सामाजिक जाणीव प्रकट करणारी कविता

55

🔸जगावे एक पाऊल पुढे
—————————————-
✒️प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे(मु.भांबोरा ता.तिवसा,जिल्हा अमरावती)भ्रमणध्वनी :- ९९७०९९१४६४
—————————————-
काविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे.यात मुख्यतः छंदोबद्ध अन् रसबद्ध काव्यरचनेचा समावेश असतो. काव्यातून मानवी जीवन कळते, समजते अन उमगते. काव्यरचनेच्या माध्यमातूनच मानवी मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनस्थिती व्यक्त करता येते.मानवी मनातील वेदना माणसापर्यंत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण साधन म्हणजे काविता म्हणावे लागेल.ज्यांच्या लेखन कौशल्यातून सभोवतील वा समाजातील व्यथा,वेदना,आनंद, दुःख,अन्याय,अत्याचार,संघर्ष, वाताहत याबाबतचे वास्तव ज्यांच्या साहित्यात खऱ्या अर्थाने प्रतिबिंबित होते तोच खरा साहित्यिक होय.त्याच धाटणीतील मानव कल्याण ही बाब केंद्रस्थानी ठेवून व्यक्त होणाऱ्या कवी पैकी एक म्हणजे वैद्यकीय व्यवसायातील पण सामाजिक जाण अन भान असलेला कवी डॉ.कमल राऊत एक आहेत.त्यांच्या ठायी असणारी सामाजिक कणव,सूक्ष्म निरीक्षण आणि चिंतनशील वृत्ती ही त्यांच्या “जगावे एक पाऊल पुढे” या काव्यसंग्रहातून व्यक्त झाली आहे.सूक्ष्म अवलोकनातून सामाजिक नव मूल्ये प्रदान करणारा त्यांचा हा काव्यसंग्रह आहे.अमरावतीच्या वैद्यकीय,शैक्षणिक,सांस्कृतिक, धार्मिक,सामाजिक विकास कार्यात/उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणारे मनमिळावू,मितभाषी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ.राऊत यांनी त्यांच्या काव्यसंग्रहातून वर्तमानाच्या दाहकतेचे प्रतिबिंब रेखाटण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे.नव्या पिढीतील सामाजिक कणव अन वास्तवतेचं भान असलेला एक दमदार क्रांतिकारी प्रगल्भ कवी म्हणून डॉ.कमल राऊत स्वकर्तृत्वाने सर्वपरिचित आहेत.सभोवतालची व्यावहारीक ,सूक्ष्म अवलोकन अन् अभ्यासपूर्ण मांडणी ही त्यांच्या कवितेचे बलस्थाने आहेत.यातूनच समाजाला भविष्यासाठी नवं दिशा देणारा
“जगावे एक पाऊल पुढे” हा वैशिष्ट्यपूर्ण काव्यसंग्रह वाचकांच्या सेवेत नुकताच दाखल होत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन .
कवी डॉ.कमल राऊत यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह असून त्यात एकूण १०७ काव्यरचनांचा समावेश आहे. यामध्ये सामाजिक,सांस्कृतिक शैक्षणिक,आर्थिक आणि राजकीय यासह सर्वच प्रकारच्या विषयाची सूत्रबद्ध मांडणी करतानांच सामाजिक जबाबदारी आणि उत्तरदायित्वाची जाणीव त्यांची कविता करून देते.सभोवतालच्या जगाची अचूक अन् जागरुकपणाने नोंद घेत संवेदनशीलपणे अनेक मानवी हितार्थ बाबी त्यांनी अलगदपणे टिपल्यात अन् काव्यात मांडल्यात.त्यांच्या कावितेतून त्यांनी पुरोगामी विचाराच्या महापुरूषाचे प्रेरक विचार आणि प्रबोधनात्मक विचारांची पेरणी केली असल्याचे निदर्शनात येतेच, शिवाय मानवी जीवनाचा प्रवास,प्रामाणिकपणा मनुष्य प्राण्याचे कर्तव्य,नाते संबधातील गुंफण,संसार, संस्कार,पती-पत्नीतील नाजूक संबंध/व्यवहार, माता-पित्याची सेवा,शेजार धर्म, मुखवाणी,माणूसकीची चाळ,दानधर्म,प्रेमभाव,परोपकारी वृत्ती,पशू पक्षावरील दया,जात, धर्म ,पंथ,देव,स्वर्ग,नरक, अंधश्रद्धा,अनिष्ट रूढी,प्रथा परंपरा,स्वार्थी वृत्ती,भ्रष्टाचार, बेरोजगारी,निसर्ग,पर्यावरण,स्त्री जीवन इत्यादी बाबतीत कवींनी बदलत्या परिप्रेक्षाचा अचूक वेध घेतला आहे.भूतकाळातील घटनांचा बोध आणि भविष्याचा वेध घेत वर्तमानात मानवी व्यवहार कसा असावा याबाबतीत कवी डॉ.कमल राऊत यांनी अभ्यासपूर्ण असे भाष्य केले आहे.मानवी जीवन समृद्ध व सुखद करण्याचा कवीचा आटापिटा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे.काळाच्या ओघात मनुष्य प्राण्यांनीही स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे.पण कविला सकारात्मक,संस्कारक्षम, मानवी कल्याण साधणारा आणि समृद्ध पिढी घडविणारा बदल अपेक्षित आहे. सुसंस्कारीत पिढी घडविणे हे आपल्या हाती आहे.त्यांची सुरूवात ही बालवयापासूनच पालकांनी करायला हवी असा कवीचा ध्यास आहे.कवी म्हणतात,

