पुन्हा वेदोक्त!

34

छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकराजा शाहू महाराज यांच्या घराण्यातील संयोगिताराजे छत्रपती या नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजाविधीसाठी गेल्या असता, तुमच्यासाठी वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्रच म्हणणार असे सांगून तेथील पूरोहितांनी संयोगिताराजे यांचा अपमान केला ही घटना निषेधार्ह आहे. घडलेल्या घटनेबाबतची पोस्ट संयोगिताराजे यांनी स्वतःच इंस्टाग्रामवर केलीय जी समाजमाध्यमांवर खूप फिरते आहे. या निमित्ताने माध्यमांमधे जोरदार चर्चा सूरू आहे. काळाराम मंदीरातील महंताच्या उच्चवर्णीय, मनुवादी, सनातनी मानसिकतेला संयोगिताराजेंनी विरोध केला हे योग्यच केले.
वेदोक्त आणि पुराणोक्त ही भानगड अनेकांना कदाचित लवकर ध्यानात येणार नाही. वैदिक धर्मशास्त्रानुसार चार वेद हे अपौरुषेय आहेत. ते मर्त्य मानवाने बनवलेले नाहीत तर थेट परमेश्वराकडून आलेले आहेत. वैदिक मंत्रांमधे प्रचंड उर्जा, शक्ती असते. हे मंत्र शुद्रांनी उच्चारायचे वा ऐकायचे नसतात. त्यावर अधिकार फक्त ब्राम्हणांचा अशी वैदिक धर्माची मान्यता आहे. त्याच बरोबर ब्राम्हण वगळता इतर सर्व मानव हे शुद्र आहेत अशीही वैदिक धर्माच्या पुरस्कर्त्यांची मान्यता आहे. शुद्रांना धार्मिक कार्यासाठी वेदोक्त मंत्रांचा आधिकार नाही म्हणून त्यांच्यासाठी पुराणातील मंत्र म्हणजेच पुराणोक्त मंत्रांचा अधिकार आहे असे पूरोहित मानतात. वेद हे सर्वोच्च, पुराणे हे कमी दर्जाचे ही मान्यता त्यामागे आहे.

छ. शिवाजी महाराजांचे क्षत्रियत्व नाकारून त्यांचा राज्याभिषेक करायला महाराष्ट्रातील ब्रम्हवृंदाने नकार दिला होता हे आपल्याला माहिती आहे. खरे तर शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. अठरा पगड जातीच्या मावळ्यांचे कर्तृत्व जागवून त्यांनी रयतेचे राज्य उभे केले होते. रयतेला लुबाडणाऱ्या वतनदारांच्या विरोधात ठामपणे उभे राहून जनतेच्या हिताची धोरणे त्यांनी राबवली होती. रयतेच्या मनावर ते अधिराज्य करत होते कारण रयतेच्या सुख दुःखाबरोबर त्यांची बांधीलकी होती. पण तत्कालीन समाजमान्यतांनुसार राज्याभिषेक महत्वाचा मानला गेलेला असल्याने शिवाजी राजांनी शेवटी काशीहून गागाभट्टांना बोलावून आपला राज्याभिषेक करवला. त्यासाठी गागाभट्टाने भरपूर दक्षिणा वसूल केली असेही सांगतात. भरपूर दक्षिणा घेऊनही तो राज्याभिषेक त्यांनी योग्य पध्दतीने केला नाही म्हणून राजांना दुसऱ्यांदा राज्याभिषेक करावा लागला असाही इतिहास सांगितला जातो.

वेदोक्त आणि पुराणोक्त म्हणजे, यांच्यासाठी हे मंत्र आणि त्यांच्यासाठी ते मंत्र अशी केवळ विभागणी नाहीये. वेदांचा अधिकार असलेल्यांना सर्व प्रकारची प्रतिष्ठा आणि तो अधिकार नाकारला गेलेल्यांना शून्य प्रतिष्ठा अशी ही व्यवस्था आहे. शुद्रांसाठी असलेली पुराणे ही कमअस्सल मानली गेलेली आहेत. वेद हे सामर्थ्यशाली मानले गेलेत. वेदांतूनच विश्वाची व देवदेवतांची निर्मिती झाली अशी वैदिकांची मान्यता आहे. त्यामुळे अशा या वेदांनी आपल्या समाजात उच्च निचतेची, सामाजिक धार्मिक विषमतेची व्यवस्था घालून दिलेली आहे. वेद अध्ययनाचा अधिकार फक्त ब्राम्हणांनाच आहे. वेदानंतर आलेल्या मनुस्मृतीनेही हा अधिकार ठळकपणे अधोरेखित केला आहे. ज्यांनी ज्यांनी ही विषमतेची व्यवस्था अमान्य केली त्यांना भयंकर परिणामांना सामोरे जावे लागले आहे.

