले. पूर्वाश्रमीचे महार बौद्ध झाले. शिक्षण घेतले. वाघासारखे डरकाळी फोडू लागले. गेल्या ६६ वर्षांत अनेक स्थित्यंतरे झाली. रक्ताचे पाणी करून समाजासाठी निधड्या छातीवर काठ्या झेलणाऱ्यांच्या छातीचा आता पिंजरा झाला. काही काळाच्या पडद्याआड गेले. स्वाभिमानाने निळी टोपी घालून गावागावांत रिपब्लिकन चळवळीची गाथा सांगणारी डोकीही आता शांत झाली.

गावागावात समाजबांधवांवर अत्याचार झाला की पेटून उठणारी दलित पॅंथरही आता कोणाची यावर वाद सुरू आहेत. रिपब्लिकनचेही ५२ शकले झाली. घरातील ५२ जण राष्ट्रीय अध्यक्ष झाले. हजारांवर आंबेडकरी संघटना आहेत. विभागानुसार शेकडो कर्मचारी संघटना. राजकीय, बिगरराजकीय संघटना तर घरोघरी. सर्वंच संघटना आंबेडकरी विचारधारेचा प्रचार करतात, यावर कोणाचीही शंका नाही. तरीही गेल्या सर्वंच क्षेत्रात बौद्धांची सामाजिक आणि राजकीय पीछेहाट झाली? गावागावांत कार्यकर्त्यांची फळी विस्कळित झाली. नेता कोणताही असला तरी त्यांना बाबासाहेबांच्या नावाने मानणारा वर्ग मोठा आहे. म्हणूनच अनेक महिलांच्या संघटनाही पुढे आल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. समाजाचे सभा संमेलन आणि वैचारिक कार्यक्रम सुरू असतात. तरीही पीछेहाट का होतेय? कोणत्याही महापुरुषाला एवढे अनुयायी नसतील तेवढे अनुयायी बाबासाहेबांना आहेत. मग, पुन्हा पीछेहाट कशासाठी, हा प्रश्न पडतोच. आवाहन न करताही दीक्षाभूमीवर लाखो लोक येतात. नमन करून जातात. तरीही आंबेडकरी आंदोलनाची धार का कमी झाली. याचे उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही. कारण गेल्या ६६ वर्षांत चळवळीचे विश्लेषण झाले नाही. का कोणी होऊ दिले नाही. हासुद्धा संशोधनाची विषय. कोणत्याही चळवळीचे परीक्षण होणे आवश्यक आहे. ती काळानुसार बदलासाठी गरज आहे.

तरीही परीक्षण झाले नाही. परीक्षणासाठी कोणालाही वेळ नाही काय?, का परीक्षण होत नाही. समाजात यावर भाष्य करणारे कमी नाही. उलट इतर समाजापेक्षा बुद्धीवर्गाची संख्या भरपूर. घरोघरी लेखक, कवी, साहित्यिक आणि विचारवंत आहेत. ते यावर चर्चा का करीत नाहीत. मग आंबेडकरी विचारधारेची धार बोथट झाली का?, झाली असेल तर यावर कारणमीमांसा करणे गरजेचे आहे.

७० दशकात आंबेडकरी चळवळ फॉर्मात होती. निळा आणि पंचशील झेंडा गावागावांत दिमाखाने आकाशात फडकत होता. आताही फडकत असेल. पण, तेव्हाच्या फडकण्याचा जिवंतपणा आताच्या झेंड्यात दिसून येत नाही. आंबेडकरी चळवळीची ओळख निळ्या झेंड्यातून दिसून येत होती. त्यात ऊर्जा होती. स्वाभीमान होता. समाजाच्या एकतेचे प्रतीक होते. निळा झेंड्यावर मक्तेदारी होती. झेंडा दिसला की कोणत्याही राजकीय पक्षाची त्यांना काही विचारायची हिंमत होत नव्हती. एवढे बळ असतानाही पीछेहाट का झाली. याचे ऑडिट झाले पाहिजे. कोणत्याही संस्थेचे दरवर्षी ऑडिट होते. मग एवढ्या मोठ्या समाजाच्या प्रगती, अधोगतीचे ऑडिट का होत नाही. समाजातील आपल्या चांगल्या आणि वाईट स्थिती परीक्षण करण्यास समाज का घाबरतो. एक काळ असा होता की कॉंग्रेससारखा अनेक वर्षे सत्तेत राहिलेला पक्षाचे नेते बौद्ध मोहल्यात प्रचार करायला घाबरत होता. त्यांना माहिती होते की प्रचार करूनही आंबेडकरी जनतेची मते फुटत नाही. एवढा धाक राजकीय पक्षांना होता. दुसऱ्या पक्षाला मतदान केल्याची अफवा पसरली तरी त्या व्यक्तीवर बहिष्कार घालण्याची भाषा बोलली जात होती. आमचा उमेदवार निवडून आला नाही तरी चालेल मत माझ्याच रिपब्लिकनला गेली पाहिजे, हा प्रत्येकाचा अट्टहास असायचा. ही ताकद निळ्या झेंड्यात होती.

