देशाला वाचवणारी विचारधारा निर्माण करणे हेच खरे देशभक्तीचे काम: कडूदास कांबळे

32

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.18जानेवारी):- देशाला वाचवणारी विचारधारा निर्माण करणे हेच खरं देशभक्तीचा काम असल्याचे मत मानवाधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात कुरुळी तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे कडूदास कांबळे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.सामाजिक कार्यकर्त्या क्रांती संस्थेच्या अध्यक्षा सुनिता भोसले यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी शिरूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार श्याम पानेगावकर, सरपंच संभाजीराव घोरपडे, पोलीस पाटील नामदेवराव घोरपडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष अर्जुन बोरकर आणि बामसेफ चे कार्यकर्ते राजू वेताळ यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना कडूदास कांबळे पुढे म्हणाले की, ‘देशात सध्या माणसा माणसात फूट पाडून जातीयतेचे विष पेरण्याचे काम चालू आहे. देशाला अडचणीत आणण्याची असंविधानिक विचारधारा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाच्या मार्गाने काम करणारी फुले, शाहू, आंबेडकर , अण्णाभाऊ या महामानवांची विचारधाराच देशाला वाचू शकते. धर्माधिष्ठित राष्ट्र निर्मितीपेक्षा धर्मनिरपेक्ष राष्ट्र घडवणारी विचारधाराच देशाला वाचवणारी विचारधारा आहे. ही विचारधारा वाढविणे हेच खरे देशभक्तीच काम आहे.

क्रांती संस्थेच्या अध्यक्षा सुनीता भोसले यांनी आदिवासी भिल्ल आणि सरकारी जागेवर पिढ्यान पिढ्यापासून घरे बांधून राहात असलेल्या भूमिहीन शेतमजुरांच्या प्रश्नांची मांडणी केली. नायब तहसीलदार श्याम पानेगावकर यांनी कॅम्प घेऊन रेशन कार्ड, जातीचे दाखले, आधार कार्ड आणि मतदान कार्ड देण्याचे काम महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने करूयात असा संकल्प यावेळी व्यक्त केला. राजू वेताळ सरांनी संविधानाच्या अधिकाराविषयी मांडणी करून आजही या देशातील गोरगरीब समाजाकडे रहिवासी पुरावे नसल्याची खंत व्यक्त केली.

सरकारी योजना मिळविण्यासाठी तसेच आपली ओळख तयार करण्यासाठी आम्ही मिळून प्रयत्न करू असा निर्धार उपस्थित मानवी हक्क रक्षक कार्यकर्त्यांनी करून शिबिराची सांगता करण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बिबीशन गायकवाड, प्रतीक जाधव, शुभम पाडळे, अमोल भोसले, जयराम कांबळे, रामा धारवाड, आन्ना रगड, अनिल मोरे यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी शिरूर तालुक्यातील बहुसंख्य महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी या मानवाधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभाग नोंदवला होता.