आत्मिकता व त्यासोबतच मानवता!

33

[५६वा वार्षिक महाराष्ट्र निरंकारी संतसमागम औरंगाबाद निमित्त]

सन २०२३मधील महाराष्ट्राचा प्रादेशिक वार्षिक निरंकारी संतसमागम पावन स्थळ- डीएमआयसी बिडकीन ता.पैठण जि.औरंगाबाद येथे दि.२७ ते २९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यात “रुहानियत और इन्सानियत संग संग…” या अनाकलनीय पण अत्यावश्यक विषयावर ब्रह्मज्ञानी संतसज्जन व गुणीजन मार्गदर्शन करणार आहेत. कारण खरा माणूस ब्रह्मवेत्त्या सद्गुरूला शोधून त्याच्याकडून ब्रह्मप्राप्ती करून घेतो. तत्पश्चात त्याच्या अंगी आत्मिकता रूजू लागते. आत्मिकता या दिव्य गुणासोबतच त्याच्या मनीमानसी मानवतासुद्धा घर करू लागते. आत्मिकता, मानवता, मानव एकता तथा विश्वबंधुत्व म्हणजे काय? ते कसे सिद्ध व साकार करू शकतो? आदी शंका-कुशंकांचे बाळबोध शब्द आणि दृष्टांताद्वारे अलबत समाधान करण्याचा खासा प्रयत्न बापू- श्रीकृष्णदास निरंकारीजींनी येथे केला आहे… 

माणसाच्या हृदयापासून निघणारे वचन आणि त्यानुसार होणारे कर्म यांत समानता दिसून आली पाहिजे. तो कधी कधी अत्युत्साहाने मुखावाटे अशक्यप्राय गोष्ट बोलून जातो. मग मात्र बोलल्याप्रमाणे कृती करण्याची मुळात त्यात क्षमताच नसते. त्यामुळे त्याचे बोल “बोल बोल नुसतं कांद्यांचं फोल” सिद्ध होतात. आपण जसं बोलू तसं वागू, यास्तव पाठीवर सर्वशक्तिमान पाठीराख्याचा हात असावा लागतो. असा सर्वशक्तिमान पाठीराखा जगात सद्गुरूशिवाय दुसरा कोण असू शकेल? सद्गुरू प्रेरित हदयस्थ भाव हे अतिशय कळवळा, तळमळ, आत्मविश्वास, आत्मभान व आत्मियता यांचे उद्घोषक ठरतात. त्यांत एक प्रकारचा आव नसतो तर तडफदार ताव असतो. ही अंतरात्म्यातून निर्माण झालेली एक महान शक्ती असते. तिलाच जगाच्या मालकाने, आपल्या सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराजांनी आत्मिकता म्हणून संबोधले आहे. अशी आत्मिकता ज्या ज्या महापुरुषांच्या अंगांगात भिनली त्या त्या महापुरुषांची पाऊले मानवतेच्या मार्गावर आपोआप चालू लागली आहेत. वेगळा असा मानवता मार्ग चोखाळण्याची, साकारण्याची किंवा आखण्याची काहीही गरज नाही, असे दासाला वाटते. कोणत्याही व्यक्तीला धरून-बांधून, मारून-मुटकून तिच्यात आत्मिकता रूजविता येत नाही. जो वर्तमान पैगंबर- समर्थ सद्गुरूला शरण जातो, तोच सद्गुरू कृपेने आत्मिकता बरोबरच खडतर अशा मानवता मार्गावर आपोआपच आनंदाने चालू लागतो. यासाठीच ग्रंथकार शहंशाह अवतारसिंहजी महाराज फर्मावतात-

“सच्ची मंज़ल सच्चा मारग हर बन्दे नूं भुल्ला ए|
कहे अवतार गुरु दा एह दर हर बन्दे लई खुल्ला ए|”
(सम्पूर्ण अवतार बाणी: पद क्र. ३५७)