कारण झेंडा रिपब्लिकन नेत्यांच्या हातात होता. गावातील प्रत्येकाच्या हातात होता. रस्त्यावर निळा झेंडा पडला तरी तो खिशात सन्मानाने टाकला जात होता. एखादे गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्रक रस्त्यावर पडले दिसले तरी ते पत्रक स्वच्छ करून ठेवले जात होते. हा आदर महापुरुषांचा होता. आणि समाजातील बारीकसारीक गोष्टीवर लक्ष ठेवणाऱ्या समाजविभुतींचा होता. मग हा दरारा कुठे गेला. ७० ते ९० च्या दशकातील स्वाभीमान आता का नाही. हा स्वाभीमान गहाण ठेवला काय?, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची काम कोणी तरी केले काय? केले असतील त्यानंतर समाजसुधारणा किंवा त्यात बदल झाले?, याचे सर्वांची उत्तरे नकारार्थीच मिळतील. बाबासाहेबांच्या राज्यघटनेचे शिलेदार म्हणून ठेंभा मिरविणाऱ्याही ही अवस्था असेल तर ज्यांनी कधीही बाबासाहेब वाचला नाही, अशांची काय अवस्था असेल. त्यामुळे आंबेडकर न वाचणाऱ्यांना शिव्याशाप देऊन उपयोग नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मक्रांती. सर्वसमाजाला अपेक्षित अशी राजकीय पक्षाची आखणीही केली. भारत बौद्धमय करेन हे स्वप्न राज्यघटनेतून त्यांनी प्रत्यक्षात उतरविले. तर समाजाला धम्मसंघटित करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभाही स्थापन केली. समाजाच्या वैचारिक सरंक्षणासोबत बौद्धिक आणि शारीरिक विकास व्हावा याकरिता समता सैनिक दलही स्थापन केले. या संघटना कुठे आहेत?

याचे उत्तर कोणालाही सापडले नाही. कारण बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाणानंतर व्यक्ती केंद्री राजकारण सुरू झाले. व्यक्ती केंद्री धम्मकारण सुरू झाले. तसेच इतर संघटनांमध्येही व्यक्ती केंद्री दुषितांचा उगम झाला. बाबासाहेबांनी व्यक्तीपूजेचा विरोध केला. व्यक्तीकेंद्री सत्तास्थानामुळे हुकूमशाहीचा उगम होते हे सांगून गेले तरी या समाजात व्यक्तींचे पूजेचे स्तोम माजले. संघटना, संस्था वगळून व्यक्तीला मोठे मोठे करण्याचे उद्योग या समाजाने केले. महापुरुषांची प्रचंड ऊर्जा असतानाही विचार त्या व्यक्तींच्या दावणीला बांधून संघटनांना लहान केले. ८० च्या दशकात कांशीराम नावाचे वादळ आले. प्रचंड बुद्धिमत्ता. संघटन कौशल्य. लोकांना घेऊन चालण्याची वृत्ती आणि आंबेडकरी समाजाच्या व्यक्ती केंद्री राजकारणामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेली ही पोकळी कांशीराम यांनी भरून काढली. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध समाजाने समाजापुरते मर्यादित ठेवले, असा आरोप करून आंबेडकरवाद्यांनाच त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. महाराष्ट्रातील बहुसंख्य कर्मचारी वर्ग आपल्या बाजूने करून रिपब्लिकन नेत्यांची आर्थिक बाजूच लुळी केली. कर्मचारी संघटना उभी केली. बामसेफच्या शाखा तालुक्यात सुरू झाल्या. प्रत्येक शासकीय कार्यालयात बामसेफ दिसू लागली. त्या काळात नोकरीवर लागलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कांशीराम यांनी आपल्याकडे ओढले. संपूर्ण देशात बाबासाहेब पोहोविल्याचे सांगितले.

खऱ्या अर्थाने येथून रिपब्लिकन नेतृत्वाला उतरती कळा लागली. नेतेही धोके ओळखू शकले नाही. व्यक्ती केंद्री राजकारणात ते स्वतःला शोधू लागले. पण समाज त्यांच्यापासून दूर जातो हे कधीही त्याला कळले नाही. रिपब्लिकन चळवळ अधू झाल्यानंतर राजकारणात निर्माण झालेली राजकीय पोकळी कांशीराम यांनी पुन्हा भरून काढली. केडर बेस राजकारणाची समाजाला भुरळ घालू लागले. कर्मचारी संघटना हाताशी असल्याने पैशाची चिंता नाही. रात्रंदिवस काम करणारी यंत्रणा कामी लावली. रंगरंगोटीपासून पत्रक,सभा गाजविणे सुरू झाले. खाली जागा दिसली की भरून काढण्याची शैली विकसित झाली. यात रिपब्लिकन चळवळ आचके देऊ लागली. राजकारणात जम बसविल्यानंतर कांशीराम यांनी समाजाच्या दुगती नस दाबली. बौद्धधम्म स्वीकारणार. जाहीर गर्जना केली. समाज बेधुंद होऊन सुसाट झाला. बाबासाहेबांनंतर धम्मक्रांती होईल आणि भारत बौद्धमय होईल, या स्वप्नाने गावागावांत जाहीर सभा होऊ लागल्या. बाबासाहेब आंबेडकर यांची उणीव कांशीराम भरून काढतील, असेही स्वप्न रंगविल्या गेले. हिंदी भाषिक क्षेत्रात कांशीराम यांच्या रूपाने नव्याने बाबासाहेबांची मांडणी होऊ लागली. समाज मेंढरासारखा पळू लागला. खरे काय आणि खोटे काय?, याची काहीच चर्चा नाही. कारणमीमांसा नाही. अनेक वर्षे गेली तरी भारत बौद्धमय तर दूरच साधी धम्मदीक्षा नाही. पुढे सत्ता मिळाली की दीक्षा घेऊ, असे एक ना अनेक गोंडस फतवे काढून रिपब्लिकन चळवळीला मृत्यूशय्येपर्यंत पोहोचवून ठेवले. महाराष्ट्रात सत्ताही मिळाली नाही. जिथे मिळाली तिथे धम्मदीक्षाही झाली नाही. सर्व काय तर व्यक्तीकेंद्री राजकारणामुळे फटका या समाजाला बसला. यातून सावरण्यासाठी १९९८ मध्ये रिपब्लिकनला सलाइन मिळाली.

एकाच वेळी चार खासदार निवडून आले. अनेक वर्षे मृत्यूशय्येवर पडून असलेली चळवळ तासी १०० च्या वेगाने धावते की काय, असे वाटू लागले. सरकार पडले आणि चारही खासदार घरी बसले. त्यानंतर समाजातून रिपब्लिकन शेवट झाला. या निवडणुकीनंतर प्रकाश आंबेडकर, रा.सू, गवई, प्रा, जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले यांनी वेगवेगळ्या चुली मांडून रिपब्लिकनलाच मूठमाती दिली. प्रत्येकाने व्यक्ती केंद्री राजकारण सुरू केले. सध्या स्थितीमध्ये ५२ रिपब्लिकन पक्षाची नोंद आहे. सर्वच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते सर्व घरी बसले आहेत. स्वतःपूरती त्यांची चळवळ सुरू आहे. मूळ चळवळ कुठे गेली, याचा शोधही नाही. या पिछेहाटवर चर्चाही नाही आणि परीक्षणही नाही.