” बालसंस्काराला महत्त्व अती
तेथूनच मिळते जीवनाला गती
कोऱ्या मेंदूवर संस्कार घडती
ते जीवनभर आपुल्या संगती “
(संस्कार पृ क्र ८५)
संस्काराची शिदोरी गाठी बांधून त्याचबरोबर कौटुंबिक आणि सामाजिक नातेसंबंधतात समन्वय कसा असावा याची प्रचिती त्यांची कविता देते.नात्यातील गोडवा, मातीचा सुगंध,मरणासाठी जगतो फक्त,या काव्यातून कवीच्या भावना व्यक्त झाल्या आहेत.कवी म्हणतात,

“संसारी नात्याची महती
सर्व नाती एकत्र गुंफती
नात्यातील गोडवा टिकविणे
सर्व एकमेकाच्या हाती “
(नात्यातील गोडवा पृ.क्र.८७)
अनेकविध संकटावर मात करीत मानव विकसित झाला पण हाच माणूस स्वार्थ अन भौतिक सुखाच्या नादी लागून माणूसपण विसरून एक दुस-याच्या जीवावर उठलेला दिसतो आहे.एकमेकांचे वैरी झाले आहेत.भाऊ भावाचेच वैरी झालेत.माणुसकीचे तर धिंडवडे निघू लागलेत.नीतिमत्ता शून्यवत झाली.सर्वकाही धनसंपत्तीने मिळते, हा केवळ त्याला झालेला भास आहे. हे तो कधी ध्यानातच घेत नाही.मनुष्याची खरी संपत्ती ही त्याची शरीर संपत्ती आहे.हेच खरे सर्वश्रेष्ठ धन आहे.आगाऊ धनसंपत्तीची आस अवनतीच्या/अनीतीच्या मार्गाने कशी नेणारी आहे ? याची जाणीव कवी करून देतात.मनुष्य आयुष्यभर मरमर कष्ट करतो.पण आयुष्याच्या उत्तरार्धात करोडोची संपत्ती सुध्दा सुसंस्काराअभावी किंवा अन्य कारणामुळे कशी निकामी ठरते ? याबाबतची वास्तव मांडणी कवीने .”रस्ते” या कवितेत केली आहे.

“लालचीच्या रस्त्याने
वरवर असते सुख
एकदा लालचीत पडला
मिटत नाही कधीच भूख”
(रस्ते पृ.क्र.१८)
कवी येथेच थांबत नाही तर व्यक्ती समूहांना परोपकारी वृत्तीची जाणीव करून देण्यासही ते विसरत नाही.इतरांच्या सुखातच आपले खरे सुख कसे दडलेले आहे? याचे रहस्य ते आपल्या काव्यातून उलगडतात.

” दृष्टी असावी अशी
कुणाचेही बघावे भले
त्याचे आनंदात
आपलाही आनंद खुले “
(दृष्टी पृ.क्र.१८३ )
आई वडीलाप्रती कृतज्ञ भाव इतरांप्रमाणेच कवीच्याही मनात आहे.आई-वडिलांची सेवा हीच खरी सेवा आहे.म्हणून आई- वडीलांपासून परागंदा असलेल्या मुलांना अनमोल असा कानमंत्र ते देतात.

” हवा असेल वृद्धापकाळात मेवा
माता-पित्याची करावी सेवा
ठेवा मनोभावे
नका करू कुणाचाही हेवा
दगडाच्या पुजेपेक्षा
श्रेष्ठ माता-पित्याची पूजा
त्यानेच जग दाखविले
आला न कोणी दुजा
(कानमंत्र पृ.क्र.११२)

विज्ञानाने प्रचंड प्रगती साधली असली तरी अनिष्ट प्रथा,परंपरा,अंधश्रद्धा अजिबात अस्तित्वात नाही, असं कुणीच ठामपणे म्हणू शकत नाही.महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अंधश्रद्धा,अमानवीय आणि जाचक अनिष्ट प्रथा,परंपरा तसेच जादूटोणा,नरबळी, नजरटोक,भूत-प्रेत, पिशाच्च असले प्रकार आजही आढळून येतात.अनेक समाजसुधारकांनी अशा अनिष्ट प्रथा परंपरेवर आणि अंधश्रद्धावर जबरदस्त प्रहार केला आहे.तोच धागा पकडून कवी , तिथी,माणूसच कारणीभूत,मूठमाती,प्रकाश मार्ग, किमया हाताची, गुलामगिरी,वादळ,उठती अंधश्रद्धेची वादळे,ज्वारी सोबत दळती खळे,जिथे नांदतो बुद्ध,एक पाऊल पुढे या काव्यरचनेतून जबरदस्त प्रहार करीत सुखी संसार आणि उज्वल भविष्यासाठी अंधश्रद्धेवर मात आणि अनिष्ट रूढी परंपरेचे बंधने तुडवीत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन करतांना दिसतात.

” अंधश्रद्धेच्या वाटे
सदा अंधार रेटे
चालावे डोळस मार्गे
सदा सुख भेटे
(प्रकाशमार्ग पृ.क्र.१४९)

माथ्यावर नव्हे तर मनगटावर विश्वास ठेवा ! अन् स्वकर्तृत्व सिद्ध करा .असा अनमोल सल्लाही कवी देतात.

” स्वकर्तृत्वावर जगावे जीवन
योग्य असावी गती
जुन्या विचाराला वर्जावे
अंधश्रद्धेला द्यावी मूठमाती “

विज्ञानाची धरावी कास
अज्ञानाने जीवनाची माती
कारणाविना कार्य नाही
जादूटोण्याला मूठमाती
(मूठमाती पृ.क्र.१५१)

जातिव्यवस्थेची भक्कम असलेली विषमतावादी उतरंड उलथवून टाकण्यासाठी अनेक महापुरुषांनी जीवाचे रान केले. संपूर्ण आयुष्य पणाला लावले. ‘जी जात नाही ती “जात”. आजही व्यक्तीच्या मनामनात जात तितक्याच ताकतीने चिकटलेली आहे.जाती धर्माच्या संस्कार शाळेतून सुद्धा इतर जाती-धर्मा प्रति विष कालविण्यास कसलीही कसर सोडली जात नाही.जातीच्या रक्तावर कधी मार कधी वार केला जातो.माणसाने माणसा-माणसात जातीयतेच्या चिरेबंद भिंती भक्कमपणे उभ्या केल्या आहेत. जाती-धर्माच्या सिद्धांतात खऱ्या अर्थाने स्वार्थ अन् राजकारण दडलेले असते .हे सर्वसामान्यांना अजूनही का उमगत नाही ? याचे कोडे कवींना पडलेले दिसते.समाजकंटक जाती-धर्माच्या नावाखाली विद्वेष पसरवितात.सर्वसामान्यांना वेठीस धरतात.जाती धर्माच्या भिंती ह्या अखेर अधोगतीलाच पोषक ठरतात. हे सत्य सर्वसामान्य माणूस का स्वीकारत नाही ?असा प्रश्नही कवींना आपसूकच पडतो.हाच भाव कवीने, ‘दाखवा मला जात’,’सर्वस्वी माणूस’, ‘धर्मांध’, ‘माझे मलाच कळले नाही’, ‘वादळ’,’भेद’,’जात’,’ जातीचे निखारे’,’उघडा मनाची दारे’, ‘एक पाऊल पुढे’ या काव्य रचनेतून मांडला आहे.जाती धर्माच्या भिंतीला छेद देण्याचे महत्कार्य त्यांनी काव्यातून केले आहे.निकोप आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी कवी व्यक्त होतात की,

