“अति सर्वत्र वर्जयेत “

16

‘अति तिथं माती’ ही म्हण जगातल्या प्रत्येक माणसाला माहीत आहे. कोणतीही बाब योग्य प्रमाणातच असली पाहिजे. अगदी अत्यंत चांगल्या गोष्टीने सुद्धा प्रमाण ओलांडले तर ती गोष्ट चांगली राहत नाही. आणि एखादी वाईट वाटणारी गोष्ट सुद्धा प्रमाणात असेल तर ती वाईट ठरत नाही. म्हणूनच जगात अशा अनेक बाबी आहेत ज्यांना विष मानले आहे तरीसुद्धा त्या जीवनात प्रमाणामध्ये असाव्या लागतात. उदाहरणच द्यायचे झाले तर नित्याच्या जेवणामध्ये असणाऱ्या मिठाला आणि साखरेला संशोधना नुसार विषच मानावे लागेल. पण तरीसुद्धा यांचे जेवणात आणि जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे हे आपण सर्वजण जाणतोच. मिठाशिवाय जेवणाला चवच नाही. या उलट अनेक वस्तू अमृतासारख्या आहेत. तरीसुद्धा त्या प्रमाणाबाहेर सेवन केल्या तर त्या विषच ठरतात. ही गोष्ट केवळ खाण्याच्या बाबी संदर्भातच नाही. तर ती जीवनातील प्रत्येक बाबीला लागू पडते. म्हणून आम्ही नेहमी ऐकत आलोय ‘प्रमाणामध्ये सर्व काही असावे…..’ या वरील एक सुंदर कविता मला आठवते.

अति कोपता कार्य जाते लयाला
अति नम्रता पात्र होते भयाला
अति काम ते कोणतेही नसावे
प्रमाणामध्ये सर्व काही असावे….

अति भूषणे मार्ग तो संकटाचा
अति थाट तो वेश होतो नटाचा
राहावे असे की न कोणी हसावे
प्रमाणामध्ये सर्व काही असावे…..

स्तुतीला अति बोलती ती श्वानवृत्ती
अति लोक निंदा करी दृष्ट चित्ती
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे
प्रमाणामध्ये सर्व काही असावे…..

जुन्या चे अति भक्त ते हटवादी
नव्याचे अति लाडके ते शुद्ध नादी
खरे सार शोधुनिया नित्य घ्यावे
प्रमाणामध्ये सर्व काही असावे…..

ही कविता वाचल्यावर स्पष्टपणे समजते की कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास ती वाईट असते. मुळात ज्या गोष्टी वाईट आहेत त्या अजिबातच नसाव्यात. पण चांगल्या गोष्टींचा सुद्धा अतिरेक होऊ नये. उदाहरणच द्यायचे झाले तर…. इतरांना मदत करणे , वेळोवेळी सहकार्य करणे ही चांगली बाब आहे. पण ती सुद्धा योग्य मर्यादेत असली पाहिजे. स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी सक्षम नसणाऱ्या माणसांनी सतत परोपकाराच्या नावाखाली….. आणि माणुसकीच्या लेबलाखाली सतत काही व्यक्तींना मोठ्या प्रमाणात आणि आवाक्याबाहेर केलेली मदत कायमस्वरूपी प्रश्नच निर्माण करते. सतत स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यापेक्षा…. स्वतःचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यापेक्षा….. तुम्ही जर काही विशिष्ट माणसांना आवाक्याबाहेरची मदत करत असाल तर हे व्यावहारिक जग तुम्ही कोणीही असाल तरीसुद्धा तुम्हाला नक्की प्रश्न विचारेल. असे का….? आणि असे करण्यामागचा नेमका हेतू काय….? हे सर्वांनाच ज्ञात आहे. तरीसुद्धा माणसे आयुष्यभर प्रमाण सांभाळत नाहीत. अक्षरशः वाहवत जातात. परोपकार आणि चांगुलपणा याचा अतिरेक करतात…

