शेती विषयक धोरण राबविणे काळाची गरज – माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित

31

🔹खांडवी येथे कलिंगड पिक पाहणी प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.10मार्च):-मला शेतीचा छंद आहे.मी आजही वयाच्या ८६ व्या वर्षी शेतीसाठी दररोज वेळ देतो. परंतू शेती सध्या तोट्यात चालली आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी तसेच सुलतानी संकटं येत आहेत. यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे परंतू शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता पारंपारिक पिकांना फाटा देवून कमी खर्चात नवनवीन प्रयोग राबवून खर्चाचा ताळेबंद ठेवत कष्टाने आणि मेहनतीने भरघोस उत्पन्न घेवून स्वताच्या पायावर भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. तसेच शेती विषयक धोरण राबविणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा शिक्षण व सहकारमहर्षी शिवाजीराव (दादा) पंडित यांनी व्यक्त केले.

गेवराई तालुक्यातील खांडवी येथे युनाटेड जेनेटीक्स इंडिया प्रा.लि.व फोरस्केअर क्रॉप केअर यांच्या संयुक्त विद्यमाने जय भवानी कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांच्या शेतात शुक्रवार दि.१० मार्च रोजी कलिंगड पिक पाहणी प्रात्यक्षिक व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जय भवानी कारखान्याचे व्हा चेअरमन जगन्नाथराव शिंदे, जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, स्वप्निल स्वामी,प्रगतशील शेतकरी तथा कृषी भुषण दत्ता जाधव यांच्यासह विविध भागातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्वप्रथम उपस्थित शेतकऱ्यांनी टेकाळे यांच्या तीन एक्करमध्ये असलेल्या कलिंगड पिकाची पाहणी करुन भरघोस उत्पन्नाबद्दल समाधान व्यक्त केले. तर यावेळी पीक पाहणी प्रात्यक्षिक व चर्चासत्रात दत्तात्रय टेकाळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कलिंगड लागवड तसेच खर्च आणि उत्पन्न यांची सविस्तर माहिती देवून परिसरातील शेतकऱ्यांनी या कलिंगड पिकांची लागवड करावी असे आवाहन केले. तसेच यावेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना कलिंगड तसेच विविध पालेभाज्या व आदि पिकांची लागवड तसेच व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना शिवाजीराव दादा म्हणाले की पारंपरिक पिकांना फाटा देत शेतीत नवनवीन प्रयोग राबवून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल यांचा विचार करुन शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून जनावरे पाळून दुध व्यवसाय केला पाहिजे.पाच पाच कोटी रुपये उत्पन्न काढणारे शेतकरी आहेत.शेती संभाळा, शेतीच शेतकऱ्यांची खरी आई आहे, काळ्या आईची सेवा करा तीच आपल्याला आणि आपल्या पिढीला सुधारेल तसेच दत्तात्रय टेकाळे तज्ञ माणूस आहे. जय भवानी कारखाना त्यांच्या माध्यमातून सध्या नंबर एकवर असून भविष्यातही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच टेकाळे शेतातही चांगले उत्पन्न घेत आहेत यांचा मनस्वी आनंद आहे.आज बाजारात विविध कंपन्या आहेत.कंपनीने मोठे व्हावे परंतू शेतकरीही उभा राहिला पाहिजे यासाठीही प्रामाणिकपणे राहिले पाहिजे.

काल राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला परंतू त्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजना राबविल्या गेल्या पाहिजे नाहितर सध्या महिन्याला सरकार बदलते आहे. सरकार बदलले की योजनाही बारगळल्या जातात असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी सरकारला लगवला. तसेच तरुण पिढीने आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रयत्न केले पाहिजेत असा सल्लाही शेवटी बोलताना त्यांनी तरुण वर्गाला दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल निकम, संतोष पाठक, संभाजी मडोळे, गणेश निकम, संतोष गिरी, मेहर यांच्या सह आदींनी प्रयत्न केले.