” जाती-धर्माच्या गुलामगिरीचा
तोडूनी टाका धागा
इलेक्ट्रॉनिक युगात तरी
माणसासारखे वागा “
(एक पाऊल पुढे पृ.क्र २८ )

“जाती मानवाची निर्मिती
माणसा-माणसात भीती
जन्मताच माणूस असतो
माणूसच राहतो अंती
असावे जातीयतेच्या पुढे
जगावे एक पाऊल पुढे “
(जगावे एक पाऊल पुढे पृ.क्र.३०)

पर्यावरणाची हानी आणि बिघडता समतोल भविष्यासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. पर्यावरणाचे संतुलन राखणे आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरणातील विविध जैविक-अजैविक घटक हे मानवासाठी निसर्गाची अनमोल अशी देणगी आहे.परंतु प्रगती, आधुनिकीकरण,वाढते शहरीकरण,तसेच भौतिक सुखाच्या नादी लागल्याने पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस अधिकाधिक ढासळतो आहे.पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे कवी पोटतिडकीने मांडतात. ‘दुःख’, ‘कारणीभूत तूच’,’अनमोल ठेवा’, ‘भविष्यवाणी ‘ ह्या त्यांच्या प्रातिनिधिक काव्यरचना आहेत. पर्यावरणाचे महत्त्व विशद करताना कवी “अनमोल ठेवा ” या काव्यरचनेत छान व्यक्त होतात .

” निसर्गाचे फिरते चक्र
निसर्गाला करू नये दावा
निसर्गामुळे भोजन मिळत
लक्षात ठेवा
निसर्गाचे रक्षण हाच अनमोल
जीवनाचा ठेवा “
(अनमोल ठेवा पृ.क्र.२२)

भारतीय संस्कृतीत दानधर्माला अनन्यसाधारण महत्व आहे. जगातील सर्वच धर्मात असेच महत्त्व आहे.आपल्या जवळ जे आहे ते केवळ आपलेच नाही, तर आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो याकडे कवी आवर्जून लक्ष वेधतात.बौद्ध उपासक “दान प्रसाद” हे बुद्ध वचन मानतात. ईस्लाममध्ये विशद केलेल्या पाच मूलभूत धर्मस्तंभापैकी एक आहे .दान स्तंभ.शीख पंथाचे संस्थापक श्री.गुरुनानक यांच्या शिकवणीतील तीन मुख्य तत्वांपैकी “वाड.छोको ” हे एक तत्व आहे.जैन परंपरेतील आचार्य कुदकुंदानी “रयणसार” ग्रंथात उपदेश देताना म्हटले आहे की,
“दाणं पुया मुकखो, सावय धम्मे णं सावया तेणं वीणा”.हिंदू तसेच सनातन धर्मामध्ये सुद्धा भूमीदान,गौदान,अन्नदान, कन्यादान,विद्यादन असे पाच प्रकारचे दान सांगितले आहेत.समाज जीवनामध्ये आयुष्य व्यतीत करताना वेगवेगळ्या प्रकारच्या दानाला महत्त्व आहे.कवीने सुद्धा आपल्या अनेकविध काव्य रचनेमध्ये नेत्रदान,रक्तदान,द्रव्यदान, विद्यादान,देहदान इत्यादीचे जोरकसपणे महत्त्व पटवून दिले आहे. ‘आंनद’, ‘मरणासाठी जगतो फक्त’, ‘प्रवास’,’प्रेमाचा धागा’ ह्या त्यांच्या प्रातिनिधिक काव्यरचना आहेत.

कवी डॉ.कमल राऊत वैद्यकीय व्यवसायातील असले तरी इतरांप्रमाणे त्यांनी या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून न बघता सामाजिक बांधिलकीतून खऱ्या अर्थाने सेवेचे व्रत स्वीकारले, हे सर्वश्रुत आहे. त्यातूनच कवीला वेळोवेळी आलेले अनुभव त्यांनी अलगदपणे टिपलेत अन् काव्य स्वरूपात मांडले.सामाजिक आशय हे त्यांच्या काव्यरचनेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे.मानवी जीवनातील अनेकविध दैनंदिन, व्यावहारिक प्रसंग त्यांनी शब्दबद्ध केले आहे. शेजारपाजारच्या सोबतच्या व्यवहारापासून तर इतर आप्तस्वकीय यांच्या बरोबरच पती-पत्नीतील समन्वय आणि नात्यातील सामंजस्यपणा यासंदर्भात उद्बोधक विचार पेरणी केली आहे.समाजविघातक कृती/व्यवहाराचा आसुरी आनंद मानणाऱ्या विकृत विचारसरणीच्या लोकांचाही त्यांनी खरपूस समाचार घेण्यास कसलीच कसर सोडली नाही. कवि म्हणतात की, खरा आनंद हा थोरामोठ्यांचा, स्त्री जातीचा सन्मान करण्यात,भक्षणापेक्षा रक्षणात, स्वसुखापेक्षा इतरांच्या सुख-दुःखात, मारण्यापेक्षा- तारण्यात,तोडण्यापेक्षा- जोडण्यात, अन्यायी अत्याचारी प्रवृत्ती विरोधात लढण्यात खरा आनंद आहे. तर विनयशीलता आपुलकी प्रेमाने हसत-खेळत जगण्यात आई-वडिलांच्या सेवेत स्वतःला झोकून देण्यात शेवटी खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्यातच महाआनंद असल्याचे राऊत यांची कविता अधोरेखित करते.कवी या विषयी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात की,

” इथे सर्व आहे व्यर्थ
कशालाच नाही अर्थ
म्हणून माणसाने माणसाशी
सदैव वागावे निस्वार्थ “
डॉ.कमल राऊत यांची काव्यरचना ही सामाजिक दृष्ट्या सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य करण्याची ऊर्जा प्रदान करणारी आहे. त्यांच्या जीवन,सत्कर्म,ध्यास, संसार,मरमर,रस्ते दुःख ,स्वर्गीय, प्रेम संपेना,कर्तव्य,बदलते स्वरूप,परिस्थिती,जगण्यापेक्षा मरणे बरे,विश्वास, लक्ष्य,वाणी, भाषा, माणूस तोची खरा,चालना, माना न माना, स्वयंसिद्ध पुरुष, खोटा स्वाभिमान,दुनिया रोज बदलते रंग, प्रेम, प्रेमाचा रंग, रडतो ढसाढसा इत्यादी काव्यरचना ह्या जीवन जगण्याचे रहस्य उलगडते.व्यक्ती माझे -माझे करून उभे आयुष्य मानसिक तणावात जगतो.इथे कुणाचेच काही नाही.म्हणून खोट्या स्वाभिमानाचा त्याग करा आणि विशाल लक्ष्य/ध्येय उराशी बाळगून, इतरांनाही विकास करून स्वयंसिध्द बनण्याचा मार्ग त्यांची कविता सुकर करते. या विषयी अधीक प्रकाश टाकताना कवी म्हणतो,

” माणूस म्हणून जन्मलो
ठेव कर्तव्याची जाण
वैयक्तिक जगणे,जगणे नव्हे
असुदे सामाजिक भान “
(कर्तव्य पृ.क्र.७८)
सामाजिक भान जपत संसाराचा गाडा पुढे रेटताना जीवन जगण्याची वाट सुखदायक करण्यास राऊताची कविता पाठबळ देते.कवि म्हणतात की,

” सुख दुःखाचे डोंगर इथे
उतार-चढाचा घाट
क्षणोक्षणी स्वीकारा मध्यममार्ग
हीच जीवनाची उत्तम वाट “
( जीवन पृ.क्र.३१)

डॉ.राऊताचे कवितेत बुद्धाचे तत्वज्ञान आहे.मात्र त्यांच्या काव्य रचनेतून बुद्धाने नाकारलेल्या पाप-पुण्य,स्वर्गाची वाट,देवापुढे सुखाची भिक्षा, मोक्ष, पुण्यकर्मी, दैविकतेच्या भावना,अनाकलनीय वाटते.असे असले तरी त्यांचा काव्यसंग्रह हा पूर्णपणे सामाजिक धाटणीचा आहे.समाजाला नवी दिशा देणारा,जगण्याची ऊर्जा प्रदान करणारा आणि सामाजिक बांधिलकीतून ” एक पाऊल पुढे नेणारा ” आहे.हा त्यांचा काव्यसंग्रह आज आणि उद्याच्या पिढीला ऊर्जावंत प्रेरणा देईल.तसेच त्यांच्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा ध्यास वाचकांच्या पसंतीस उतरेल, याची मला पूर्णपणे खात्री आहे. डॉ.कमल राऊत यांना पुढील वाटचालीसाठी आणि सकस साहित्यनिर्मितीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा——-!!!!!!