आपुलकी, प्रेम, नम्रता, दया, क्षमा, शांती आदी दैवीगुणांमुळे आत्मिकता अधिक प्रबळ आणि शृंगार चढविल्याप्रमाणे सुंदर होते. आत्मिकतेच्या अंतःप्रेरणेच्या बळावर म्हणजेच आंतरिक तळमळीने दास सचेत करत आहे. यात मानवता वा माणुसकीच्या नात्याचा ओलावाही अंतर्भूत आहे. लोक कोणाच्याही चोपड्या-चोपड्या गोष्टींवर भुलून- भाळून आंधळेपणाने कसाही गुरू करतात. पूजापाठ, होमहवन, मंत्रतंत्र, जारणमारण, जादूटोणा किंवा इतर क्रियाकलाप सांगणारा गुरू करतात. संपत्ती, संतती व आयुरारोग्य यासाठीच आपला जन्म समजतात. यांत मानवी जीवनाचा मूळ उद्देशच बाजूला राहतो. ईश्वरप्राप्ती हाच तो खरा मूळ उद्देश आहे. आपण त्यांच्याजवळ देव पाहण्याची इच्छा व्यक्त केली, तर ते वेळ मारून नेतात. ते प्रांजळपणे कबुली देतात, “आजवर देवाला कोणीच पाहू शकले नाही, मग मी तरी कसा बघेन? मी प्रयत्नरत आहे.” अर्थात- मी जागतच आहे; तसे तुम्हीपण जागतच रहा! असाच काहीसा अर्थ निघतो. माघार न घेता ते पुढे सांगतात, जप, तप, व्रत, उपवास, शिर मुंडन, देह दंडन करत रहा. पूजापाठ, मंत्रोच्चार, होमहवन, आदी करत रहा, दरम्यान तुम्हाला साक्षात्कार होईल. स्वप्नामध्ये देव दर्शन देईल. हे सर्व उपद्व्याप आहेत, ते सर्व भ्रम, भ्रांत, खोटे आणि फसवणूक करणारे उद्योग आहेत. यात आपले सोन्यासारखे जीवन व वेळही बरबाद होत असते. तो हा परब्रह्म विठ्ठल ब्रह्मदर्शी- ब्रह्मवेत्ता सद्गुरू प्राप्त झाल्याशिवाय खऱ्या विराटरुपात दिसेलच कसा? संत महात्म्यांनी अभंगवाणी व संतवचनांद्वारे सांगितले आहे, की देवाला पाहता, जाणता, मानता व पुजता येतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे-

“हरि पाहिला रे, हरि पाहिला रे।
हरि येथे रे, हरि तेथे रे।
हरि विण स्थान नाही रिते रे।
सबाह्यांतरी अवघा व्यापक मुरारी।।”

कोण म्हणतोय, ईश्वर पाहण्यासाठी संपूर्ण आयुष्य वाया दवडावे लागते म्हणून… भगवान श्रीकृष्णाने धनुर्धर अर्जुनास एका क्षणार्धात- डोळ्याची पापणी झाकून परत उघडत नाही एवढ्या वेळात आपले विशालरूप दाखविले होते. मग हे खोटे म्हणावे का? हे खरे आहे, म्हणत असाल; तर याचा प्रत्यय आपण घेऊ शकत नाही का? अवश्यच घेऊ शकतो. आपण डोळसपणे- डोळे उघडे ठेऊन सद्गुरू केला पाहिजे. “तो म्हणाला म्हणून मी गुरू केला.” अशी भूमिका आपल्या सर्वनाशास कारण ठरते. गुरूला आपणच कसोटीवर तपासून घेऊन नंतरच त्यास आपल्या हृदयात सद्गुरूस्थानी विराजमान केले जावे. स्वामी विवेकानंदजींनी तब्बल चोवीस गुरूंना कसोटीच्या तत्वांवर चाचपून पाहिले व नंतर पिटाळून लावले. रामकृष्ण परमहंस यांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. म्हणून त्यांना आपल्या हृदयात सद्गुरूस्थानी विराजमान केले. त्यांच्या कृपाशीर्वादाने त्यांनी आत्मिकतासह मानवतेची डगर सहजच सर केली. त्यांनी “आलं उतू अन् घातलं चाटू” अशी घाई, गडबड कधीच केली नाही. आपल्यालाही त्याच तत्वांच्या आधाराने सद्गुरू- परमगुरू शोधणे अत्यावश्यक आहे. स्वामी विवेकानंदजी तथाकथीत गुरूंना तीन प्रश्न विचारत होते. तेच तीन प्रश्न आपणही उपयोगात आणलेच पाहिजे. दासाने सुद्धा प्रथम याच तत्वांच्या कसोटीने निरंकारी ब्रह्मज्ञान घेतले. कुणीतरी सांगितले आणि दास लगेचच फसी पडला, नादी लागला किंवा फंदी झाला, असे मुळीच नाही.

ते प्रश्न असे- १) या जगात देव आहे का? जर उत्तर- आहे, तर पुढचा प्रश्न- २) तुम्ही देवाला पाहिले का? जर उत्तर- होय, तर पुढचा प्रश्न- ३) मला दाखवू शकाल का? जर उत्तर- होय, असेल तर तोच आपला सद्गुरू मानावा. त्याचे चरण धरून त्यास अनन्यभावाने शरण जावे आणि त्याचेकडून ब्रह्मज्ञान घ्यावे अर्थात ईश्वरप्राप्ती- देवदर्शन म्हणजेच देवाची ओळख पटवून घ्यावी. तेव्हाच आपणास पुढील संतवचन सत्यवचन वाटेल-

“मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश!
माझा देव माझ्याकडे पहात आहे!”

निरंकारी मिशनच्या विश्वबंधुत्व अभियानात जगातील सर्व जाती, धर्म, पंथ, वर्ण आदी वैविध्याची कोणीही व्यक्ती नि:संकोचपणे प्रवेश घेऊ शकते. मात्र तत्पूर्वी निरंकारी ब्रह्मज्ञान सहकुटुंब प्राप्त करणे अगत्याचे ठरते. दूधपित्या बालकांपासून तर सर्व वयोगटातील स्त्रीपुरुषांना ब्रह्मज्ञान घेण्यास काहीच आडकाठी नाही. वरील सद्गुरू पडताळ्याचे प्रश्न छोटे बालक वगळून परमपिता परमात्म्याविषयीच्या ज्ञानावर जे सांगू, बोलू वा चर्चा करू शकतात, अशा निरंकारी बंधुभगिनींना विचारावेत. ते आपणास वरील तीनही प्रश्नांची चटकन उत्तरे देऊ शकतात. मात्र तिसऱ्या प्रश्नाच्या प्रत्यक्ष कृतियुक्त उत्तरासाठी मंडळाच्या मान्यताप्राप्त ज्ञानदाता- ज्ञानप्रचारक महात्मा किंवा भगिनी यांच्याकडे घेऊन जातील. तेथे आपल्याला काही आढेवेढे न घेता, काही काळ वाट पाहण्यास न लावता तत्क्षणी देवदर्शन घडविले जाते. म्हणून संतवचनाप्रमाणेच दासाला सुद्धा भरकटत जाणाऱ्या किंवा तटस्थ लोकांविषयी आत्मिक कळकळा दाटून येतो. युगदृष्टा बाबा हरदेवसिंहजी महाराज म्हणतात-

“मानवता की नेक डगर से भटक गया इन्सान क्यों।
अपने संग औरों की हानि करता है नादान क्यों।
सन्तों का रस्ता सुगम है उस पर बन्दे चलता चल।
कहे ‘हरदेव’ मिलेगी मंज़िल पग पग आगे बढ़ता चल।”
(सम्पूर्ण हरदेव बाणी: पद क्र. १५४)

दास हरिच्या लाडक्या भक्तांना विनंती करतो, की बांधवांनो, मानव जन्माचे सार्थक करण्यासाठी डोळसपणे सद्गुरू करावा जी! कारण ब्रह्मज्ञानी संत महापुरुषांच्या घरी विठ्ठल परब्रह्म स्वतः राबत असत, हे आम्ही संतचरित्रांतून वाचत आलोत. दासाला ती चमत्कारिक गोष्ट खोटीच वाटत होती. विठ्ठल परमात्म्याने संतघरी झाटलोट, दळणकांडण, उष्टेखरकटे काढले. संतांचे बाळंतपण केले, सासुरवाशीण सुनेच्या रुपाने पतीसेवा केली. हे सगळे आता सत्य पटू लागले आहे. दासाची पत्नी- गृहलक्ष्मी संत आशाताई आपले अवतारकार्य संपवून ब्रह्मलीन झाली. तेव्हा वाटले होते, की देवाची अवकृपा झाली, घरात राबती- नांदती लक्ष्मी निघून गेली. पण नाही, तीच्या ऐवजी लक्ष्मीची अनेक रुपे आपल्या घरी पाणी भरू लागली आहेत. दासाची मामी संत अहिल्याबाई गुरनूले, मेहुण्या ब्रह्मज्ञानी संत उषाताई मोहूर्ले, संत चंदाताई लेनगुरे, संत दर्शनाताई निकुरे आणि संत मीराताई चोपकार या अडचणीच्या प्रसंगी वेळोंवेळी धावून येत आहेत. पाणी, धुणे, भांडी, केर काढणे आदी स्वच्छतेची कामे करत आहेत. ती त्यांची दैवीरुपे नाहीतर आणखी काय म्हणावी? त्यांच्या रुपाने आदिशक्ती महामाया लक्ष्मी आपल्या घरी आठदहा दिवसांच्या फरकाने येत आहे. राबत आहे, कष्टत आहे, नांदत आहे. म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी म्हटले-

“बुडते हे जन, देखवेना डोळा।
म्हणोनि कळवळा येत असे।”

दयाळू, कृपाळू व ममतामयी संतांची ती लक्ष्मीरुपे आम्हां दोघे बापलेकांना जराही एकाकी वाटू देत नाहीत. खरेच, आम्ही किती भाग्यवंत नाही का? कारण दासाच्या घरी प्रत्यक्ष परमेश्वर- देव- निरंकार अनेक लक्षमीरुपाने राबत, कष्टत, नांदत आहे. त्या सर्व लक्ष्मीरुपांना आपले दंडवत प्रणाम! हेही उदाहरण संतांतील आत्मिकता व त्यासोबतच मानवता अशी घट्ट रुजलेली सुस्पष्टपणे दृष्टीस पडते. मग सांगा, याहून साधासोपा दृष्टांत तो कोणता?

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे ५६व्या महाराष्ट्र निरंकारी संतसमागमाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी! मोठ्या प्रेमाने बोलुया जी, धन निरंकार जी आणि नमस्कार जी !!

✒️चरणधूळ:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी(सुप्रसिद्ध लेखक व कवी)रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.भ्रमणध्वनी- ७७७५०४१०८६