✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(12जुलै):राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू नसल्याचं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मात्र, आपला विद्यार्थी मानलं आहे. तसेच या सहा महिन्याच्या परीक्षेत आमचा विद्यार्थी संपूर्ण पास झाला आहे, असं सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांचं कौतुकही केलं आहे. पवारांनी उद्धव ठाकरे यांना विद्यार्थी म्हटल्याने आश्चर्य व्यक्त होत असून पवारांची ही नवी चाल तर नाही ना? अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’साठी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रकाशित झाला. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवरही भाष्य केलं. या सरकारचं सहा महिन्यांचं प्रगती पुस्तक तुमच्याकडे आलंय का? असा सवाल राऊत यांनी गेला. त्यावर आता ही सहा महिन्यांची परीक्षा झालीय. परीक्षा पूर्ण झालीय असे वाटत नाही. परीक्षेतला प्रॅक्टिकलचा भाग अजूनही बाकी आहे, असं सांगतानाच आता कोठे लेखी परीक्षा झाली आहे, पण त्या परफॉर्मन्सवरून तरी प्रॅक्टिकलमध्येसुद्धा हे सरकार यशस्वी होईल असा आता ट्रेंड दिसतोय. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांच्या कालखंडासंबंधी लगेचच निष्कर्ष काढणं योग्य नाही. शिवाय विद्यार्थी कष्ट घेताना दिसतोय. त्यामुळे निकालाची चिंता बाळगावी अशी स्थिती दिसत नाही. राज्याचा विचार करून तुम्ही विचारत असाल तर या सहा महिन्यांत परीक्षेत आमचा विद्यार्थी संपूर्ण पास झाला आहे. तो पुढची परीक्षा, पुढचे पेपरही सहजपणाने सोडवेल अशी खात्री आहे, असं पवार म्हणाले. मी हे सगळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंबंधात बोलत असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची टीम काम करत असल्याने सर्व कामाचं श्रेयही त्यांचंच आहे, असंही पवार यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांना आपण मोदींचे गुरू आहात असं म्हटलं जातं, असा प्रश्न विचारताच मला मोदींचा गुरू म्हणून त्यांना आणि मला दोघांनाही अडचणीत आणू नका. राजकारणात कोणी कोणाचं गुरू असत नाही. आम्ही लोक अनेकदा एकमेकांच्या संदर्भात सोयीची भूमिका मांडत असतो,’ असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ‘अलीकडे काही माझी आणि त्यांची भेट झालेली नाही. करोनाचं संकट आल्यानंतर इतर पक्षांच्या नेत्यांप्रमाणे त्यांच्याशी बोललो असेन इतकेच. त्या पलीकडे नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, राजनीति, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक , हटके ख़बरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED