खान्देशची वाघिणी…. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व-प्रा. जयश्री दाभाडे-साळुंके

28

व्यवसायाने प्राध्यापिका, छंद पत्रकारिता, कविता काव्य लिहिणे, पेन्सिल पेंटींग ,अक्रेलिक पेंटींगमध्ये मास्टर, सायकलिंग- हॉर्स रायडींगचा विशेष छंद, कैसिओ प्लेयिंग,मेहंदी रांगोळीची विशेष आवड, नृत्य, त्याच प्रमाणे सर्व प्रकारच्या दुचाकी आणि चारचाकी वाहने चालविण्याचा शौक आणि विशेष म्हणजे जन सामान्यांसाठी व त्यांच्या हक्कांसाठी पेटून उठणारी खान्देशची वाघिणी म्हणजे अमळनेर येथील रुक्मिणीताई कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इतिहास विभाग प्रमुख प्रा. जयश्री राजेंद्र साळुंके-दाभाडे होय. सध्या विधी शाखेची पदवी घेत असून डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय धुळे येथे लॉ च्या द्वितीय वर्षात शिकत आहेत.

प्रा. जयश्री दाभाडे म्हणजे पत्रकारितेच्या माध्यमातून भ्रष्टाचाऱ्यांचे भ्रष्टाचार वेशीवर टांगून लेडी डॉनची भूमिका बजावणारी रणरागिनीच आहे. अशी ही रणरागिनी 6 मे 2023 रोजी आपला 51 वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्यानिमित्त त्यांना मनःपूर्वक हार्दिक
शुभेच्छा! तसेच त्यांना त्यांच्या भविष्यातील सामाजिक
कार्यासाठी हार्दिक शुभकामना !!

प्रा. जयश्री मॅडम यांनी दि. 6 मे 2014 च्या वाढदिवसी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केलेला असून दि. 14 मे 2016 च्या वाढदिवसानिमित्त देहदानाचा संकल्प केलेला आहे. अशा या रणरागिणीला आमचा आदरपूर्वक मानाचा मुजरा !!!

प्रा. जयश्री दाभाडे- साळुंकेचे मूळ गाव अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे. त्यांचे पिताश्री श्री. आत्माराम दाभाडे व मातोश्री सौ. ठगुबाई दाभाडे हे दोन्हीहि प्राथमिक शिक्षक-शिक्षिका तसेच मोठे काका कै अण्णासाहेब सिताराम दाभाडे हे नाशिक येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता व लहान काका कै. बाळासाहेब रामदास सुग्राम दाभाडे हे जळगाव जिल्हा परिषदेचे 12 वर्षे समाजकल्याण समितीचे सभापती व अमळनेर पंचायत समितीचे 5 वर्षे सभापती होते. त्यांनी सन 1978 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे जयश्री यांना घरातूनच राजकारण व समाजकारणाचे बाळकडू मिळालेले आहे. त्यामुळे त्या पुरोगामी विचारसरणीच्या धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या लहानपणी त्यांनी खूपच संघर्ष केलेला आहे. पिंगळवाडे-मेहरगांवच्या शेतात काम करणे, गाई-म्हशी चरायला जंगलात नेणे तसेच अमळनेर शहरात सराफ बाजार ते वाडी चौकात जाऊन दुधाची विक्री करणे अशी खडतर कामे त्यांनी लहानपणीच केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्याची वाटचाल संघर्षातून समृद्धीकडे झालेली आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा “शिका व संघर्ष करा व संघटित व्हा” हा कानमंत्र त्यांनी मनापासून जपलेला आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर असून गेल्या 25 वर्षांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्यात ही विचारधारा स्पष्टपणे दिसून येते. एकदा नव्हे-दोन नव्हे तर चक्क नऊ वेळा त्या M.P.S.C च्या परीक्षा पास होऊन एक प्रकारे विक्रमच केलेला आहे. त्या सन 1992 से 1996 साली मुंबई येथील कामगार कल्याण आयुक्त कार्यालयात कार्यरत होत्या. त्याआधी त्यांनी मंत्रालय व ओल्ड कस्टम हाऊस येथील चांगली नोकरी सोडली होती. त्यानंतर त्यांनी आपले कार्य-क्षेत्र अमळनेरची निवड केली. त्या आज अमळनेर येथील
रुक्मीणीताई कला व वाणिज्य उच्च महिला महाविद्यालयात इतिहास
विभागाच्या विभाग प्रमुख आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या गड-किल्ले आणि त्यांच्या पराक्रमाचे त्यांना विशेष कौतुक असून त्यांच्या पराक्रमांवर त्यांनी भरपूर लिखाण केलेले असून अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत. त्या इतिहासाच्या एक परिपूर्ण प्राध्यापिका आहेत. इतिहासाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत असताना विषयाची गरज आणि विशेष ज्ञान मिळविण्याच्या हेतूने त्यांनी अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालयात उर्दू आणि फारसी भाषेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचबरोबर मोडी लिपी ज्ञात असणाऱ्या आणि लिप्यांतर करणाऱ्या सध्या तरी त्या एकमेव महिला प्राध्यापिका आहेत. शासकीय पातळीवर जेंव्हा जेंव्हा लिप्यांतर करण्याची गरज भासते तेंव्हा प्रा. दाभाडे ह्या शासनाला मदत करीत असतात. त्यांना एकूण 18 भाषा अवगत आहेत.

त्यांनी त्यांच्या महाविद्यालयात अनेक चांगले उपक्रम राबविलेले आहेत. यासाठी त्यांना नेहमीच संस्थेचे संस्थापक चेअरमन व माजी केंद्रीय मंत्री मा. नानासाहेब विजय नवल पाटील आणि त्यांचे सुपुत्र श्री. अनिकेतभैय्या पाटील यांचे वेळोवेळी सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद मिळालेला आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी वर्गाचे वेळोवेळी मार्गदर्शन , सहकार्य मिळालेले आहे. त्यामागील 27 वर्षापासून इतिहास विषयाच्या व्याख्याता म्हणून कार्यरत असून उत्कृष्ट निवेदिका, सूत्रसंचालक आणि वक्ता म्हणून सुप्रसिद्ध आहेत. त्यांना आतापर्यंत सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल राष्ट्रीय-आंतर राष्ट्रीय – विभागीय जिल्हास्तर व तालुका स्तरीय व महाराष्ट्र शासनाचे पुरस्कृत 52 पुरस्कार प्राप्त झालेले असून त्यांचे व्यक्तीमत्व हे खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते.52 पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या तालुक्यातील एकमेव सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार आहेत.

संघर्षाची दामिनी प्रा. जयश्री साळुंके ह्या ठोस प्रहार न्यूज पोर्टल आणि न्यूज चॅनलच्या मुख्य संपादिका असून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे 120 प्रतिनिधी कार्यरत आहेत. महाराष्ट्र प्रदेश आदिवासी एकता संघर्ष समितीच्या संस्थात्मक अध्यक्षा आहेत. तसेच पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन नासिक विभागाच्या विभागीय अध्यक्षा असून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सल्लागार आहेत. ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनच्या उपाध्यक्ष असून ट्रायबल फोरमच्या त्या महिला अध्यक्षा म्हणून राज्यात कार्यरत आहेत. त्या कौटुंबिक मार्गदर्शन व समुपदेशन केंद्राच्या सदस्या असून आतापर्यंत 4000 कुटुंबांचे समुपदेशन त्यांनी विनामूल्य केलेले असून ती सर्व कुटुंबे आज गुण्या गोविंदाने नांदत आहेत.सेल्फ डिफेन्स ट्रेनर म्हणून त्या कार्यरत आहेत.

