भरीव मानधनवाढीच्या आश्वासनाचा मुख्यमंत्र्यांना विसर

31

🔸राज्यातील अंगणवाडी कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.20फेब्रुवारी):-26 जानेवारी रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरीव आणि समाधानकारक मानधन वाढ जाहीर करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कृती समितीला दिली होती. मात्र, मुख्यमंत्री आश्वासन विसरल्याने सोमवारपासून (दि.20 फेब्रुवारी) राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या महाराष्ट्र अध्यक्षा ऍड. निशा शिवूरकर यांनी दिली आहे.

12 जानेवारी रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महिला बाल कल्याण मंत्र्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कृती समितीच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 26 जानेवारी रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरीव आणि समाधानकारक मानधन वाढ जाहीर करू असे सांगितले; परंतु प्रत्यक्षात काही जाहीर केले नाही. महिला व बाल कल्याण क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांविषयी शासनाच्या असंवेदनशीलतेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे अंगणवाडी कृती समितीने 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे.

कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून अंगणवाडय़ा बंद ठेवाव्यात, कोणत्याही मीटिंग वा प्रशिक्षणाला जाऊ नये, अहवाल देऊ नये, आहार वाटप करू नये आणि संप शंभर टक्के यशस्वी करावा, असे आवाहन ऍड. निशा शिवूरकर, जिल्हाध्यक्ष सत्यभामा थिटमे, भारती धरत आदींनी केले आहे.

या आहेत मागण्या

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा मिळावा, मानधन वाढीचे आश्वासन पूर्ण करावे, सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युईटी द्यावी, दरमहा पेन्शन द्यावे, कार्यक्षम मोबाईल द्यावेत, थकीत लाभ मिळावेत, अमृत आहाराचे दर वाढवावे, आजारपणाची भरपगारी रजा मिळावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत.