कायद्याला प्रबोधनाची जोड दया!

39

सिंगल सिगारेट विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे वर्तमानपत्रात वाचले. सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. अर्थात सिंगल सिगारेटवर बंदी घालण्याचा निर्णय योग्य असला तरी हा निर्णय म्हणजे आजारापेक्षा उपाय भयंकर असाच ठरण्याची शक्यता अधिक आहे कारण सिंगल सिगारेटवर बंदी घातल्यामुळे धूम्रपान करणारे लोक आता सिगारेटचे पूर्ण पाकीटच विकत घेतील त्यामुळे सिगारेट पिण्याचे प्रमाण आखणी वाढेल. अर्थात धूम्रपान विरोधात हा पहिला कायदा नाही. धूम्रपान विरोधात आपल्या देशात अनेक कायदे आहेत मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही काही वर्षापूर्वी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी घातली होती मात्र ही बंदी कागदावरच राहिली आजही सार्वजनिक ठिकाणी सर्रास धूम्रपान केले जाते.

धूम्रपानाचे दुष्परिणाम माहीत असूनही लोक धूम्रपान करतात आणि स्वतःसह इतरांचे आरोग्यही धोक्यात घालतात. सरकारही अशा कायद्याची मलमपट्टी करून वेळ मारून नेते. वास्तविक सरकारनेही सिंगल सिगारेट विक्रीवर बंदी, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी असे कायदे करण्यापेक्षा सरकारने सरळ सिगारेट, विडी, गुटखा या सारख्या तंबाखूजन्य वस्तूंच्या निर्मितीवरच बंदी घालावी. जर सिगारेट बनलीच नाही तर पुढे ती विकण्याचा आणि धूम्रपान करण्याचा प्रश्नच येणार नाही. सरकारने इच्छाशक्ती दाखवत थेट मुळावरच घाव घालावा. सरकारने सिगारेट निर्मितीवरच बंदी घालावी मात्र सरकार सिगारेटवर बंदी घालणार नाही हे ही तितकेच खरे कारण सिगारेट निर्मितीतून सरकारला मोठा महसूल मिळतो. या महसुलावर सरकार पाणी पडू देणार नाही त्यामुळेच नागरिकांनीच सिगरेट, विडी, गुटखा तंबाखूपासून दूर राहायला हवे. तंबाखूचे अनेक दुष्परिणाम आहेत.

विडी किंवा सिगारेट पिणाऱ्या माणसाच्या तोंडाला उग्र वास येतो. सतत सिगारेट, बिडी पिणाऱ्या तसेच तंबाखू खाणाऱ्या माणसांना कर्करोगाचा धोका असतो. सिगारेटच्या पाकिटावर देखील तसा इशारा लिहिलेला असतो पण धूम्रपान शौकिनांना त्याचे काहीही सोयर सुतक नसते. ते धूम्रपान करीतच असतात. अलीकडे धूम्रपान करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. विशेष म्हणजे यात तरुण तरुणींची संख्या लक्षणीय आहे. धूम्रपान संबंधी अनेक कायदे करूनही धूम्रपान करणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. याचाच अर्थ केवळ कायदे करून उपयोग नाही तर त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणीही व्हायला हवी.

आता हेच पहा ना राम नाईक रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर सिगारेट विक्रीस बंदीचा तसेच लोकल, गाड्यात धूम्रपान करण्यास बंदी घातली होती पण अलीकडे लोकल गाड्यात अनेक फेरीवाले सिगारेट विकताना दिसतात तसेच लोकल गाड्यात सिगारेट ओढणारे प्रवासीही आढळून येतात त्यामुळे कायद्यासोबतच प्रबोधनाचा मार्गही सरकारने अवलंबवायला हवा. धूम्रपानाचे दुष्परिणाम शाळा कॉलेजमधील मुलांना समजावून सांगावेत. सोशल मीडियावर त्यासंदर्भात जनजागृती करावी. चित्रपटातील धुम्रपानाच्या दृश्यावर बंदी घालावी. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच सरकारने प्रबोधनाचा मार्गही अवलंबला तर धूम्रपान करणाऱ्यांची संख्या निश्चितपणे घटेल.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५