गाव खेड्यातील कारभार महिलांच्या हाती; ग्रामपंचायत निवडणुकीत सासू विरुद्ध सुनेच्या लढतील सुनेचा विजय

34

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.22डिसेंबर):- जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. या निवडणुकीत गाव/खेड्याचा कारभार महिलांच्या हाती आलाय. ग्रामपंचायतीची निवडणूक नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती. तर नेत्यांसह रक्तांच्या नात्यात देखील लढत झालीय. शिरूर तालुक्यात सासु/सुनेच्या लढतीत सुनेने सासूचा पराभव करत विजय मिळवलाय

बीडच्या शिरूर तालुक्यातील वारणी ग्रामपंचायतीत चुलत सासू विरुद्ध सून असा सामना रंगला होता. या दोघांच्या लढतीत सुनेने सासूचा पराभव करत विजय मिळवलाय. प्रियंका केदार या सरपंच पदी विराजन झाल्यात तर सात ठिकाणी महिला सदस्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीत महिला राज आलंय. प्रियंका केदार या सासू मंगला केदार यांच्या विरुद्ध निवडणूकीच्या रिंगणात होत्या. यात सासूचा पराभव करत 432 मतांनी प्रियंका यांनी विजय मिळवला आहे.

शिरूर तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अशीच परिस्थिती वारणी गावात देखील आहे. पाण्याची सोय नाही म्हणून अनेक जणांनी गावातून स्थलांतर केलंय. याचा सर्वाधिक सामना हा महिलांना करावा लागतो. आणि हीच बाब लक्षात घेत महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रियंका केदार निवडणुकीत उभ्या राहिल्या आणि मतदारांनी देखील त्यांच्यासह इतर महिलांना निवडून दिलंय. महिलांच्या हाती गावाचा कारभार गेल्याने काहीतरी बदल होईल अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

ग्रामीण भागात केवळ चूल आणि मूल इथपर्यंतच महिलांच्या सीमा होत्या.. मात्र आता शहरातील महिलांप्रमाणेच ग्रामीण भागातील महिला देखील मागे नाहीत. हेच प्रियंका केदार आणि त्यांच्या पॅनल मधील महिलांनी दाखवून दिलं आहे..