देश-परदेशांत ओशो आश्रम का गाजले?

35

(ओशो पुण्यतिथी विशेष)

ओशो हे भारतीय गूढवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक होते. चंद्र मोहन जैन असे जन्मनाव असणारे, सन १९६०पासून आचार्य रजनीश म्हणून, सन १९७० व १९८०च्या दशकांमध्ये भगवान श्री रजनीश आणि सन १९८९पासून ओशो म्हणून ओळखले जाणारे ओशो हे आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवणारे महान संत होत. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असणाऱ्या ओशोंनी सन १९६०च्या दशकात सार्वजनिक वक्ते म्हणून भारतभर प्रवास केला. समाजवाद, महात्मा गांधी आणि संस्थात्मक धर्मांवर उघड टीका केल्याने ते वादग्रस्त ठरले होते. लैंगिकतेसंबंधी अधिक उदारवृत्ती स्वीकारण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे त्यांना आधी भारतीय आणि नंतर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये सेक्स गुरू अशी उपाधी मिळाली. सन १९७०मध्ये काही काळासाठी ते मुंबईत थांबले.

तेथे त्यांनी शिष्य जमविण्यास, नवसंन्यासी आणि आध्यात्मिक शिक्षक म्हणून भूमिका बजाविण्यास सुरुवात केली. आपल्या व्याख्यानांमध्ये त्यांनी धार्मिक परंपरांमधील लिखाणे, गूढवाद्यांचे लेखन व जगभरातील तत्त्वज्ञांच्या लिखाणाचे पुनरार्थबोधन केले. पुण्यात जाऊन १९७४मध्ये त्यांनी आश्रम स्थापला. अनेक पाश्चात्त्य लोक या आश्रमामध्ये येऊ लागले. या आश्रमात ह्युमन पोटेन्शियल मूव्हमेन्टवर आधारलेल्या उपचारपद्धती पाश्चात्त्य पाहुण्यांना दिल्या जाऊ लागल्या. मुख्यतः मुक्त वातावरण व ओशोंच्या सडेतोड व्याख्यानांमुळे देश-परदेशांत हा आश्रम गाजू लागला. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस भारत सरकार, सभोवतालचा समाज व आश्रम यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाले होते. सविस्तर माहिती वाचा, अलककार- श्री कृष्णकुमार निकोडे गुरुजींच्या या लेखातून… 

मध्यप्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यात असलेल्या कुचवाडा नावाच्या खेड्यात- आईच्या आजोळी तारणपंथी जैन कुटुंबात दि.११ डिसेंबर १९३१ रोजी चंद्र मोहन जैन ऊर्फ ओशो यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बाबुलाल जैन हे कापडाचे व्यापारी होते. ओशोंनंतर त्यांना आणखी दहा अपत्ये झाली. ओशोंच्या आईचे नाव सरस्वती होते. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत ओशो आजोळीच राहिले. खुद्द ओशोंच्या म्हणण्यानुसार आजीने दिलेल्या मोकळिकीचा त्यांच्या जडणघडणीवर परिणाम झाला. सातव्या वर्षी आजोबांचे निधन झाल्यानंतर ओशो गदरवारा येथे आपल्या आईवडिलांसोबत राहावयास गेले. आपल्या आजोबांच्या निधनाचा ओशोंच्या मनावर खोल परिणाम झाला होता. ओशो १५ वर्षांचे असताना त्यांची बालपणातील मैत्रीण आणि चुलतबहीण शशी हिचा विषमज्वर होऊन मृत्यू झाला. मृत्यूच्या या दर्शनाने ते बालपणात व तारुण्यात मृत्यूविषयी अधिक चिंतन करू लागले. शाळेत असताना ते बंडखोरपणे वागत असले तरी त्यांच्यातील प्रतिभा व दर्जेदार वाद-प्रतिवाद करण्याची त्यांची क्षमता लपून राहिली नाही. ते इ.स.१९५१मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी जबलपूरमधील हितकारिणी कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी दाखल झाले.

निदेशकाशी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर त्यांना कॉलेज सोडावे लागले आणि जबलपूरमध्येच डी.एन.जैन कॉलेजात ते स्थलांतरित झाले. अध्यापकांशी निरंतर वाद घालण्याच्या सवयीमुळे कॉलेजमधील उपस्थितीतून त्यांना सूट मिळाली. केवळ परीक्षेसाठीच कॉलेजमध्ये यावे अशा सूचना मिळाल्याने रिकाम्या वेळात ओशो एका स्थानिक वृत्तपत्रात सहायक संपादक म्हणून काम पाहू लागले. जबलपूरमध्ये दरवर्षी तारणपंथी जैन समुदायाचे सर्वधर्म संमेलन आयोजिले जाते. या संमेलनात भाषणे करण्यास त्यांनी सुरुवात केली. इ.स.१९५१ ते १९६८ या काळातील संमेलनांमध्ये ते सहभागी झाले. विवाहासाठी माता-पित्यांनी टाकलेल्या दबावास ते बळी पडले नाहीत. नंतरच्या काळात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२१ मार्च १९५३ रोजी वयाच्या एकविसाव्या वर्षी जबलपूरमधील भंवरताल गार्डनमध्ये एका वृक्षाखाली बसले असताना त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले.

डी.एन.जैन कॉलेजात सन १९५५मध्ये ओशो बीए- तत्त्वज्ञान झाले. सागर विद्यापीठातून सन १९५७मध्ये ते विशेष प्रावीण्यासह एमए- तत्त्वज्ञान झाले. रायपूर संस्कृत कॉलेजमध्ये लागलीच त्यांना अध्यापकाचे पद मिळाले पण विद्यार्थ्यांच्या नैतिकतेला, चारित्र्याला व धर्माला त्यांच्यामुळे धोका असल्याचे वाटल्याने उपकुलगुरूंनी त्यांना बदली करवून घेण्याचा सल्ला दिला. सन १९५८पासून ते जबलपूर विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून काम करू लागले. सन १९६०मध्ये त्यांना प्राध्यापक म्हणून बढती मिळाली. विद्यापीठातील कर्तव्ये सांभाळून ओशोंनी समांतरपणे आचार्य रजनीश- आचार्य म्हणजे गुरू. रजनीश हे त्यांचे बालपणातील टोपणनाव होते म्हणून भारतभर प्रवास करून समाजवाद आणि महात्मा गांधी यांचे परीक्षण करणारी व्याख्याने दिली. समाजवादाने केवळ दारिद्ऱ्याचेच समाजीकरण होईल आणि गांधी हे दारिद्ऱ्याची पूजा करणारे आत्मपीडक प्रतिक्रियावादी आहेत, असे ते मत मांडू लागले.

मागासलेपणातून बाहेर पडण्यासाठी भारताला भांडवलवाद, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान व लोकसंख्या नियंत्रणाची गरज असल्याचे त्यांचे मत होते. पारंपरिक भारतीय धर्म मृतवत आहेत, त्यांच्यात पोकळ धर्मकांडे आहेत, अनुयायांचे ते शोषण करतात, अशी ते जहरी टीका करू लागले. अशा वक्तव्यांमुळे ते वादग्रस्त ठरले, मात्र ओशोंना काही निष्ठावान अनुयायीही मिळाले. अशा अनुयायांमध्ये बरेच श्रीमंत व्यापारी आणि उद्योगपती होते. अशा अनुयायांनी देणग्या देऊन ओशोंकडून आध्यात्मिक प्रगतीसाठी व दैनंदिन जीवनासाठी सल्ले घेण्यास सुरुवात केली. हळूहळू हे लोण देशभर पसरले. सन १९६२पासून त्यांनी तीन ते दहा दिवसांची ध्यान शिबिरे घेण्यास प्रारंभ केला आणि नंतर जीवन जागृती आंदोलन म्हणून विख्यात झालेली ध्यानकेंद्रे उदयास आली. सन १९६६मधील एका वादग्रस्त व्याख्यान सत्रानंतर विद्यापीठाच्या विनंतीनुसार त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.

दि.२८ ऑगस्ट १९६८मध्ये मुंबईच्या भारतीय विद्या भवन सभागृहात प्रेम या विषयावरील पाच व्याख्यानांच्या मालिकेतील पहिले व्याख्यान ओशोंनी दिले. लैंगिक ऊर्जेच्या रूपांतरणातूनच प्रेम आणि ध्यान निर्माण होतात, असे त्यांनी म्हटले. लोकांमधून या मतावर संतप्त प्रतिक्रिया आल्या. आयोजकांनी व्याख्यानमाला रद्द केली. बरोबर एका महिन्यानंतर मुंबईतच गवालिया टँक मैदानावर प्रचंड श्रोतृसमुदायासमोर त्यांनी व्याख्याने देऊन मालिका पूर्ण केली. नंतर संभोगातून समाधीकडे या नावाने प्रकाशित झालेल्या या व्याख्यानमालेमुळे भारतीय माध्यमांनी त्यांना सेक्स गुरू अशी उपाधी दिली. सन १९६९मध्ये झालेल्या दुसऱ्या जागतिक हिंदू परिषदेत त्यांनी धर्मगुरूंवर स्वार्थीपणाचा आरोप केला आणि धर्म म्हणजे जीवनाचा आस्वाद कसा लुटावा हे शिकवणारी कला आहे, असे मत मांडले. त्यांच्या भाषणादरम्यान संतप्त झालेल्या पुरीच्या शंकराचार्यांनी भाषण थांबविण्याचा असफल प्रयत्न केला. सन १९७०मधील एका वसंतकालीन ध्यान शिबिरात ओशोंनी डायनॅमिक मेडिटेशन पद्धत प्रथम सादर केली.

जूनच्या अखेरीस मुंबई सोडून ते जबलपूरला निघाले. दि.२६ सप्टेंबर १९७० रोजी त्यांनी नवसंन्यासींचा पहिला गट स्थापन केला. ओशोंचे शिष्य अर्थात नवसंन्यासी होणे याचा अर्थ नवे नाव स्वीकारणे, विरागी हिंदू साधूंप्रमाणे नारिंगी वस्त्रे परिधान करणे असा होता. वैराग्यापेक्षा उत्सवपूर्ण जीवनशैली स्वीकारण्यास या नवसंन्यासींना प्रोत्साहन दिले जाई. स्वतः संन्याशाची पूजा होणे अभिप्रेत नव्हते, तर फुलाला उमलण्यास उत्तेजन देणारा सूर्य, अशी त्यांना भूमिका पार पाडावयाची होती. इथवरच्या काळात सचिव म्हणून कार्य करणाऱ्या लक्ष्मी ठाकरसी कुरुवा या त्यांच्या पहिल्या शिष्या ठरल्या आणि त्यांनी मा योगलक्ष्मी हे नाव घेतले. लक्ष्मींचे वडील धनवान होते आणि ओशोंचे अनुयायी होते. लक्ष्मींनीच पैसे उभे करून ओशोंचे प्रवास थांबविले. डिसेंबर १९७०मध्ये ओशो मुंबईतील वुडलँड्स अपार्टमेंटमध्ये निवासास गेले व व्याख्याने देत अभ्यागतांना भेटू लागले. येथेच त्यांना प्रथम पाश्चात्त्य श्रोते लाभले. यानंतर ओशोंचा प्रवास आणि सार्वजनिक सभांमधील व्याख्याने जवळजवळ बंद झाली. सन १९७१मध्ये त्यांनी भगवान श्री रजनीश ही उपाधी स्वीकारली. श्री हा सन्मानसूचक शब्द आहे तर भारतीय परंपरेमध्ये ज्या व्यक्तीमधील देवत्व लपून राहिलेले नाही, स्पष्ट दिसू लागले आहे, अशी व्यक्ती म्हणजे भगवान ठरते.

मुंबईच्या दमट जल वायुमानामुळे ओशोंना मधुमेह, दमा आणि विविध प्रतिक्रियात्मक आजार, अशा व्याधी जडल्या. सन १९७४मध्ये ते पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये निवासास आले. मा योगमुक्ता- कॅथरीन व्हेनिझिलोस हिच्या मदतीने त्यांनी ही जागा विकत घेतली होती. येथे सन १९८१पर्यंत ते शिकवीत राहिले. ही जागा आजच्या ओशो आंतरराष्ट्रीय ध्यानकेंद्राच्या मध्यभागी आहे. या जागेवरच ध्वनिमुद्रण आणि नंतर ध्वनिचित्रमुद्रण सुरू झाले. त्यांच्या व्याख्यानांचे मुद्रणही येथेच सुरू होऊन त्यांच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार वाढला. पाश्चिमात्य अभ्यागतांची संख्या खूप वाढली. या जागेवर नंतर कपडे, दागदागिने, मृत्तिकाशिल्पे व सेंद्रिय सौंदर्यप्रसाधने बनविणारे केंद्र उभे राहिले. रंगमंच, संगीत व मूकाभिनयाचे कार्यक्रम येथे होऊ लागले.

सन १९७५नंतर पुण्यात ह्युमन पोटेन्शिअल मूव्हमेंटमधील मानसोपचारक आले आणि ध्यानासह उपचारपद्धती हा आश्रमाच्या मिळकतीचा मोठा स्रोत ठरला. पुण्यातील आश्रम ही एक गजबजलेली जागा होती. सकाळी ध्यान, मग बुद्ध हॉलमध्ये एक ते दीड तासांची त्यांची विविध विषयांवरील व्याख्याने व प्रश्नोत्तरे; दिवसभर विविध उपचार, रात्री शिष्यांशी आणि श्रोत्यांशी वैयक्तिक संवाद, नव्या शिष्यांना दीक्षा देणे, असे कार्यक्रम असत. कोणत्या मानसोपचारांत सहभागी व्हावे? याबाबत लोक त्यांचा सल्ला घेत किंवा स्वतःच निवड करीत. आश्रमातील प्रारंभीचे काही उपचारगट हे प्रयोगात्म होते. काही गटांमध्ये शारीरिक आक्रमकतेला तसेच लैंगिक आक्रमकतेलाही थोडीफार मुभा होती. अशा काही गटांच्या उपचारांदरम्यान झालेल्या जखमांचे उलटसुलट तपशील वृत्तपत्रांमध्ये येऊ लागले. जाने.१९७९मध्ये उपचारगटांतील हिंसा संपुष्टात आली. नंतरच्या काळातही आश्रमातील रहिवाशांकडून मादक द्रव्यांचा वापर, वेश्याव्यवसायासारखे प्रकार यांमुळे हा आश्रम वादग्रस्तच राहिला. सत्तरीच्या दशकाच्या अखेरीस हा आश्रम त्यांना अपुरा वाटू लागला, पर्यायी जागेसाठी चाचपणी सुरू झाली. आश्रम हलविण्यास त्यांचा मानस कधीच प्रत्यक्षात उतरू शकला नाही.

मोरारजी देसाई यांचे जनता पक्ष सरकार आणि आश्रमातील तणावाचे संबंध त्यासाठी कारणीभूत ठरले. भूमी-वापराची मान्यता रद्द केली गेली आणि पूना आश्रम हे मुख्य गंतव्यस्थान दाखविणाऱ्या परदेशी अभ्यागतांना प्रवेशपत्र देणे सरकारने बंद केले. देसाई सरकारने पूर्वलक्ष्यी प्रभावाने आश्रमाची कर-सवलत रद्द करून अंदाजे पन्नास लाख रुपयांचा बोजा आश्रमावर पाडला. विविध धार्मिक नेत्यांशी असलेले मतभेदही आश्रम-स्थलांतराच्या आड आले. दि.२२ मे १९८० रोजी सकाळच्या व्याख्यानादरम्यान विलास तुपे नावाच्या हिंदू मूलतत्त्ववाद्याने ओशोंच्या दिशेने चाकू फेकला. स्थानिक पोलिसांना आधीच सुगावा लागलेला असल्याने ते सभागृहात हजर होते. पोलिसांनी तुपेला ताब्यात घेतल्यानंतर ओशोंनी व्याख्यान सुरूच ठेवले होते.

सन १९८१मध्ये ओशो अमेरिकेत स्थलांतरित झाले. ऑरेगाॅन राज्यात त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेला सहेतुक समाज पुढे रजनीशपुरम म्हणून नावारूपाला आला. वर्षभरात या कम्यूनचा स्थानिक रहिवाशांशी जमिनीवरून कटू वाद उभा राहिला. अनुयायांनी ओशोंना वापरासाठी खरेदी करून दिलेल्या रोल्स-रॉयसही कुप्रसिद्ध ठरल्या. सन १९८५मध्ये कम्यूनच्या नेतृत्वाने जैवदहशतवादी हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे केल्याचे ओशोंनी उघड केल्यावर ऑरेगाॅन कम्यून कोसळले. लवकरच ओशोंना अटक झाली आणि देशागमनादरम्यान केलेल्या नियमभंगाचा आरोप त्यांच्यावर लागला. युक्तिवादाच्या तडजोडीनुसार ओशोंना अमेरिका सोडावी लागली. एकवीस देशांनी त्यांना प्रवेश नाकारला व जगभ्रमंतीनंतर ते पुण्यात आले. दि.१९ जानेवारी १९९०मध्ये त्यांचे पुण्यात निधन झाले. आज त्यांचा आश्रम ओशो आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र म्हणून ओळखला जातो. ओशोंच्या बहुमिश्र शिकवणीमध्ये ध्यान, जागृतता, प्रेम, उत्सव, धैर्य, सृजनशीलता आणि विनोद यांना महत्त्व आहे. स्थितिशील श्रद्धा, धार्मिक परंपरा आणि समाजीकरणामुळे या बाबी दबल्या जातात असे त्यांचे मत होते. पाश्चात्त्य नवयुग विचारांवर ओशोंच्या विचारांचा पगडा दिसतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांची लोकप्रियता वाढलेलीच दिसत आहे.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे पावन पुण्यस्मरण दिनी आचार्य रजनिशांना विनम्र अभिवादन !!

✒️अलककार:- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी(संत- महापुरुषांच्या प्रेरक जीवनचरित्रांचे गाढे अभ्यासक)गडचिरोली, फक्त व्हॉट्सॅप- ९४२३७१४८८३