ब्राझीलमध्ये पुन्हा डाव्यांची सत्ता!

35

जगभरात सत्तांतरांचे वारे वाहत आहेत. ब्रिटनमध्ये नुकतेच सत्तांतर झाले असून भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आणि भारताचे जावई ऋषी सूनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. ब्रिटन नंतर सर्व जगाचे लक्ष लागले होते ते ब्राझीलकडे कारण ब्राझीलमध्येही राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लागली होती आणि या निवडणुकीत अती उजवे आणि अती डावे यांच्यात लढत होती. या निवडणुकीचा निकाल नुकताच निकाल लागला असून ब्राझीलमध्येही ब्रिटनप्रमाणे सत्तांतर झाले असून डाव्या विचारांचे कट्टर समर्थक लुईझ ईनशीओ लूला डी सिल्वा हे ब्राझीलचे नवे सत्ताधीश बनले आहेत. लूला डी सिल्वा यांनी ब्राझीलमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अती उजव्या विचारांचे जैर बोलसोनोरो यांचा पराभव केला. बोलसोनोरे यांच्या समर्थकांसाठी हा मोठा धक्का होता कारण बोलसोनोरे यांची ब्राझीलवर एकहाती हुकूमत होती.

२०१८ साली झालेल्या निवडणुकीत बोलसोनोरे यांच्या पक्षाने एकहाती विजय मिळवत लूला डी सिल्वा यांच्या पक्षाचा दारुण पराभव केला होता. विशेष म्हणजे २०१८ साली जेंव्हा ब्राझीलमध्ये निवडणूक झाली त्यावेळी लूला डी सिल्वा हे तुरुंगात होते. ब्राझीलीयन बांधकाम व्यावसायिकांकडून लाच स्वीकारल्या प्रकरणी ब्राझीलीयन न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. २०१८ सालची निवडणूक ही याच मुद्द्यावर लढवली गेली आणि अती उजव्या पक्षाने लूला डी सिल्वा यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा बनवून ती निवडणूक जिंकली होती. निवडून आल्यानंतरही त्यांनी भ्रष्टाचारावर कडा प्रहार केला होता त्यामुळे तेच विजयी होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती त्यामुळेच या निकालावर आश्चर्य व्यक्त होत आहे.

पराभूत उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनोरे यांनीही हा निकाल मान्य केला नसून पराभवाचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेवर फोडले आहे. ब्राझीलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेवर विश्वास ठेवता येणार नाही असे म्हणत त्यांनी लूला डी सिल्वा यांना थेट चोर असे संबोधले आहे. एकूणच या निवडणुकी नंतर ब्राझीलमधील राजकीय वातावरण बिघडले आहे. ब्राझीलमधील राजकारणात या पुढच्या काळातही राजकीय संघर्षाच्या ठिणग्या पडतच राहणार आहे. जैर बोलसोनोरे यांच्या समर्थकांना हा पराभव पचवणे जड जात असतानाच लूला डी सिल्वा यांच्या समर्थकांचा आनंद गगनात मावत नाही. लूला डी सिल्वा यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली असली तरी त्यांच्या पक्षाला मात्र संसदेत पूर्ण बहुमत मिळाले नाही. ब्राझीलमध्ये अध्यक्षीय निवडणूक पद्धत आहे. आपल्याकडे ग्रामपंचायतीसाठी जशी निवडणूक झाली म्हणजे थेट जनतेतून सरपंच तशी ती निवडणूक होती.

यात लूला डी सिल्वा तर जिंकले मात्र संसदेत बहुमत आहे ते गैर बोलसोनोरे यांच्या पक्षाचे त्यामुळे लूला डी सिल्वा यांनी घेतलेल्या निर्णयाला जैर बोलसोनोरे यांच्या पक्षाकडून कडाडून विरोध होण्याची शक्यता आहे. अर्थात लूला डी सिल्वा हे देखील कसलेले राजकारणी आहेत. २००३ ते २०१० या काळात ते राष्ट्राध्यक्ष होते. अर्थात ब्राझीलीयन जनतेला यांच्या राजकारणाशी काही देणेघेणे नाही त्यांना हवा आहे तो ब्राझीलचा विकास . हा विकास करण्यासाठीच त्यांनी लूला डी सिल्वा यांना राष्ट्राध्यक्षपदी बसवले आहे. आता लूला डी सिल्वा यांनी जनतेला दिलेले आश्वासने पूर्ण करून आपली निवड सार्थ करून दाखवावी.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)