ऊसतोड कामगारांच्या लेकारांसाठी धरणे आंदोलन..

29

▪️ ऊसाच्या फडातील शेवटच्या लेकराची निवासी शिक्षण व्यवस्था होईपर्यंत स्वस्थ बसणार नाहीत- दीपक नागरगोजे, दत्ता बारगजे राज्य निमंत्रक ओमप्रकाश गिरी, बाजीराव ढाकणे जिल्हा निमंत्रक या सामाजिक कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.27जानेवारी):- स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात बीड जिल्ह्यातील पस्तीस हजार मुलांच्या आयुष्याची ऊसाच्या फडात राखरांगोळी होत आहे. घटनेने दिलेले शिक्षण आणि संगोपणाच्या मुलभूत हक्कांपासून या मुलांना दुर ठेवले जात आहे. जोपर्यंत या मुलांच्या निवासी शिक्षणाची व्यवस्था सरकार करीत नाही , आणि जोपर्यंत ऊसाच्या फडातील शेवटचे मुल निवासी शिक्षण व्यवस्थेतून शिक्षणाच्या प्रवाहात येत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि सरकारला स्वस्थ बसू देणार नाही अशी ठोस भूमिका आज सर्व शिक्षा आंदोलनाचे राज्य निमंत्रक आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक नागरगोजे ( शांतिवन) , दत्ताभाऊ बारगजे (आनंद ग्राम) जिल्हा निमंत्रक बाजीराव ढाकणे आणि ओमप्रकाश गिरी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने केलेल्या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने व्यक्त केली. मराठवाडा लोक विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ आण्णा तोडकर यांची या आंदोलनात प्रमुख उपस्थिती होती.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षा आंदोलन च्या वतीने धरणे आंदोलन देण्यात आले या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते संतोष गर्जे, बाजीराव ढाकणे, दादासाहेब मुंडे, ओमप्रकाश गिरी, गोवर्धन दराडे, नारा मिसाळ ,डॉ.गणेश ढवळे ,शरद सानप आदींची उपस्थिती होती.

बीड जिल्ह्यातील पस्तीस हजार मुलं आजही पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात उसाच्या फडात पालकांबरोबर स्थलांतरित झालेली आहेत या ऊसतोड कामगारांच्या मुलांना शाळाबाह्य व्हावे लागत आहे. घटनेने शिक्षणाचा दिलेला मूलभूत अधिकार शिक्षण हक्क कायद्यानुसार या मुलांना मिळायला हवा. असे असतानाही वेळोवेळी मागणी करूनही सरकार या मुद्द्यावर निवासी शिक्षण व्यवस्था करीत नाही. या मुलांसाठी निवासी वस्तीगृह बांधत नाहीत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ नुसतेच नावाला स्थापन केले आहे या महामंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कुठल्याही योजना सरकार कामगारांपर्यंत पोहोचवीत नाही सरकारला या धोरणाविषयी जाग आणण्यासाठी आज जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व शिक्षा आंदोलन छेडले. या आंदोलनाचा पहिला भाग म्हणून आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी धरणे दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन निवेदन स्विकारले..
दिपककाका नागरगोजे, दत्ता बारगजे ओमप्रकाश गिरी, बाजीराव ढाकणे, गोवर्धन दराडे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत हे माहित झाल्याच्या नंतर स्वतः जिल्हाधिकारी श्री राधा विनोद शर्मा हे आपल्या सहकार्यासह आंदोलन स्थळी आले आणि सविस्तर चर्चा करून त्यांनी निवेदन स्वीकारले या विषयावरती लवकरच बैठक लावून मुख्यमंत्र्यांन ही सर्व परिस्थिती कळवितो असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.