ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात आ.डॉ.गुट्टेंचा करिष्मा

30

🔸३६ पैकी २६ ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे वर्चस्व

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21डिसेंबर):-स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीस विशेष महत्त्व आहे. गावचा ‘कारभारी’ होण्यासाठी अनेकजन निवडणुकीच्या आखाड्यात उभे राहातात. परंतु जनतेचा कौल मिळालेला पैलवान ‘बाहुबली’ ठरतो.

त्यामुळे विधानसभा मतदार संघातील ३६ पैकी २६ ठिकाणी विजयी झेंडा रोवण्यात विद्यमान आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांना यश आल्याने त्यांचा करिष्मा पुन्हा एकदा सिध्द झाला आहे. त्यामुळे निकालानंतर आ.डॉ.गुट्टे ‘बाहुबली’ ठरल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगत आहे.

परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. त्यामध्ये गंगाखेड विधानसभेतील तिन्ही तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींचा समावेश होता. त्यामुळे आ.डॉ.गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाने स्वबळावर तर काही ठिकाणी स्थानिक आघाडीशी युती करुन निवडणूक लढवली होती. त्यासाठी गेल्या १८ तारखेला मतदान झाले होते.

त्याचा निकाल जाहीर झाला असून गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, डोंगरजवळा, पिंपरी झोला, नागठाना, चिलगरवाडी, दत्तवाडी, मसनेरवाडी, घटांग्रा, भांबरवाडी, बेलवाडी तर पालम तालुक्यातील घोडा, वरखड, आनंदवाडी, फतुनाईक तांडा, खरबधानोरा, लांडकवाडी, कोनेरवाडी आणि पूर्णा तालुक्यातील दगडवाडी, गोळेगाव, पांगरा ला, कानडखेड, गोविंदपूर, धनगर टाकळी, गौर, पिंपरण, निळा अशा ३६ ग्रामपंचायत निवडणूक निकालात राष्ट्रीय समाज पक्षाचे वर्चस्व राहिले आहे.

दरम्यान, विजयी झालेल्या सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे मनापासून अभिनंदन करतो. हा विजय म्हणजे लोकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आहे. त्यामुळे लोकांच्या पाठींब्याने त्या गावांमध्ये दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार आहे, अशी प्रतिक्रिया गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी फोनद्वारे दिली आहे.