चिमूरात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांची रॅली

35

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.17मार्च):-जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी १४ मार्चपासून सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार राज्यातील १८ लाख कर्मचारी संपावर गेले आहेत.संपाच्या चौथ्या दिवशी चिमूर तालुक्यात राज्य सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक संपावर गेले आहेत.बहुतेक शाळा बंद आहेत.सरकारी कार्यालये ओस पडली आहेत.संपाच्या चौथ्या दिवशी चिमूर शहरातून संपकरी कर्मचाऱ्यांनी रॅली काढून शासनाचे लक्ष वेधले.चिमुरातील मुख्य मार्गाने रॅली नेण्यात आली. सर्वांना पेन्शन मिळाली पाहिजे या मागणीच्या घोषणा रॅलीत सहभागी कर्मचाऱ्यांनी दिल्या.

या संपासंदर्भात शासनाकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्यात प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्यात यावी, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करण्यात यावे, सरकारी कामकाजातील खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे, वस्तीशाला शिक्षकांना मूळ नियुक्ती दिनांकापासून वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, सावित्री फातिमा कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्यात यावी, पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, शिक्षकांना अशैक्षनिक कामे देण्यात येऊ नये, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध लागू करुन भरती सुरु करण्यात यावी, निवृत्तीचे वय ५८ वरुन ६० करण्यात यावे, अनुकंपा तत्वावर नियुक्त्या तात्काळ देण्यात याव्या, पंधरा दिवसांची पितृत्व रजा आणि केंद्रप्रमाणे राज्यातील पुरुष व महिला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.या मागण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आहे.जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत संपातून माघार घेणार नाही असा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.