अनेक गरीब, गरजू, वंचित घटकांना त्यांनी पत्रव्यवहार, मोर्चे आंदोलने, उपोषणे या मार्फत न्याय मिळवून दिला आहे. आपला व कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस त्या गेल्या 25 वर्षांपासून समाजातील गरजू कुटुंबांना मदत करून साजरा करतात. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बंद करण्यासाठी अग्रेसर आहेत. 8 बालविवाह थांबवून प्रशासनाला त्याची माहिती देवून दोषींवर कारवाई केलेली आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय चर्चासत्रातून शोधनिबंध प्रकाशित असून पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे.

विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास, मुलाखत तंत्र, महिलांवरील अत्याचार आणि उपाययोजना,बचत गट मार्गदर्शन, महिला आणि अंधश्रद्धा, महिला आणि आरोग्य, रेड लाईट एरियात एच.आय. व्ही. बाबत जनजागृती,संवाद – संभाषण कौशल्य, आपत्ती व्यवस्थापन आदि विषयांवर आपल्या व्याख्यानातून बहुमूल्य मार्गदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात विनामूल्य करीत असतात.

त्यांना सन 2013-2014 या वर्षासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचा जिल्हा स्तरीय राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलेले आहे. सदर पुरस्कार जळगाव जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा.श्री.अमन मित्तल साहेबांच्या शुभहस्ते देण्यात आला आहे.हा पुरस्कार त्यानी आपले पतीराज कै. राजेंद्र साळुंके यांना समर्पित केलेला आहे. त्यांच्या सर्वच सामाजिक कार्यात ते नेहमीच दीपस्तंभासारखे सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहत होते. नुकतेच त्यांचे अकस्मात दुःखद निधन झालेले आहे.

कोरोना कालावधीत यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेकडों
गरजवंतांना सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे.

प्रा. जयश्री साळुंके यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी तनया ही B.E computer science संगणक अभियंता असून एका नावाजलेल्या मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. तनया ही एक उत्कृष्ठ नृत्यांगना असून रांगोळी, महेंदी, चित्रकलेत नेहमीच अग्रेसर असते. तिचे हस्ताक्षर उत्कृष्ट असून तिला राज्य स्तरीय उत्कृष्ठ हस्ताक्षराची अनेक बक्षिसे प्राप्त झालेले आहे. तसेच लहान मुलगी मानसी ही वाणिज्य शाखेची पदवीधर असून तिने एम.बी.ए देखील केलेले आहे. ती डेलॉइट ह्या आंतरराष्ट्रीय कंपनीत कर सल्लागार म्हणून कार्यरत आहे. ती देखील तनया सारखीच नृत्यांगना असून कथ्थक या भारतीय शास्त्रीय नृत्य पारंगत आहे. तिने जर्मन भाषेचाही अभ्यास केलेला आहे. तनया व मानसी या दोन्हीही बहिणींनी 2002 साली सह्याद्री वाहिनीवरील “दम दमा दम ” या नृत्य शोमध्ये सर्वात आधी जळगांव जिल्हयातर्फे प्रतिनिधीत्व केलेलेआहे. दोन्ही जावई मयूर चव्हाण (तनया) आणि रोहित चांडक (मानसी) यांचे खूप सहकार्य आणि पाठिंबा असतो. त्याचप्रमाणे घरातील नवीन सदस्य छोटी नात साऊ (सावित्रीबाई फुले यांचे नाव) उर्फ आयरा हिच्या आगमनाने निच्छितच अधिक समाधान आणि परिपूर्ततेची भावना निर्माण झाली आहे. मँडमचे पती कै राजेंद्र साळुंके हे मुंबईत वेस्टर्न रेल्वेच्या डी.आर.एम. कार्यालयात सी. ओ. एस.पदी कार्यरत होते. मॅडमच्या सर्वच कार्यात आईचा खूप मोठा वाटा,आशिर्वाद,सहकार्य आणि पाठिंबा आहे. त्यांच्या कुटुंबावर त्यांची नेहमीच कृपादृष्टी आहे. त्यामुळेच त्या आज यशस्वी झाल्या आहेत.

✒️लेखक:- राजेंद्र माधवराव सुतार (मुक्त पत्रकार)

▪️मुंबई संकलन:- शांतारामभाऊ दुनबळे,नाशिक