आंबेडकरी चळवळीला गतिमानतेची गरज

35

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सर्वव्यापक नेते होते.विषमतावादी समाज रचना असलेल्या बहुजन समाजातील शोषित,पिडित,उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले महान कार्य अद्वितीय आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी कडवी झुंज देत देश-परदेशात उच्च शिक्षण घेतले. अगाध बुद्धिमत्तेचा परिचय देत देश-विदेशातील शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटविला. डॉ.आंबेडकर ज्ञानी होते.त्याची विद्वत्ता अद्वितीय होती.प्रखर देशभक्त,अंधश्रद्धेचे विरोधक,विज्ञाननिष्ठ, शिक्षणक्षेत्राचे प्रेरणास्रोत, संविधानाचे शिल्पकार,विचार स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते,बहुजन समाजाचे कैवारी, सांप्रदायिक सद्भावना,सहिष्णुतेचे प्रेरक, महिला सक्षमीकरणाचे कट्टर समर्थक, आर्थिक-सामाजिक व राजकीय विचारवंत,आंतरराष्ट्रीय संबंधाचे जाणकार, झुंजार पत्रकार,संपादक,लेखक लोकशाहीवादी नेते, कामगारासाठी लढवय्ये नेते, शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने हाताळणारे,ऊर्जा व जलसंधारणाचे नियोजक,प्रभावी वक्ते असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आणि कर्तुत्व न भूतो न भविष्यती असे आहे.सामाजिक आणि धार्मिक क्रांती संपूर्ण जगाने अनुभवली आहे.

डॉ.बाबासाहेबांचे अपार कष्ट आणि अथक परिश्रम,समाज उत्थानाच्या ध्यासाने भारतीय समाज रचनेत आमूलाग्र परिवर्तन घडून आले आहे. बाबासाहेबांची ही सामाजिक क्रांती आणि सर्वव्यापक विचारधारा देशातील शोषित,पीडित आणि उपेक्षित समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरली.स्वातंत्र्य,समता बंधुत्व आणि न्यायाचे तत्त्व प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारावर प्रचंड विश्वास असलेला एक मोठा जनसमूह निर्माण झाला आहे.

डॉ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी विचारांची आस्था व निष्ठा असलेल्या व्यक्तीच्या संघठनातून आंबेडकरी चळवळीचा जन्म झाला.या चळवळीतून विविधांगी नेतृत्वही पुढे आले आहे.डॉ.आंबेडकर यांच्या स्वप्नातील प्रगतिशील आणि परिवर्तनशील भारतीय समाजरचना घडविण्यासाठी आंबेडकरी समाज पूर्ण ताकदीनिशी पुढे आला. चळवळ उभी केली. चळवळ पुढे रेटत राहिली अन आंबेडकरी चळवळीला प्रचंड गती मिळू लागली होती. समाजही चळवळीकडे न्याय व समतेसाठी आस लावून बसला व आपल्या योग्यतेनुसार योगदान देऊ लागला.बहुजनाच्या हक्कासाठी लढवय्या चळवळी,नेतृत्व आणि समाज एकवटल्याने विरोधकही पुरते धास्तावले.१९७० ते २००० या दशकामध्ये विविध आंदोलनाने चळवळ अत्यंत प्रभावी ठरली.तत्कालीन स्थितीत चळवळीच्या आंदोलनाची प्रचिती सर्वांनाच आली.प्रभावी चळवळ व आंदोलनातून काही नेतृत्वला राज्य-राष्ट्रीय पातळीवर वेगळे स्थान मिळवून दिले.साहित्य क्षेत्रात तर प्रचंड क्रांती झाली.त्यातूनच आंबेडकरी साहित्य क्षेत्राला स्वतंत्र ओळख प्राप्त झाली.आंबेडकरी साहित्य क्षेत्र इतरांसाठी दखल पात्र तसेच प्रेरणास्त्रोत ठरले.आंबेडकरी विचाराचे उपक्रम व कार्यक्रमाला प्रचंड गर्दी ही इतरांसाठी धसका व धडकी भरणारी होती.पुढे कालांतराने प्रभावी नेतृत्वाअभावी व संधीसाधू नेत्यामूळे उत्तरोत्तर हेच प्रमाण कमी होत गेले आणि होत आहे.चळवळीचा प्रभाव कमी झाला.पूर्वीची असलेली आस्था व तळमळ वास्तवात दिसत नाही (केवळ विचार सांगण्यासाठी) आंबेडकरी कार्यक्रमापासून स्वतःला दूर ठेवण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढू लागली.वाढत आहे.वाड्या-वस्त्यातील कार्यक्रमाची रेलचेल कायम पण शहरातील सुशिक्षित आणि सुखवस्तू आंबेडकरी समाजातील काही लोक अंतर ठेवून खोट्या प्रतिष्ठेच्या नादात चळवळीकडे पाठ फिरू लागला.