गेल्या काही वर्षांत देशात बरेच काही बदल घडून आले. २०१४ मध्ये तर आंबेडकरी विचारधारेवरच खऱ्या अर्थाने प्रहार होऊ लागले. संविधानातील बदल हे डोळ्यादेखत होऊ लागले. दररोज राज्यघटनेची पायमल्ली होत असताना समाज उघड्या डोळ्यांनी पहात आहे. आंबेडकर हे आता भाजप, संघापासून तर आम आदमी पक्षाचे झाले. नवा आंबेडकरवाद जन्माला येत आहे. हा आंबेडकरवाद भाजपचा आहे. आपचा आंबेडकरवाद आहे. बसपचा आंबेडकरवाद सध्या सत्ता गेल्याने रिपब्लिकन चळवळीप्रमाणे मृत्यूशय्येवर आहे. त्याला कधी ऊर्जा मिळेल हे सांगता येत नाही. सनातनी पक्षाच्या कुबड्यांवर निर्माण झालेले व्यक्ती केंद्री पक्ष लयास जातात यावरून दिसून येते. कांशीराम यांनी बौद्धधम्माची दीक्षा घेतली नाही. त्यानंतर मायावती यांची घोषणाही सत्ता आल्यानंतर पूर्ण झाली नाही. आता कधी सत्ता येईल, याची दूरदूर चिन्हे नाहीत. बाबासाहेबांच्या नावाने पोळी शेकणाऱ्याची संख्या वाढली आहे. अस्पृश्य बाबासाहेब हे आता सर्वांचे झाले आहेत. त्यांनी सोयीनुसार आंबेडकर स्वीकारून बाबासाहेबांचे भारत बौद्धमयचे स्वप्न कुठेतरी शेवटच्या आचक्या देत आहेत. या झालेल्या घसरगुंडीचे परीक्षण नाही, काही चर्चा नाही. तरीही भारत बौद्धमय होईल वाटत आहे. हे खरे की खोटे हे आताच सांगता येणार नाही. बाबासाहेबांनी राज्यघटनेतून भारत बौद्धमय केला, असे अनेकजण सांगत आहेत. मात्र, तीच राज्यघटना धोक्यात आली आणि यातून भारत बौद्धमय सुद्धा धोक्यात आला हे सांगूनही खरे वाटत नाही. तरीही विजयीदशमीला धम्मदीक्षा सोहळ्याला भाबडी आशा घेऊन आठ लाख लोक जमा होतात. याचे कोणालाही कौतुक नाही. या आठ लाख बौद्ध बांधवांना काय देतो आणि आतापर्यंत काय दिले, याचे परीक्षण नाही.

आतापर्यंत दीक्षाभूमीवर जे काही करत आले ते बौद्धांना मान्य आहे का?, यावरही चर्चा नाही. जे बाबासाहेबांच्या नावाने येतात. गप्प गुमान जे वैचारिक धन त्यांच्यापुढे वाढले जाते ती शिदोरी घेऊन अनुयायांनी घेऊन जातात. पण योग्य आहे का?, याची कारणमीमांसा नाही. याचे परीक्षण कधी करणार?, समाजाला काय हवे आहे काय नाही, यावर कोणी बोलायला तयार नाही. आठ लाख लोकांच्या पदरात जे विचार पाडले जातात हे बाबासाहेबांना अभिप्रेत आहेत का? सर्वांना गृहित धरून आंबेडकरी विचारधन वाटले जात आहे? दीक्षाभूमी ही राजकीय आहे की धम्मनिष्ठित आहे हे कधी सांगणार. ६६ व्या वर्षीही राजकीय मंडळी बौद्धपीठावर बसवून धम्माचे ज्ञान पाजळतात. हे नेते खरंच धम्माचे पुरस्कर्ते हे का? यावर कोणीही बोलत नाही. याचे परीक्षण व्हावे. देशाच्या कानाकोपऱ्यातून दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांनी सकस विचार मिळाले पाहिजे. सकाळी वेगळ्या विचाराच्या व्यासपीठावर आणि सायंकाळी धम्मपीठावर विचार मांडणाऱ्या राजकीय नेत्यांची भूमिका तपासून पाहिली पाहिजे. असे होत नसेल तर आपण निश्चितच चुकीच्या विचाराधारेचे अनुसरण करतोय हे सुद्धा बघितले पाहिजे. समाज बुद्धीवंताचा असली तरी समाज व्यक्ती केंद्री झाल्यामुळे त्याला काही दिसत नाही. नेता सांगेल ते खरे मानणारा वर्ग तयार झाला की त्या समाजाचे पतन निश्चित आहे. गेल्या अनेक वर्षांत या समाजाने अनेक राजकीय आणि सामाजिक धक्के पचवले आहेत. तरी हा समाज फक्त बाबासाहेबांच्या विचारांमुळे पुढे जात आहे. त्याला दिशा देणारा योग्य विचार मिळाला नाही तर पूर्वीसारखे, पण वेगळ्या पद्धतीच्या गुलामगिरीच्या जवळपास आपण आहोत याचे भान ठेवणे आवश्यक आहे.अशावेळी परीक्षण महत्त्वाचे ठरते.

✒️चंद्रशेखर रामदास महाजन(प्लॉट क्र. ५९, जनसेवा हाउसिंग सोसायटी, भारत गोडावूनच्या मागे, नीलकमलनगर, नरसाळा रोड, नागपूर)मो:-९८५०२०९७१०