डेज संस्कृतीमुळे संस्कृती आणि मूल्यांशी दुरावा!

32

फेब्रुवारी महिना सुरू झाला की, तरुणांना वेध लागतात ते वेगवेगळे डेज साजरे करण्याचे त्यासाठी ते जय्यत तयारीही करतात. रोज डे पासून सुरू झालेला हा डेज चा महोत्सव व्हॅलेंटाईन डे ला संपतो. या दरम्यान प्रपोज डे, प्रॉमिस डे, टेडी डे, चॉकलेट डे, हग डे, चॉकलेट डे, किस डे असे विविध प्रकारचे डे येतात. डेज चा हा महोत्सव आठवडाभर चालतो. तरुण वर्ग विशेषतः महाविद्यालयीन तरुण हे डेज साजरे करण्यात आघाडीवर असतात कारण याच वयात मनी प्रेम फुलत असते. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला गुलाबाचे फुल देऊन आपल्या मनातील भावना पोहचवण्यासाठी तरूण या डेज ची आतुरतेने वाट पाहत असतात. गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून गुलाबाकडे पाहिले जाते म्हणून गुलाबाला खूप मागणी असते. यावेळी तरुणांच्या उत्साहाला उधाण येत असते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते.

या डेज च्या निमित्ताने लाखोंची उलाढाल होत असते हे जरी खरे असले तरी आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाईन डेजचाच मुहूर्त लागतो का ? आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी नजरेचा एक कटाक्ष आणि चेहऱ्यावरील हास्यही पुरेसे असते. त्यासाठी व्हॅलेंटाईन डे चाच मुहूर्त असावा असे काही नाही. मुळात असे डेज साजरे करावेत की नाही यावर देखील मतमतांतरे आहेत. माझ्या मते कोणावर प्रेम व्यक्त करण्यासाठी, त्यांना भेटवस्तू देण्यासाठी, त्यांना आनंदी करण्यासाठी, त्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी, त्यांना आपल्या भावना सांगण्यासाठी कोणत्याही डे ची गरज नसते. बरे हे डे पुराण तरुणांसाठीच असते असेही नाही. आजच्या सोशल निडियाच्या युगात तर डेज चे पेव फुटले आहे. फ्रेंडशिप डे, फादर्स डे, मदर्स डे, सिस्टर्स डे, ब्रदर्स डे, डॉटर्स डे असे कितीतरी डे येतात. एका वर्षात किती डे येतात याची गणनाच नाही. अति झाले नी हसू आले अशी गत या डेज ची झाली आहे. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्यांसाठी तर हे डेज म्हणजे पर्वणीच असते. शुभेच्छा देणाऱ्यांवर लाईक, कमेंट आणि शेअरचा पाऊस पडतो. वर्षभर कधी आई वडिलांप्रती आदर व्यक्त न करणारे मदर्स डे, फादर्स डे ला खुप ऍक्टिव्ह असतात.

जन्मदात्या आई वडिलांच्या आठवणींसाठी, त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी मदर्स डे, फादर्स डे ची वाट पाहण्याची वेळ तरुणांवर आली आहे. हे डेज म्हणजे नैतिकचे अवमूल्यन आहे. कोणतेही डे साजरे करण्यापूर्वी प्रत्येकाने खरोखरच या डे ची गरज आहे का ? असा प्रश्न विचारून पहावा. आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चत्यांचे अंधाणुकरण केल्यामुळे आपल्या मूळ संस्कृतीशी आणि मूल्यांशी दुरावा निर्माण होत आहे, हे मात्र नक्की!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५