संप!…संप!!….संप!!!- जुन्या पेन्शनसाठी लढा

28

जुनी पेन्शन संघटनेची भव्यदिव्य संघर्ष यात्रा मागील वर्षी संपन्न झाली. या यात्रेत तरूण पिढीतील शिक्षक -कर्मचाऱ्यांचा मोठा उत्साहवर्धक सहभाग दिसून येत होता. पेन्शनचे महत्त्व तरुण पिढीला उमजले असून ती संघर्षरत होणे महत्त्वाचे ठरते. आयुष्यभर सेवा करून निवृत्तीपश्चात कलत्या आयुष्यात आधार कशाचा? हा गंभीर प्रश्‍न ध्यानातत घेत ही नवी पिढी संघर्षरत आहे. ही संवेदनशीलता त्यांचे लढ्यास बळ देऊन शासकीय यंत्रणेलाही जुन्या पेन्शनसाठी बाध्य करो, असे वाटते.

खरं म्हणजे, म्हातारपणातील समस्या असंख्य असतात. आयुष्यभर देह झिजवून सेवा केल्यानंतर अंगात त्राण नसणे, परिणामतः घरी बसून उदरनिर्वाह म्हणजे वाहिताच्या कामातून बाद झालेल्या बैला सारखीच पंचायत. (बैल संबोधून माणसाचा अपमान करण्याचा हेतू नव्हे, तर त्याच्या आयुष्यभर केलेल्या कष्टाचा विचार येथे महत्त्वाचा.) कविवर्य श्री. दि. इनामदारांची शालेय पाठ्यक्रमातील ‘ऋण’ ही कविता या संदर्भात खूप बोलकी वाटते,कवी म्हणतात,

तुझ्या शेतात राबून
माझी सरली हयात
नको करू हेटाळणी
आता उतार वयात…

आयुष्यभर ज्या बैलाला वापरून घेतले जाते त्याला उतारवयात चारा पाणी मिळणे दुरापास्त होते आणि काम न करता आयता चारा खात असल्यामुळे त्या बैलाची होणारी हेळसांड बैलाच्या करूण कहाणी कवितेतून व्यक्त होते. किंबहुना अशीच परिस्थिती माणसाच्या संदर्भात उतारवयात येत असते, हे सर्वश्रुतच आहे. शेतात राबणारी बायामाणसे, मोलमजुरी करणारे, कष्टकरी आयुष्यभर तुटपुंज्या मिळकतीवर गुजराण करत उतारवयात देखील काठी टेकवत जाऊन रानावनात काबाडकष्ट करत जीवनयापन करत असतात. थकलेले शरीर, डोकं वर काढत असलेली दुखणी, व्याधी, बेताचा आहार, औषधोपचारांचा अभाव, कुटुंबातील वाढता दुर्लक्षितपणा यांमुळे वार्धक्याची वाटचाल अधिक खडतर होत असते. असे अनुभव लक्षात येत असल्याने अलीकडे अनेक समाजघटकांकडून अशा राबत्या माणसांनाही वृद्ध पेन्शन मिळावी, अशा प्रकारची मागणी बळावत आहे.

शासकीय कर्मचारी अथवा चाकरमाने आयुष्यभर शासन सेवेत झिजतात. आयुष्याची ५८ ते ६० वर्षांपर्यंत उमेदीचा काळ लोटलेला असतो. त्यामुळे उत्तरायुष्यात नव्याने काही मिळकतीची योजना उभी करणे फार अवघड होऊन जाते. नोकरशाहीतील चतुर्थ व तृतीय श्रेणी कर्मचारी यांची उपजीविका आणि उत्पन्न याचा विचार करता वर्ग एक आणि वर्ग दोनच्या कर्मचाऱ्यांपेक्षा यांची परिस्थिती उत्तर आयुष्यात फार हलाखीची होऊन बसते. तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची परिस्थिती एका अर्थाने चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील चौथ्या वर्णाच्या शूद्रांच्या परिस्थिती सारखी असते, असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही, कारण नोकरशाहीतही जातवर्चस्वाचा विचार केला तर वर्ग एक आणि वर्ग दोन मध्ये उच्चजातीयांचा भरणा अधिक आहे, तर वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांमध्ये ओबीसी, एससी, एसटी,व्हीजेएनटी यांचा भरणा अधिक आहे. वेतना मधील तफावत ही मोठी दिसते वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांना भरमसाठ वेतन मिळते. तर वर्ग -३ आणि वर्ग -४ च्या कर्मचाऱ्यांना कष्टाची कामे करून,अधिक मेहनत करूनही त्या तुलनेत कमी वेतन मिळते.या श्रेणीत आणखी आणखी खालचा तबका ज्याला म्हणता येईल अशी हलकी, मेहनतीची कामे, कष्ट करणाऱ्यांवर यापेक्षा तुटपुंजी मोबदल्याची अपरिहार्यता दिसून येईल. (सफाई कामगार, मोलकरीण बाई, शेतमजूर यांची मिळकत. मजुरीला जाणाऱ्या स्त्रीला दिवसाची मजुरी शंभर ते दीडशे रुपये मिळते.) म्हणून खालच्या लोकांना जास्त संघर्ष करावा लागतो नोकरशाहीतील सचिवालयातील सचिव, सहसचिव, कलेक्टर, आयएएस, आयपीएस, आयएफएस,न्यायाधीश अशा बड्या हस्ती यांनी कधी मोर्चा काढल्याचे ऐकिवात नाहीत, त्यांना त्याची गरज पडत नाही. त्यांना विनासायास सगळे पदरात पाडून घेता येते. पण शेतकरी, मजूर, कष्टकरी, कामगार, क्लास फोर क्लास फोर चे कर्मचारी इ. सामान्य माणूस मात्र संघर्ष करत राहतो.नेहमी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढताना दिसतो. जुन्या पेन्शनसाठीचा संघर्षही यापेक्षा काही वेगळा असावा असं नाही. या संघर्ष यात्रेत सहभागी शेतकरी कष्टकरी सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेली स्त्री-पुरुष भावंडे मोठ्या प्रमाणात दिसतात. यातच संघर्षाची दशा आणि दिशा दिसून येते.

✒️अनुज हुलके(मो:-9823883541)