तार्किक विचार केला तर तुम्ही जर एखाद्या व्यक्तीशी अति प्रमाणात चांगले….. अतीव सहकार्याचे….. वागत असाल तर बघणाऱ्यांना याच्याही पुढे जाऊन प्रत्यक्ष ज्या व्यक्तीशी चांगले वागत आहात अगदी त्यालासुद्धा नक्कीच प्रश्न पडतो. असे का…? मुळात तुम्ही कितीही चांगले असलात. तरी तुमचा चांगले-वाईटपणा हा तुमच्या मनाच्या निरागसते वरून ठरत नाही तो ठरतो तुमच्या वागण्यावरून. म्हणून किमान स्वतःसाठी नाही तर जगासाठी तरी प्रमाण सोडायचे नसते. कधीकधी चांगल्या गोष्टी सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त झाल्या तर त्याचेही व्यसन लागते आणि त्याची सुद्धा नशा यायला लागते. बरीच माणसे परोपकार आणि चांगुलपणाच्या नशेत जगतात… संपूर्ण आयुष्य या नशेमध्‍ये वाहवत जातात… हे सगळे करताना आपल्या अत्यंत जवळच्या माणसांना दुखावतात… कळत-नकळत त्यांच्यापासून दूर जायला लागतात. एक दिवस बऱ्याच मोठ्या वाईट अनुभवानंतर चांगुलपणाची नशा उतरते. आणि त्यावेळी मात्र काहीच शिल्लक उरलेले नसते.

आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा पुर्ण झाल्यानंतर जमेल तेवढी गरजूंना मदत ही सर्वसामान्य पद्धत आहे. मुळात आपले आणि आपल्या कुटुंबाचे हित साधन्यापूर्वीच इतरांना आवाक्याबाहेर असणारी मदत करणे सुद्धा एका दृष्टीने आपल्या कुटुंबावर झालेला अन्याय असतो.

याच्याही पुढचा विचार म्हणजे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आपल्याला जमेल तेवढे कष्ट….. जमेल तेवढे कार्य….. आणि जमेल तेवढेच कर्तुत्व करण्याचा प्रयत्न करावा. काम करण्याचा… कष्ट करण्याचा…. आणि पैसा कमावण्याचा सुद्धा अतिरेक होता कामा नये. अर्थार्जनाचे सुद्धा व्यसन लागता कामा नये. ‌

आपले आणि आपल्या कुटुंबाचे जीवन घडवताना अती धावपळ करणे सुद्धा व्यर्थ आहे. मुळात क्षणभंगुर असणाऱ्या जीवनासाठी अफाट धावपळ करून बिनभरवश्याची गुंतवणूक कशासाठी….? मुळात जीवन तुम्हाला गुंतवणूक मागत नाही. या जीवनाला खऱ्या अर्थाने सोडवणुकीचे गरज असते. गोष्टी समजून साध्या, सोप्या, सरळ करता आल्या पाहिजेत. अत्यंत साधेपणाने आणि मोकळ्या वातावरणात जगता आले पाहिजे. शेवटी रिकाम्या हाताने आलेला माणूस रिकाम्या हातानेच परत जातो. मग आयुष्यभराची ही सगळी ओढाताण कशासाठी….? याचा अर्थ असा नाही की माणसाने कष्ट करू नयेत…. काम करू नये…. प्रयत्न करू नयेत…… याउलट माणसाने सतत क्रियाशील रहावे. यात शंकाच नाही पण कुठलीही धावपळ आणि कष्ट आपल्या जिवापेक्षा आणि जीवनापेक्षा महत्त्वाचे नाहीत. कोणतेच काम आपल्या जिवापेक्षा मोठे नाही. तुम्ही कितीही उदात्त, समाजहिताचे आणि विश्वकल्याणाचे काम करत असलात तरीसुद्धा ते काम करण्यासाठी तुमचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त धावपळ केल्याने आजारी पडाल आणि करत असलेले ध्येयवेडे उदात्त कार्य थांबेल. म्हणून कार्य चालू राहण्यासाठी तरी प्रमाणात धावपळ करा. त्यामुळे थोडक्यात काय तर ” अति सर्वत्र वर्जयेत ” म्हणतात ते या अर्थाने…..

✒️मयूर मधुकरराव जोशी(“विठ्ठल-रुक्मिणी’ नगर,जिंतूर)मो:-7972344128,9767733560