नामांतर लढा, एकिकरणाचा धडा

105

चौदा जानेवारी हा दिवस म्हणजे आंबेडकरवादी चळवळी साठी त्याग, समर्पण, बलिदान, एकी आणि आदर्श संघटनेमधुन निर्माण झालेला स्वाभिमान व स्वाभिमानासाठी पेटलेल्या शहिद व वेगवेगळ्या राजकीय नेते कार्यकर्ते सामाजिक संघटना थोडक्यात जे कोणी आंबेडकरवादी आहे त्यांच्या लढ्याचा विजय दिवस होय. मराठवाडा विद्यापिठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे म्हणून सभागृहात ठराव पास होऊनही धर्मांध व जातीची घाण डोक्यात असलेल्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला जातीचे स्वरूप दिले आणि विरोध दर्शविला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि औरंगाबाद चे जवळचे संबध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय सुरू करून बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारे उघडी करून त्यांना सर्वांगीण विकासाची संधी निर्माण करून दिली.

डॉक्टर बाबासाहेब यांच्या मुळे औरंगाबाद मधीलच नव्हे देशातील करोडो बहुजनां शिक्षण, संरक्षण, आरक्षण,स्वातंत्र्य आणि हक्क अधिकार मिळाले आणि बहुजन समाजात शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक क्रांती झाली. अशा थोर महापुषांचे नाव एका जातीशी जोडून त्यांना मर्यादित करण्याचा प्रयत्न त्यामुळे अनेक राजकीय, सामाजिक नेते काही संघटना यांच्या कडून झाला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्याग समर्पणामुळे आमचे अस्तीत्व आहे याची जाणीव असणाऱ्या बहुजन समजातील आंबेडकरवादी नेते कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांनी विद्यापिठाला नाव मिळालेच पाहिजे याचा आग्रह धरला आणि तेथून खरा लढा सुरू झाला तो आणि सतत तो लढा वाढत गेला. इतिहासाने मराठवाडा विद्यापिठा नामांतर लढा जो आहे तसा लढा कदाचित बघितला नसेल. म्हणून नामांतर लढा हा बहुजन समाजातील आंबेडकरवादी समाजासाठी अस्मीता व स्वाभिमान म्हणून खुप महत्वाचा आहे. १९७८ ला सुरू झालेला लढा १४ जानेवारी १९९४ ला शमला आणि नामविस्ताराच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव विद्यापिठाच्या पटलावर आले.

१९७८ ते १९९४ हा काळ आंबेडकरवादी समुदायासाठी खुप महत्वाचा काळ होता १९७८ पासुन १९९४ पर्यंत चा काळ बघितला तर या समाजाचे खूप काही घमावले आहे. परंतु सोळा सतरा वर्षात जे काही गमावले ते फक्त एका नावामुळे विसरून गेले, गमावलेल्या गोष्टींचे चिज झाले ते फक्त एका नावाने. नाव विद्यापिठाला मिळाले आणि आंबेडकरवादी समाजाच्या जखमा भरून आल्या सारखे झाले. ज्या महापुरुषाने आयुष्य भर जातीअंता साठी लढा दिला त्याच महापुरुषाला जातीत बंद करून नावाला विरोध म्हणजे बौद्धीक अपंगत्वाचे व जातिय द्वेषाचे उदाहरणे होते.

विद्यापिठाचे नामांतर व्हावे म्हणून म्हणून जो सोळा सतरा वर्षाचा काळ होता तो काळ खूप वेदना दायक होता कारण नामांतर लढ्याने हिंसक वळण घेतले. नामांतर विरोधी व नामांतर समर्थक समोरा समोर येत होते. सोळा वर्षामध्ये अनेक घरे समाजकंटकांनी जाळून टाकली, नामांतर लढ्यामुळे आंबेडकरवादी समाजावर बहिष्कार टाकला, सार्वजनिक ठिकाण, गावातील मुलभूत सुविधेपासुन दुर ठेवण्यात आले. महिलांवर अत्याचार केल्या गेले विद्यार्थांवर अत्याचार केले गेले. आंदोलनावर दगडफेक, लाठीहल्ला अशा प्रकारचे हिंसक कृत्य एक दोन दिवस नव्हे तब्बल पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ चालले. थोडा तरी विचार केला तर खरचं अंगावर काटा येतो, डोळ्यातून अश्रू येतात. येथील स्त्रियांना पाणी, दैनंदिन जगण्यासाठी वस्तु मिळत नव्हत्या गावामध्ये काम मिळत नसे पाणी नाही मिळाले तरी चालते हाताला काम नसेल तरीही चालते पण विद्यापिठाला नाव पाहिजे कारण वर्षानुवर्षे जे मृत अवस्थेत होते त्यांच्या शरीरात प्राण ओतण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आणि त्याची जाणीव समाजाला होती. घरे जाळली जात होत महिलांवरील अत्याचार वाढले होते तरही विद्यार्थी संघटना, नेते महिला खचुन गेल्या नाही. अनेक महिला नुकतेच जन्माला आलेले बाळ घेऊन नामांतर लढ्यात सहभागी झाले कारण लढा फक्त नावाचा नव्हता तर स्वाभिमानाचा होता.

