भिमजयंती कशी साजरी करणार?…डी जे च्या तालावर की विचारांच्या जोरावर?

34

विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याची संधी दरवर्षी येते. त्यामुळे वर्षभरात आम्ही शिक्षण, आरोग्य आणि रोजगार व्यक्तिगत पातळीवर काय प्रगती केली त्याचे एडीट करीत नाही. पण सामाजिक, शैक्षणिक, संस्कृती, धार्मिक आणि राजकीय यांचे एडीट झाले पाहिजे. असाच कायदा भारतीय राज्यघटना लिहिणाऱ्या घटनाकारांनी भारतीय संविधात लिहून ठेवला आहे. तो जर आम्हाला लागू होत असेल तर त्याचा ताळेबंद स्वताचा स्वताला सदर केला पाहिजे. दरवर्षी यांची थोडी ही खंत आम्हाला वाटली पाहिजे, पण ती वाटत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर,१९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य समाजाच्या लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच देशातील महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. त्यांना न्याय, हक्क आणि अधिकार मिळवून दिले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४१ साली ब्रिटीश गवर्नर मध्ये कामगार मंत्री असतांना काय काय कामगार कायदे बनवून देशातील असंघटीत कष्टकरी कामगार, मजुरांना दिले यांची थोडी सुद्धा जाणीव आजच्या असंघटीत कष्टकरी कामगारांना नाही. तोच झोपडपट्टीत राहणारा, ग्रामीण गावांतील खेड्यात पाड्यात राहणारा असंघटीत कामगार भिम जयंती एक दिवस नाही तर पांच, दहा दिवस साजरी करीत असतो. किती दिवस कोणते उपक्रम राबविणार त्यांची लेखी माहिती देतात. आणि वर्ष भरात कोण कोणते सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक, कला, क्रिडा प्रोत्साहन देणारे प्रेरणादायी उपक्रम राबविले त्याची माहिती दिली पाहिजे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कोणते ही विचार आम्ही शांत डोक्याने मेंदूत कधीच घेतले नाही.त्यामुळेच त्याचा जमाखर्च ताळेबंद कागदावर लेखी मांडणे अश्यक्य आहे.आम्ही संघटित कामगार असण्यापेक्षा असंघटित कामगार मजूर जास्त आहोत, यांची जाणीव बाबासाहेबांना होती म्हणूनच त्यांची कामगारांच्या समस्या व उपाय यावर अभ्यासपूर्ण मांडणी होती हे त्यांनी १९४१ सालीच लिहून ठेवले होते, त्यांची कामगार चळवळी बाबत विशेष भाषणे होती. देशातील पहिली सफाई कामगारांची म्युनिसिपल कामगार संघ ही युनियन त्यांनी मुंबईत बांधली १९४१ साली तिचे पाच हजार सभासद होते,आजच्या घडीला मुंबईसह राज्यात देशातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत मध्ये ३६५ दिवस चालणारे साफसफाई काम कंत्राटी पध्दतीने चालविल्या जाते, आणि ९० टक्के कामगार हे मागासवर्गीय म्हणजेच बाबासाहेबांचा जय जय कार करणारे आहेत. म्हणूनच लिहतो भिमजयंती कशी साजरी करणार? डी जे च्या तालावर कि विचारांच्या? कारण मी १९८२ पासून असंघटीत नाका, कामगार, घरकामगार यांच्या न्याय हक्क व प्रतिष्ठेसाठी लढणाऱ्या सत्यशोधक कामगार संघटनेच्या नांवावर कार्यकर्ता, पदाधिकारी म्हणून काम करतो.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भिमजयंती साजरी करणारा. विचारांची जयंती साजरी करीत नाही. तो दरवर्षी डी जे च्या तालावर बेधुंद होऊन नाचतो. दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे देण्यासारखे घेण्यासारखे काहीच नसते. मनुवादी विचारांचा कार्यकर्ता मात्र शांत डोक्याने एक एक कार्यकम नियोजनबद्ध पद्धतीने रचनात्मक काम करून संविधानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हळूहळू संपवायला निघाला आहे. यांची जाणीव आपणास नाही. घटनेतील बाबासाहेबांनी लिहून ठेवले जागृत रहा तुमच्यासाठी रात्र नव्हे तर दिवसही वैऱ्याचा असेल. आताच प्रयत्नशील राहा नाहीतर औलाद होईल तुझी मुकी बहिरी ओरडून सांगेल जगाला “घटना लिहली बापाने पण टिकवली नाही त्याच्यां लेकाने” म्हणण्याची पाळी येईल. भिमजयंती कशी साजरी करायची डोके असणाऱ्यांनी शांतपणे विचार करून नियोजन करावे.

विषमतावादी विचारांचे लोक शांत डोक्याने संविधान संपवून नियोजन करीत आहेत. त्यानुसार ते २०२५ ला हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी कटिबद्ध आहेत. आम्ही बहुसंख्याने भीमजयंती साजरी करणार डी जे च्या तालावर, नाचून गाऊन घोषणाबाजी करणार “हम भिम कि औलाद अंगार है बाकी सब भंगार है.” तुम्ही फक्त भिम जयंतीनिमित्त करत राहणार राज्यघटनेचा जय जयकर. ते मात्र घटनेचाच एक एक कलमावर घालत राहतील घाला. त्यानुसारच त्यांनी खाजगीकरण करून आरक्षण तर संपविलेच आहे. शिक्षण, आरोग्य महाग करून ठेवले. तुमच्यासाठी काय आहे?तर कायमस्वरूपी काम करणारा कंत्राटी कामगार म्हणूनच तुमची ओळख निर्माण केली जात आहे. म्हणूनच भिमजयंती कशी साजरी करणार? डी जे च्या तालावर कि विचारांच्या जोरावर? आताच ठरवावे लागेल.

कशी करावी भिम जयंती साजरी. १३२ वी भीमजयंती निमित्याने स्वताचे घर, परिसर स्वच्छ ठेवावा. शक्य असेल तर घरांना रंग द्यावा. कपडे नवीन घेता येत नसतील तर आहेत तेच स्वच्छ धुवून घ्यावेत.घरावर रोशनाई करावी. घरासमोर दिव्यांचा झगमगाट करावे. आहारासाठी गोड पदार्थ करावेत. मद्यपान करु नये. घरातील सर्वांना नवीन शुभ्रवस्त्र घ्यावेत. घरासमोर सडा रांगोळी काढावी. घरोघर दारासमोर बाबासाहेब यांची सुंदर प्रतिमा ठेऊन पुष्पहारांनी पूजन करावे. प्रत्येक घरी निळया ध्वजाचे ध्वजारोहन करावे. यावेळी शेजारी मित्रपरीवारास निमंत्रीत करावे. ध्वजारोहन झाल्याबरोबर मुलांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त करावा. मित्र, नातेवाईकांना फराळ द्यावा. घरात बाबाससाहेबाच्या गीतांची हलकी धून ठेवावी. शक्य झाल्यास बाबासाहेब यांची पुस्तके, फोटो, गीतांची सीडी ई. एकमेकांना भेट द्यावीत.जयंतीउत्सव दिन ठरल्यानंतर (सार्वजनिक) व्याख्यान, समाजप्रबोधनपर कार्यक्रम मिरवणुकीपुर्वी एक दिवस किंवा मिरवणुक पार पडल्या नंतर ठेवावा. मिरवणुकी दरम्यान फक्त बाबासाहेब व बौद्ध गीत वाजवावित. आपली गीते लाखापेक्षा जास्त आहेत. मिरवणुकी दरम्यान वादविवाद टाळावेत. शांतता राखावी लोकांनी मिरवणूक गेल्या नंतर नांव काढले पाहिजे. मद्यपान करु नये तर बाबासाहेबाच्या अभिमानाची अशी नशा व्हावी की तिच्यापुढे दारुची नशा झक मारावी.

जयंतीनिमित्य वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करावे. जयंतीची वर्गणी फक्त आंबेडकरी जनतेकडूनच घ्यावी. स्वतः होऊन जर कोणी वर्गणी देत असल्यास स्विकारावी. आपल्या कमाई तील विसावा हिस्सा सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात दान करावा. त्यातूनच समाजातील हुशार विद्यार्थी व सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे सत्कार करावेत. कल्पकतेने जे काही चांगले. करता येण्यासारखे आहे ते जरुर करावे. ही भिमजयंती आगळी वेगळी जगावेगळी साजरी करावी.

जगात एक ही राष्ट्र किंवा राज्य नाही जिथे भिम जयंती साजरी होत नाही. ती त्यांच्यासाठी प्रेरणादायी रचनात्मक कार्य करणारी असते. आपल्यासाठी काय असावी ही भिमजयंती. म्हणूनच भिमजयंती कशी साजरी करणार? डी जे च्या तालावर कि विचारांच्या जोरावर प्रेरणादायी ठरावी. तर डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा जय जय कर होईल. अन्यता धांगडधिंगा घालून विचाराची जाहीरपणे हत्या होत आहे असे कोणी बोलू नये. यांची दक्षता घ्यावी हीच १३२ व्या भिम जयंती निमित्याने बाबासाहेबाचा जय जयकर करणाऱ्यांकडून अपेक्षा.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई,अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन)मो:-९९२०४०३८५९

Previous articleएप्रिल फुल
Next articleमाणूस
Purogami Sandesh
पुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी ! संपादक/प्रकाशक के Whats App नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है ! - प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी