राज्यव्यापी बेमुदत संपात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा सक्रीय सहभाग-जुनी पेन्शन योजना व इतर प्रलंबित मागण्यांसाठी संप

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.13मार्च):- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र व्दारा संलग्न सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्याच्या पुर्ततेकरीता १४ मार्च २०२३ ला राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. त्या संपात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना सक्रीय सहभागी होत आहे.अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही राज्यातील तमाम कर्मचारी वर्गाची मागणी आहे. त्याच बरोबर शिक्षक आणि शिक्षण विषयक अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत.

शासनाच्या शिक्षक आणि शिक्षणविषयक विरोधी धोरणांमुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जुनी पेंशन योजनाबाबत राज्यकर्ते वेळोवेळी वेगवेगळी विधाने करून कर्मचाऱ्यांत संभ्रम निर्माण करीत आहे. जुनी पेन्शन व इतर मागण्यांसाठी “विमाशी” नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहे. त्यामुळे समन्वय समितीने पुकारलेल्या संपात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने घेतला आहे.

या संपात सर्वांनी सहभागी होऊन संप यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे, विमाशि संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस. जी. बरडे, आमदार तथा सरकार्यवाह सुधाकर अडबाले, सर्व प्रांतीय पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व जिल्हाकार्यवाह यांनी केले आहे.