चित्रा आत्याबाई, उर्फी ताईला माफ करा!

66

उर्फी जावेद नावाची मुलगी. कमी कपड्यात फोटो आणि व्हिडिओ माध्यमांना प्रसारित केले.प्रस्थापित रजिस्टर्ड माध्यमे, जे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवतात ,त्यांनी या विषयाला नैशनल इव्हेंट चा दर्जा देऊन प्रसिद्धी दिली. जिवनाश्यक बातमी ला वेळ नाही पण या बातमीला अतिरिक्त कव्हरेज देऊन चौथा स्तंभाला चिंच चावली कि काय, असा तर्क होऊ लागला.त्यात फोडणी घातली आत्याबाई चित्रा वाघ यांनी. उर्फीचा नो बॉल,वाईल्ड बॉल सुद्धा वाया जाऊ दिला नाही. प्रत्येक चलचित्राला चित्राबाईंनी स्ट्रोक मारला.मराठी माणसांनी क्रिकेट पाहाणे सोडून या मॅच कडे जास्त लक्ष दिले. क्रिकेट काय, बारा महिने तेरा वर्षे चालते. पण हा असा कमी कपड्याबद्दलचा सासू सून मधील वाद संवाद खूप मोठ्या कालखंडानंतर पाहायला मिळतो. म्हणून तरूणांना मागे ढकलून बाबा लोकांनी टिव्हीला खेटून उभे राहून पाहिला. ते बाबा पाठमोरे उभे असल्याने त्यांच्या मनातील स्पंदने, कंपने चेहऱ्यावरील भाव, हावभाव मला टिपता आला नाही.उलगडा झाल्यावर कळवतो वाचकांना.

महाभारतात द्रौपदीचे वस्त्रहरण वर्णन केले आहे. काही कलाकारांनी त्यावर नाटक, सिनेमा बनवला.तेंव्हा सुद्धा असाच वाद निर्माण झाला होता. द्रौपदीचा रोल करण्यासाठी महिला कलाकारांनी हक्क सांगितला. दिग्दर्शकांनी तर डोक्यावर हात मारून घेतला. असे हात मारण्याच्या बॅड हॅबीट मुळे अनेक दिग्दर्शक बदनाम झालेत.द्रौपदीची भुमिका तर सोडा पण दुःशासन च्या भुमिकेसाठी अक्षरशः हाणामारी झाली होती. वस्रहरण मीच करणार! असा तिढा सोडवण्याचा अभ्यास भारतीय सुप्रिम कोर्टालाही नसेल.म्हणून शिवसेना कोणाची? हा वाद डोके खाजवत खाजवत टक्कल पडेपर्यंत सुटला नाही. येथे मात्र दिग्दर्शकाने आपल्या विशेष आधिकाराचा वापर करून हा तिढा सोडवला. पुरूषांना भुमिका देतांना दिग्दर्शक अधिकाराचा गैरवापर करू शकत नाहीत.यातील आश्चर्याचा भाग म्हणजे द्रौपदी ला वस्त्रे पुरवणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची भुमिका करायला कोणीच तयार झाले नाही.त्यासाठी गेस्ट आर्टिस्ट ला गळ घातली. निभावले. कसेबसे!

महाभारतस्य द्रौपदी रामायण:!
अत्युच्च रूचिताम पुरूषानाम!!

उर्फीने मात्र चांगलीच गुगली टाकली. चित्राबाईंना चक्क सासूचा दर्जा, प्रतिष्ठा, सन्मान देऊन स्टम्प आऊट केले. उर्फीची ही नम्रता आणि संस्कार वाखाणण्याजोगे ठरलेत.तिने गेमची बाजी पलटवली.गेमचेंजर ठरली. उर्फी एकतर्फी जिंकली.आणि येथे सासूबाईंचा पारा उतरला.काय पोरगी आहे ही! मी रागावते आणि ही घरात येऊ पाहाते. अनेक मुलांना शोधून पोरी मिळत नाहीत. सोलापूरला तर नवरदेवांची मोठी वेटिंग लिस्ट आढळली. नवरदेव हातघाईवर येऊन, आततायी होऊन, गुडग्याला बाशींग बांधून ,घोड्यावर बसून चक्क कलेक्टरच्या छाताडावर उभे ठाकले. कालाय तस्मै क्रोध:! विवाहेषु किं बाधा:! पण चित्रा आत्याबाई खूपच नशीबवान ठरल्या. एक मुलगी नको नको म्हणतांना सून बनते. चित्रा , आत्याबाई तुम्ही खूप नशीबवान आहात. वरमातांना हेवा वाटतो,तुमचा. पुर्वकर्म संचित:, इति प्रारब्ध कथीत: !
या नाट्य प्रसंगात आम्ही भगवान श्रीकृष्णाची भुमिका करायला तयार आहोत. उर्फीला साडी, चोळी, चुडा पुरवत आहोत. दुशासन रुपी काळपुरूषांनी अशी अवस्था करून ठेवली. दस्तुरखुद पितामह भिष्माचार्य सुद्धा त्रागा करीत म्हणाले, हे इश:,तू धृतराष्ट्राला दृष्टीहिन ठेवून खूप उपकार केलेत. तेच उपकार माझ्यावर केले असते तर तुझा मरेपर्यंत ऋणी राहिलो असतो. पापाचे दृश्य ,नको माझ्या डोळी. त्याहुनि आंधळा बराच मी! 

छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देऊन सन्मानाने परत पाठवले. तोच आदर्श आम्ही पालन करीत आहोत. उर्फीला साडी चोळी प्रदान करीत आहोत. आम्ही शिवसेनेत नसलो तरी जाणता राजांचा आदर्श मनात बाळगून आहोत. आपण सहर्ष स्विकार करावा. तुला तोकड्या कपड्यांकडे पाहून आम्हाला दुःख झाले आहे. आमच्या पोरींनी, नातींनी तसे पाहून तुझे अनुकरण करू नये. तसा दुर्धर प्रसंग त्यांच्यावर येऊ नये. चित्रा आत्याबाईंना जास्त खिजवू नये. त्यांनी तुझ्यावर रागवू नये. थोबाडीत मारू नये. तुला पोलिस संरक्षण मिळावे. अशी इडी सरकारकडे प्रार्थना करीत आहोत.तरूणींनी आमच्या उतारवयात असे बेअब्रू करू नये.खजिल करू नये.ऑनर डैमेजिंग करू नये. बापाने,भाऊने ऑनरकिलींग करू नये. अशी अपेक्षा करतो.चित्रा आत्याबाई ,उर्फी ताई पुन्हा अशी घोडचूक करणार नाही. माफ करा. मोठ्या मनाने.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव