वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये ‘सृजनशील लेखन’ कार्यशाळा उत्साहात संपन्न

28

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि. 22मार्च):-“लेखन ही सृजनशील आणि उत्स्फूर्त कला आहे. आपल्या मनात येणारे विचार योग्य शब्दांत व्यक्त करता येणे हेच फार आव्हानात्मक असते. त्यातूनही उत्तम विचारांचे चिंतन आणि विचारांना योग्य शब्दांतून मांडता येणे हे एक महादिव्य आहे. असे प्रतिपादन प्रा. डॉ. सचिन रूपनर यांनी केले. ते श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर कराडच्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज (अग्रणी महाविद्यालय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सृजनशील लेखन’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव हे होते.

प्रा. डॉ. सचिन रुपनर पुढे म्हणाले की, एखाद्या विशिष्ट विषयातले ज्ञान आणि त्यातील प्रतिभा कुठे व कशी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. असंच एक तुम्हा-आम्हा सर्वाच्या आवडीचं आणि गरजेचं क्षेत्र (करिअर) आहे ते म्हणजे लेखन. विचार करा की सृजनशील लेखन करणारे लेखक नसते तर कितीतरी क्षेत्रात आपल्याला उणीव भासली असती.

उदाहरणार्थ आपण आज वस्तूंच्या ज्या जाहिराती पाहतो, रोजचं वर्तमानपत्र वाचतो, इंटरनेटवर एखादा लेख वाचतो, सिनेमा पाहतो, या अशा आणि अनेक क्षेत्रात लेखन जाणणा-या मंडळीची अत्यंत गरज असते. लेखन हे एक बहुआयामी करिअर आहे, जे लेखन कौशल्य उत्तमरित्या विकसित केल्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो.”अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव म्हणाले की, प्रतिभा ही अलौकिक असते. आपण वेचलेल्या अनुभवातून आणि अभ्यासातून सर्जनशील लेखन केल्याने समाजाच्या विकासासाठी त्याचा फायदा होतो. विद्यार्थ्यानी सर्जनशील लेखन करावे. व महाविद्यालयाचा लौकिक वाढवावा.”
 

मराठी विभागाचे प्रा. संतोष बोंगाळे यांनी आपल्या प्रास्ताविकेत कार्यशाळेचा हेतू कथन करून पाहुण्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय बी. ए. भाग 1 चा विद्यार्थी श्री सुमित वाघमारे यांनी करून दिला तर आभार प्रा. एस. एम. मुल्ला यांनी मानले. सूत्रसंचालन एम. ए. ची विद्यार्थिनी सौ. राधिका कुलकर्णी यांनी केले. या कार्यशाळेस प्रा. ए. बी. मुळीक, प्रा. पी. एस. कराडे, याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.