कार्यकर्ता असणे हा गुन्हा असतो का..?

49

राष्ट्र सेवा दलाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता राहिलेला विठ्ठल बुलबुले काल गेला. मला एकही पोस्ट त्याच्यावर लिहाविशी वाटली नाही. गेली ३० वर्षे जिवलग मित्र होता. नगरला असताना जवळपास रोज आम्ही एकत्र असायचो. पण त्याच्या योगदान व अफलातून असलेल्या गुणांविषयी मला काही लिहावेसेच वाटत नाहीये कारण त्याचा मृत्यू ज्याप्रकारे झाला हे विदीर्ण करतेय..

काल मध्यरात्री स्मशानात त्याच्या पत्नीचा पिळवटून टाकणारा आकांत विसरता येत नाहीये.हार्ट चा त्रास होत असताना हा माणूस घराजवळ एका रांगेत हार्ट ची स्पेशल हॉस्पिटल असताना परवडत नाही म्हणून सिव्हील हॉस्पिटल मध्ये जातो. तिथे गोळ्या घेवून घरी येतो आणि दुपारी पुन्हा तीव्र त्रास झाल्यावर पुन्हा एकदा त्याच सिव्हील हॉस्पिटल मध्ये जातो. मृत्यूने त्याला किमान ५ तासाचा अवधी देवून ही त्याला कार्डिक रुग्णालयात जावेसे वाटत नाही यामागची बेपर्वाई नाहीये तर ती अगतिकता जास्त अस्वस्थ करते..डोळ्यात पाणी आणते. रिक्षाने उडवले.हाडे दुखत असताना तो नाशिकला एस टी ने जातो व व्याख्यान करून येतो…पैशासाठी तब्येतीकडे दुर्लक्ष करतो म्हणले तरी चालेल कारण त्यामागची त्याची कुटुंब सावरण्याची तडफड असते. त्याच्या डोळ्याचे ऑपरेशन करायचे. संगमनेर मधील एक डॉक्टर मित्र करतो म्हणाले तर त्यासाठी हा माणूस संगमनेर ला येतो. किडनी चा त्रास होतो, पाठ प्रचंड दुखायची. अशीच मिळेल ती औषधे घ्यायचा आणि निभावून न्यायचा.

कार्यकर्ता असणे हा त्याचा गुन्हा होता का ? साधा नगरसेवक उन्हाळ्यात भारत /परदेशात कुटुंबाला फिरवून आणतो तिथे हार्ट चा त्रास होताना माझ्या या मित्राला सिव्हील मधून गोळ्या आणाव्या लागतात हे किती वेदनादायक आहे.झोपडपट्टीत जन्म झालेला तो दारिदर्यरेषेखालील आयुष्य जगला. हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम केले.नाईट स्कुल ला शिकला. इथपासून यशदाचा प्रसिद्ध प्रशिक्षक हा प्रवास थक्क करणारा आहे.नवीन नवीन कल्पना सुचत असायच्या.त्यातून अर्थार्जन करण्याची धडपड पुन्हा अपयशी व्हायची. माहिती अधिकार तज्ज्ञ अशी त्याची ओळख निर्माण झाली तेव्हा आता दारिद्र्याचा शाप संपला म्हणून आम्ही आनंदी झालो..तर कोरोना ने गाठले. प्रशिक्षण एकदम बंद आणि नंतर कमी होत गेले. पण नवीन नवीन कार्यक्रम त्याला सुचायचे. पण त्याची तो जाहिरात इतकी मोठी करायचा की इतरांना वाटायचे की अरे बरेच पैसे याला मिळतात तर. पण त्याच्या हास्याआड त्याचे अश्रू खूप कमी जणांना दिसले… यशदातल्या AC हॉल मधील तो खोटा होता आणि काल हार्ट चा त्रास होताना सिव्हील ची पायरी चढनारा तो खरा होता…

तरुण वयात राष्ट्र सेवा दल पूर्ण वेळ कार्यकर्ता झाला हा त्याचा गुन्हा होता का? त्या वयात व्यवसाय नोकरी केली असती तर त्याची इतकी क्षमता होती की ही पोस्ट लिहायची वेळ आली नसती.. पण आज कुटुंब उघड्यावर आहे. त्याची पत्नी विड्या वळते. मुलगी १० वी त आणि मुलगा ७ वीत शिकतो आहे..संस्थात्मक कामात अशी माणसे जोडून ठेवण्यात आम्ही अपयशी ठरतो आहोत का? इतकी अफाट क्षमता असणारी माणसे न टिकण्याची जबाबदारी कोण घेणार…?

मला मित्र म्हणून अपयश हे वाटते की दुःख लपवणाऱ्या या मित्राशी आम्ही जागतिकीकरण, राजकारण, समाजकारण, धर्मनिरेक्षतेच्या गप्पा मारत राहिलो पण त्याच्या कुटुंबाची चर्चा मी केली नाही. तो हास्याआड अश्रू लपवत राहिला आणि आम्ही ही त्याला फसत राहिलो ..ज्या समाजासाठी अशी माणसे सर्वस्व देतात त्यांची समाज काय जबाबदारी घेतो ? हा महत्वाचा प्रश्न कालपासून छळतो आहे. उलट अशा कार्यकर्त्यांना तपासत राहत बदनामी मूल्यमापन करणारे लोक आजूबाजूला असतात… सावंत या कवितेत वसंत बापट लिहितात की रात्र रात्र जागून स्वप्न बघण्याचे दिवस आता संपलेत सावंत.. हेच शेवटी खरे असते का …?किमान आजूबाजूला असे कार्यकर्ते आहेत त्यांची तरी काळजी घेवू या..मन अपराधी भावनेने भरून आले आहे ..

किमान नगरच्या सर्व मित्रांनी त्याच्या मुलांसाठी मोठा निधी जमवण्याचे ठरवले आहे. हे खूप आश्वासक आहे. तो अनेकांचा माय बाप झाला आपण त्याच्या लेकरांचे माय बाप होऊ या ..

*संपर्क*
शिवाजी नाईकवाडी – मो. 98509 51350
नितेश बनसोडे – मो.98909 69315

✒️लेखन:-हेरंब कुलकर्णी(मो:-8208589195)