एवढे सारे होऊनही कुणीच डगमगले नाही कुणीच माघार घेतली नाही कारण तेव्हा ताकद निर्माण झाली होती ती एकीची. या लढ्यामध्ये नेतृत्वासाठी वाद नव्हते, कोणी लहान कोणी मोठे नव्हते, मीच करणार किंवा माझ्याच मुळे होणार अंहकार नव्हता, मला काही मिळेल हा स्वार्थ नव्हता म्हणून अनेक नेते कार्यकर्ते यांनी लढ्यामध्ये लाठीहल्ला सहन केला, तुरुंगवास भोगला पण खचले नाही किंवा त्यावेळी श्रेय स्वत: कडे घेतले नाही. प्रत्येक जन एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपापल्या परिने नामांतर लढा लढत होते. अनेक विद्यार्थ्यांना या मध्ये स्वतः चा जिव गमवावा लागला. काही तरुणांनी आत्मदहण करून सरकार आपले बलिदान दिले. नामांतर लढ्यात जे शहिद झाले ते शहिदांचे योगदान व जे कार्यकर्ते नेते यांनी योगदान दिले त्यांचे कार्य, योगदान, त्याग हे विसरता येत नाही आणि त्याची तुलना करता येत नाही एवढे ते त्या त्या ठिकाणी योग्य होते. एकिकरणाच्या माध्यमातून सतत सोळा वर्षे लढा देऊन इतिहासाला सुद्धा दया आली असेल परंतु येथील कर्मठ लोकांना दया येत नव्हती. कोणी दयामाया करावा म्हणून लढाही नव्हता. परंतु आंबेडरकवादी समुहाने हे सगळं सहन केले आणि त्यांच्या कार्याला, त्यागाला यश मिळाले यातच धन्यता मानली.

सतत सोळा सतरा वर्षे लढा अविरत पणे सुरू राहीला तो फक्त एकीमुळे संघटीत समुहामुळे फक्त एका मुद्यावर लोक संघटीत झाले आणि एक नव्हे दोन नव्हे सतत सोळा वर्ष संघर्ष केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संदेश दिला होता तो खऱ्या अर्थाने सार्धक होत होता. कारण या लढ्यामध्ये शिकलेले आणि शिकणारे तरुण होते, सर्वजन एकामुद्यावर संघटीत झाले होते कोणताही वैद्यक्तीक भेद वा वाद नव्हता आणि संघर्ष तर संघर्षाला लाजवेल असा संघर्ष केला आणि जातीवादी, विषमतावादी, कर्मठ लोकांच्या मनात धास्ती भरली मनोमन ते लोक हरले होते परंतु सत्तेचा दुरुपयोग करून येथील समाजाला दाबण्याचा प्रयत्न केला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा या संदेशाने पेटून उठलेल्या जनसमुदायाने आपला विजय निश्चितच केला नाही तर याच एकीने महाराष्ट्राला खासदार, आमदार, मंत्री देऊन राजकीय वजन देखील वाढवले. आंबेडकरवादी समुदायाचे प्रश्न मांडुन त्यांच्या हक्क अधिकारासाठी आवाज उठणारे लोक सभागृहात होते म्हणून समजाला राजकीय संरक्षण सुद्धां या एकिकरणा मुळे व संघटीत झाल्यामुळे मिळाले व त्या वेळी अनेक प्रश्नही निकाली काढल्या गेले, आंबेडकरवादी समाजाचे हित लक्षात घेतले गेले हे कोणी नाकारू शकत नाही.

त्याच लढ्यातील शहीद विरांना मानवंदना देण्यासाठी, एकीकरणाची व संघर्षाची महती बघण्यासाठी लाखो लोक १४ जानेवारी ला विद्यापीठ गेटवर येतात शहीदांना व विद्यापिठ गेटला मानवंदना देऊन आम्ही आजही त्यांचे सामाजिक कर्जदार आहोत याचे भाण ठेवून नतमस्तक होतात, त्यांचे कर्ज आज फिटू शकत नाही परंतु आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही याची जाणीव ठेवून खेडोपाडी राहणाऱ्या वयस्कर महीला, लहान थोर समुदाय लाखोंच्या संख्येने येतो. मानवंदना देतो पण खंत आहे जाताना घरी काय घेऊन जातो? आज कोणी मान्य करेल किंवा करणार नाही परंतु वास्तविकता आहे आंबेडकरवादी समाजाचे राजकारणात वजन राहीले नाही याचे कारण एकच आहे ते म्हणजे आज आंबेडकरवादी नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एकी नाही. एकिने मिळवलेला विजय १४ जानेवारी ला धुमधडाक्यात साजरा होतो परंतु हा साजरा करताना बेकीचे विचारपिठ दिसतात, जो जो स्वतः ला श्रेष्ठ ठरवून स्वतः ची महती सांगण्यात व्यस्त असतो परंतु याच मुळे आंबेडकरवादी आमदार खासदार आज सभागृहात नाहीत यांची खंत कुणाला वाटत नाही. वेगवेगळे स्टेज तयार करून बेकी दाखवताना सुद्धां काहीच वाटत नाही.

स्वतः ला खरे आंबेडकरवादी समजणाऱ्या कार्यकर्ते व नेते यांनी किमान १४ जानेवारी ला तरी सर्वानी एकाच स्टेजवर येऊन एकी व संघर्षावर बोलावे, एकत्र येऊन मानवंदना द्यावी यातुन समाजात चांगला संदेश जाईल आणि स्वतः चे लेबल लाऊन स्वतः चे स्टेज थाटून त्यावरून भाषने देण्यासाठी महोत्सव काय राजकीय नाही. म्हणून नामविस्तार दिन साजरा करताना आंबेडकरवादी नेते कार्यकर्ते यांनी एका दिवसासाठी का होईना एकत्र यावे एक स्टेज एक विचार द्यावा आणि हिच खरी मानवंदना नामांतर लढ्यात शहिद झालेल्या शहीदांना राहील. आणि पुन्हा एकीकरणाचा धडा घेऊन लोक परत जातील आणि पुन्हा परिवर्तनाला कुठे सुरवात होईल.. नामविस्तार दिनाच्या समस्त बांधवांना मंगलमय सदिच्छा…
*************************************
✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(रा.आरेगांव,ता मेहकर)मो:-9130979300
*************************************