महाराष्ट्र भूषण : आशा भोसल

28

गेली सात दशके आपल्या स्वरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि असंख्य संगीत प्रेमींच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जेष्ठ अष्टपैलू गायिका आशा भोसले यांना प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आल्याने संगीत प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर उपस्थित होते. आशा भोसले यांचे संगीत क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. आशा भोसले यांनी गेली सत्तर वर्ष संगीत कलेची जी सेवा केली आहे त्याचीच ही पोचपावती आहे. आशा भोसले यांना हा पुरस्कार तसा उशिराच मिळाला आहे असे म्हणावे लागेल कारण त्यांच्यापेक्षा कनिष्ठ लोकांना हा पुरस्कार आधी मिळाला आहे, तरीही हरकत नाही. देर आये दुरुस्त आये… आशा भोसले यांना याआधी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत पण हा पुरस्कार त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण हा त्यांच्या माहेरचा म्हणजे महाराष्ट्राचा पुरस्कार आहे.

या पुरस्कारासाठी त्या सर्वार्थाने पात्र आहेत. आशा भोसले यांनी १९४८ मध्ये सावन आया या चित्रपटासाठी पहिले गाणे गायले. १९४८ पासून सुरू झालेला त्यांचा संगीत कलेचा प्रवास अखंडपणे सुरू आहे. आशा भोसले यांनी मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तामिळ, मल्याळम, इंग्रजी, रशियन अशा विविध भाषेत सोळा हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांनी एक हजारांहून अधिक चित्रपटासाठी गायन केले. हिंदी चित्रपटसृष्टीतील गायनासाठी त्यांना सात वेळा फिल्मफेअर पुरस्कार तर दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. २००० साली त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने तर २००८ साली मानाच्या पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

२०११ साली सर्वाधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांनी केला. त्यांच्या या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. आशा भोसले यांनी सर्वप्रकारची गाणी गायली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीवर सुरवातीच्या काळात लता मंगेशकर यांचा वरचष्मा होता. तेंव्हा दुसऱ्या गायिकांना संधी मिळणे अवघड होते हे ओळखून त्यांनी वेगळा मार्ग पत्करला. ज्या प्रकारची गाणी लता मंगेशकर गायच्या त्या प्रकारची गाणी सोडून अन्य प्रकारची गाणी त्यांनी गायला सुरवात केली. यात पॉप तसेच पाश्चिमात्य सुरावट असलेल्या गाण्यांचा समावेश होता. त्या गाण्यांनी युवकांवर मोहिनी घातली. त्यांनी गायलेले गझल, मुजरे आणि भजनेही लोकप्रिय झाली. संगीतातला कुठलाही प्रकार त्यांनी गायचा सोडला नाही.

आशा भोसले यांनी अनेक भाषेत गाणी गायली असली तरी त्यांनी मराठीत सर्वाधिक गाणी गायली आहेत ते स्वाभाविकही आहे त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांच्यासाठी त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. मलमली तारुण्य माझे, तरुण आहे रात्र अजूनी, मी मज हरपून बसले ग ही त्यांची गाणी इतकी लोकप्रिय आहेत की अजूनही ती स्मरणात आहे. कुठल्याही कार्यक्रमात ही गाणी अजूनही म्हटली जातात. त्यांनी गायलेली सर्वच गाणी लोकप्रिय झाली आहेत. आपल्या आवाजाने त्यांनी स्वतःसोबतच महाराष्ट्राचेही नावही अजरामर केले आहे. त्यामुळे या पुरस्कारावर त्यांचा हक्कच होता. आशा भोसले यांचे मनापासून अभिनंदन!

✒️श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५