१८९९ साली शाहू महाराजांना जेव्हा वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाकारला तेव्हा हे प्रकरण पुन्हा पुढे आले. कोल्हापूरच्या पंचगंगेत शाहू महाराज स्नान करत असताना त्यांच्याकडून पगार घेणाऱ्या नारायणशास्त्रींनी शाहू महाराजांसाठी वेदोक्त मंत्र म्हणण्याऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणायला सुरूवात केली. दुर्गा भागवत यांचे वडील राजारामशास्त्री भागवत यांनी ही बाब शाहू महाराजांच्या लक्षात आणून दिली. शाहू महाराजांनी जेव्हा नारायणशास्त्रींना जाब विचारला तेव्हा तुम्ही शुद्र असल्याने तुमच्यासाठी पुराणोक्त मंत्रच म्हणणार अशी उद्दाम आणि अहंकारी भूमिका महाराजांच्या कडून मिळणाऱ्या पगारावर जगणाऱ्या नारायणशास्त्रींनी घेतली. शाहू महाराजांनी हा प्रश्न धसास लावला तर समस्त ब्रम्हवृंदच नव्हे तर खुद्द लो. टिळक यांनीही शाहू महाराजांच्या विरोधात भूमिका घेतली. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला असला तरीही त्यांच्यानंतर त्यांच्या घराण्यात क्षत्रिय परंपरेला मान्यता नाही अशी ती उद्दाम भूमिका होती. शाहू महाराजांनी हे प्रकरण धसास लावले. राजपुरोहित पदावरून नारायणशास्त्रीला काढून टाकले. त्याला दिलेली इनामे जप्त केली. एवढेच नव्हे तर क्षात्र जगद़गुरुपीठ उभे करून पूरोहितशाहीला पर्यायी बहुजन व्यवस्था उभी करण्यापर्यंतची लढाई शाहू महाराजांनी लढली.

त्यांच्याच घराण्यातील संयोगिताराजे यांच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगाने आज ही चर्चा पुन्हा सुरू झालीय. भारतीय राज्यघटनेचा कायदा लागू झालेल्या आजच्या भारतात या घटनेकडे कसे पहावे. भारतीय संविधानाने जन्मजात उच्चनिचतेला नकार दिलेला आहे. सर्व माणसे जन्माने समान असून प्रत्येकाला आनंदाने जगण्याचा अधिकार आहे ही संविधानाची भूमिका आहे. आज विज्ञान तंत्रज्ञानात अफाट प्रगती झालीय. मंत्रोच्चाराने, यज्ञयाग केल्याने काहीतरी चमत्कार होईल व आपले जगण्याचे प्रश्न आपोआप सुटतील याला विज्ञानाने भाकडकथा मानलय. अशावेळी विषमतेच्या पायावर उभ्या असलेल्या अभिषेकविधी, होमहवन याला आणि त्या त्या वेळी म्हटले जाणाऱ्या मंत्रांना खरोखरच किती महत्व द्यायचे हे प्रत्येकाने ठरवायला हवे. शाहू महाराजांच्या काळात वेदोक्ताचा अधिकार हा आत्मसन्मानाचा मुद्दा होता जो शाहू महाराजांनी मिळवला. पण आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात खुद्द शाहू महाराजांनी हा मुद्दा फार महत्वाचा मानलेला दिसत नाही. आजच्या काळात तर, वेद म्हणजे प्रतिष्ठा या भुमिकेला नकार देण्यातच बहुजनांचा आत्मसन्मान आहे. वेदांनी रुजवलेल्या जन्मजात विषमतेच्या विरोधात उभे रहाण्याची गरज आहे. हे अनेकांनी केलय आणि त्यापायी नुकसानही सोसलय. धर्मसत्तेचा बुरखा पांघरलेल्या दांभिकतेला, खोट्या प्रतिष्ठेला अनेकांनी नकार दिलाय आणि त्यापायी बहिष्कृत होण्यापासून ते जीव गमावण्यापर्यंतचे धोके पत्करले आहेत. शाहू महाराजांनीही बदनामीपासून ते राज्यकारभारातल्या अडवणूकीपर्यंतचा जाच वेदोक्त प्रकरणात सहन केला.

पण काळ पुढे सरकला तसे,”सर्वसाक्षी जगत्पती, नकोच त्याला मध्यस्थी!”अशी भूमिका घेणाऱ्या सत्यशोधक विचारांना शाहू महाराजांनी नंतरच्या काळात जवळ केले होते. महाराष्ट्र ही संताच्या विचारांनी मशागत केलेली भूमी आहे. *”कर्म हीच भक्ती”* ही संतांची शिकवण आहे.

“कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी”
ही अभंगरचना करणाऱ्या संत सावता माळी यांनी, प्रत्येकाने आपले काम जर प्रामाणिकपणे केले तर आपल्या कामातच आपल्याला आपला विठ्ठल भेटतो, त्यासाठी कुठल्याही कर्मकांडाची गरज नाही असा विचार आपल्याला दिलाय.भारतीय संविधान सर्वांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी बहाल करतय.स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या पायावर उभी असलेली भारतीय राज्यघटना हाच आपला आजचा जीवनाधार आहे.* भारतीय संविधान केवळ कायद्यांची जंत्री नाही तर माणसाच्या व्यक्तीगत आणि सार्वजनिक जीवनासाठी एक समग्र अशी मूल्यव्यवस्था सांगणारा तो ग्रंथ आहे. विषमतेला बळकट करणाऱ्या वेदांना नाकारून संविधानाच्या समतेच्या प्रकाशात वाटचाल करणं हेच आज आपल्या हिताचं आहे.

✒️सुभाष वारे(पुणे)मो:-9325046142/9822020773

(दै. प्रजापत्रच्या रविवार पुरवणीतील लेख)