शिक्षकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण?- चांगदेव केमेकर सरपंच बेंबाळ

32

✒️सुनील शिरपुरे(यवतमाळ प्रतिनिधी)

यवतमाळ(दि.20मार्च):-मागील गेल्या आठ दिवसापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा संप सुरु आहे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळातच शिक्षकांनी संप पुकारल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेतच शिक्षक नसल्यामुळे गावातील विद्यार्थी शाळेत जाऊन बसतात, खेळतात. पण त्यांना पुस्तकांचा परिपाठ, होमवर्क, परीक्षेच्या अभ्यासाचा सराव कोणी घ्यायल तयार नाही. त्यामुळे आमच्या पाल्यांच्या भवितव्याचे काय होणार? या विवंचनेत बेंबाळ येथील पालक वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.

यासाठी बेंबाळ येथील ग्राम पंचायत सरपंच, ग्रामपंचायत कमिटी व शाळा व्यवस्थापन समिती यांनी आजपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंबाळ येथे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करीत आहेत. विद्यार्थ्यांचे सराव पुस्तक वाचन स्वतः सरपंच व त्यांची कमिटी वर्गामध्ये जाऊन करीत आहेत.

त्यांच्या अभिनव उपक्रमाचे बेंबाळवाशीय नागरिकांकडून कौतुक केले जात असून ही अभिनव संकल्पना सरपंच चांगदेव केमेकार व सर्व ग्रा.पं. सदस्य बेंबाळ येथील प्रतिष्ठित नागरिक दीपक पाटील वाढई, सुहास वाढई, दीपक कोटगले, विकास वाडके यांनी आखली असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तरी देखील शिक्षकांचा संप किती दिवस चालेल? हे अजूनही सांगता येत नाही. परंतु ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांनी संप पुकारल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्न बेंबाळ येथील सरपंच चांगदेव केमेकार यांनी केला आहे.