आंबेडकरी चळवळ विसरल्यागत झाला.परिणामतः वैचारिक जनजागृती स्थिरावस्थेत आली आहे.नव्वदच्या दशकानंतर छोट्या मोठ्या गावात साहित्य संमेलने,कवी संमेलने, चर्चासत्रे,प्रबोधनात्मक कार्यक्रम गाव पातळीवरसुद्धा व्हायची.आज तशी ती परिस्थिती दिसत नाही त्यामुळे वैचारिक देवाण-घेवाण थांबली.निवडक व्यक्ती वा व्यक्ती समूह धडपड करतो पण त्यांना पुरेसा प्रतिसाद मिळेलच असे नाही. चळवळीत आलेली स्थिरावस्था खंडित करण्याचे आवाहन आज उभे ठाकले आहे.

पिढ्यान-पिढ्या घट्ट असलेल्या चातुर्वर्ण व्यवस्थेला छेद देत बहुजन समाजाच्या उद्धारासाठी डॉ.आंबेडकरांनी आयुष्यभर अविरत संघर्ष केला. शोषित,पिडित आणि वंचित बहुजनांना आणि संपूर्ण भारतीयांना एका नव्या वळणावर आणून सोडले.भारतीय प्रतिभेला अनेक साखळ्यातून मुक्त केले. निर्मितीच्या आणि सृजनाच्या दिशा खुल्या केल्या.विद्रोहाला वैश्विक प्रमाण दिले.समाजातील आर्थिक-सामाजिक विषमतेला छेद देत अर्थात अमानवी व्यवस्था पूर्णपणे नाकारून स्वातंत्र्य,समता,बंधुत्व,न्याय आणि व्यक्ती ची प्रतिष्ठा ह्या तत्वावर आधारित समाजव्यवस्था निर्मितीचे ध्येय निश्चित करून डॉ. आंबेडकर यांनी प्रस्थापित व्यवस्थेशी लढा दिला.लढत बहुजनाना न्याय मिळवून दिला. त्याच्या कार्याची फलश्रुती म्हणजे आजच्या स्थितीतील प्रगत झालेला उपेक्षित समाज तसेच बहुजन समाजाने साधलेला सर्वांगीण विकास आणि त्यांना प्राप्त होणाऱ्या नवनवीन संधी आहे.त्यातूनच आंबेडकरी विशेषतः बुद्धिष्ट समूहाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणा व आदर्शस्थानी ठेवून ज्ञानार्जन व मेहनतीच्या जोरावर प्रस्थापिताना धडकी भरेल अशी सर्वांगीण प्रगती साधली.काही दशकातील ही प्रगती अनेकांना बुचकळ्यात पाडणारी ठरली.तसेच प्रस्थापितांच्या ईर्षेसाठी सुद्धा पात्र ठरली. त्यातून उपेक्षितांना संधी देणाऱ्या या व्यवस्थेविरोधात प्रस्थापितांनी दंड थोपटले.जाती-धर्मामध्ये विद्वेषाचे विष कालविले.जातीव्यवस्थेच्या बळकटीसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे खतपाणी दिल्या जाते. बहुजन समाजाही प्रस्थापिताच्या कलुषित विचाराला द्वेषाच्या भावनेतून किंवा व्यक्तिगत स्वार्थासाठी बळी पडतात.ज्या गैर बुद्धिस्ट समूहाने सवलती/आरक्षणाचा लाभ घेतला आणि त्यातूनच आपली प्रगती साधली असे समूह सुद्धा आंबेडकरी चळवळीला बळ देण्याऐवजी प्रस्थापिताच्या पाठिशी राहण्यास धन्यता मानतात.

बहुजन समाजाला जाती-पोटजातीना आप-आपसात लढविण्याच्या षड्यंत्रला बळी पडतात आणि पडतं सुद्धा आहे.आपला वैचारिक शत्रू ओळखण्यात आपण कमी पडत आहे. आपलेच डोके आणि आपलेच दगड अशी स्थिती आहे जातीय विषमतेला खतपाणी घालणाऱ्या प्रस्थापितांना/धर्ममार्तंडाना शह देण्यासाठी पुन्हा आंबेडकर होणे नाही.आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे.आप-आपसातच लढलो तर प्रस्थापिताशी कसे लढणार आणि आंबेडकरी चळवळ कशी गतीमान होणार असा प्रश्न आहे. संभाव्य वैचारिक अधिकार व हक्कावर होणारी आक्रमणे पेलण्यासाठी समर्थ नेतृत्वाची खरी गरज आहे.

आंबेडकरी चळवळीतील प्रस्थापित नेतृत्वानी तर पर्यायी नेतृत्वास वावच दिला नाही. स्वतःची अस्मिता जपत केवळ स्वहित व स्वनेतृत्व कसे सुरक्षित राहिल याची पुरेपूर काळजी घेतली.चळवळी प्रती कार्यकर्त्यांमध्ये असलेली तळमळ/आस्था आजच्या अधिकांश नेत्यांमध्ये तितकी प्रभावी पणे दिसत नाही.याउलट स्वहित व राजकीय हितासाठी/लाभासाठी परस्पर विरोधी गटात/राजकीय पक्षात सामील होण्यास जराही कचरत नाही हे वास्तव आहे.

सध्यास्थितीत राजकीय चळवळीशी गद्दारी करणाऱ्या नेतृत्वाला वठणीवर आणण्यासाठी आणि पर्यायी नेतृत्वाला बळ देण्यासाठी सर्वसामान्यांनाच पुढे येण्याची अत्यंत आवश्यकता आहे.सध्यास्थितीत आंबेडकरी चळवळीपुढे तसेच समाजापुढे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.शिक्षण,रोजगार, गुणवत्ता यादीतील पूर्वीची स्थान-निश्चिती,शिष्यवृत्ती तसेच खाजगी/सरकारी नोकऱ्यांची अनुशेष भरती, कालपरत्वे उद्भवणारे सामाजिक व अन्य प्रश्न असताना आंबेडकरी चळवळीच्या तथाकथित नेतृत्वामध्ये उदासीनता प्रकर्षाने दिसून येते.सामाजिक-आर्थिक प्रश्न हाताळन्या ऐवजी राजकीय प्रश्नाकडे अधिक कल दिसतो.”जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे आहे” हे आंबेडकरांचे मात्र वारंवार समाजमनावर बिंबविल्या जाते.सत्तेत असल्यास असे प्रश्न लवकर मार्गी लागतील.यात शंका नाही.परंतु त्या दिशेने आपली राजकीय ताकद निर्माण झाली आहे का? व्यक्तिगत सत्तेचा मार्ग सुकर करण्यासाठी एकेकाळी विरोधीपक्षसारखी स्थिती असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे आपणस तुकडे तुकडे केले आहे.इतकेच नव्हे तर आंबेडकरी विचारधारा वेशीवर टांगून मिळेल त्या पक्षाकडून सत्तेत जाण्याची संधी मात्र एक-दोन नेत्याचा अपवाद वगळता कुणीच सोडत नाही.विखुरलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी केवळ निवडणुकांच्या तोंडावर संधीसाधू नेत्यांना याची जाणीव होते.इतकेच नव्हे तर विरोधकाशी लढण्याऐवजी आपापसातील वर्चस्वाच्या लढाईत निळ्या झेंडयाखाली एकत्र येण्याऐवजी सत्तेच्या हव्यासापोटी निळ्या झेंड्याचा लिलाव करण्यास सुद्धा नेतेमंडळी मागेपुढे पाहत नाही.

म्हणूनच प्रत्येक निवडणुकीच्या वेळी एखाद्या पक्षाच्या प्रचार गाडीला तसेच सभेत निळा झेंडा नाही असा पक्ष शोधून सुद्धा सापडत नाही. छोट्या-मोठ्या नेत्यांना आपल्या कळपात घेवून आंबेडकरी विचारधारा विरोधी पक्षही आंबेडकरी मतावर डोळा ठेवून असते.ज्यांनी आयुष्यभर निळ्या झेंड्याचा तिरस्कार केला आणि करीत आहे त्यांच्या साठी आपलेच तथाकथित नेतेमंडळी मते मागण्यासाठी जिवाचे रान करताना दिसतात.समाजहिता ऐवजी स्वतःची राजकीय सोय करण्यासाठी हा सर्व आटापिटा असतो.भोळी-भाबडी आंबेडकरी जनता मात्र निळ्या झेंड्याचा जाहीर लिलाव उघड्या डोळ्यांनी हताशपणे पाहत असतो.मग आंबेडकरी जनतेसाठी सत्तेचा मार्ग कसा सुकर होणार हा प्रश्न आहे.

निळ्या झेंड्याची अस्मिता प्राणपणाने जपणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्याला प्रस्तापिताचे मनसूबे हाणून पाडण्यासाठी चळवळीची ताकद निर्माण केल्याशिवाय गत्यंतर नाही.१४ ऑक्टोबर १९५६ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर स्थित आपल्या लाखो अनुयासह बौद्ध धम्म स्वीकारला.पिढ्यानपिढ्या अंधारात चाचपडत असलेल्या आणि दबलेल्या समाजाला बाहेर काढून स्वतः ची स्वतंत्र ओळख दिली.अस्मिता दिली.वैचारिक मूल्य व हक्क दिले. स्वाभिमान जागृत केला.केवळ धर्मानतराने सर्वच काही बदलेल असे नाही याची जाणीव आंबेडकरांना निश्चितच होती मात्र धर्मांतरानंतर डॉ. आंबेडकरांचे अल्पावधीतच महापरिनिर्वाण झाले.परिणामतः धम्म प्रचार व प्रसाराची सर्वस्व जबाबदारी ही धर्मांतरीत बौद्ध अनुयावर आली.धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी अनेक जण पुढे सुद्धा आलेत. प्रारंभी बौद्ध महासभेच्या माध्यमातून प्रचार व प्रसाराला गती सुद्धा आली होती.परंपरेच्या जोखडातून बाहेर आलेल्या अधिकांश अशिक्षित महारांना बौद्ध तत्वज्ञान समजून सांगणे एक कसरतच होती.धम्म चळवळीतील तत्कालीन मान्यवर यांनी हे आव्हान पेलले.परंतु कालांतराने आंबेडकरी चळवळ व राजकीय पक्षांप्रमाणेच धम्म चळवळीचे सुद्धा शकले पडलीत. विभिन्न मतप्रवाह/विचारसरणीअस्तित्वात आली. बौद्ध महासभेला समांतर काही धम्म संघटनाही अस्तित्वात आल्यात.प्रत्येक संघटना समर्थक आप-आपल्या सोयीनुसार धम्म प्रचार व प्रसार करु लागले. विभिन्न मतभिन्नतेतून भोळ्या-भाबड्या बौद्ध उपासकांना कुणाच्या बाजूने धम्म समजून घ्यावा,कुणाचे तत्वज्ञान अंगीकारावे ही समस्या निर्माण झाली खरी परंतु त्यावर उपाय नाही असे नाहीत.ज्या डॉ. आंबेडकरांनी आपल्याला स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मार्ग सुकर करून दिला त्यांच्या विचारांला प्रमाण मानून त्यांनी दिलेला बौद्ध धम्म आणि निर्माण केलेल्या मूळ संघटनाच्या माध्यमातून सांगितलेल्या बौद्ध धम्माला स्वीकारले पाहिजे.

आज घडीला अधिकांश बौद्ध वस्तीत बौद्ध विहाराची उभारणी झाली आहे.बौद्ध विहार नाही अशी वस्ती दुर्मिळच.विहार असलेल्या गावात छोट्या मुला पासून तर आबालवृद्ध पर्यंत बुद्ध तत्वज्ञान ग्रहण करतात.दोन-तीन दशकापूर्वी केवळ वंदना पाठ असलेल्या व्यक्तीचा शोध घ्यावा लागत असे. लग्न व अन्य विधीच्या बाबतीतही तीच स्थिती होती.आज मात्र अशी स्थिती नाही.बुध्द तत्त्वज्ञान घराघरात पोहोचले आहेत.मात्र आर्थिक संपन्न असलेले काही बौद्ध कुटुंबे बौद्ध विहारापासून अंतर ठेवू लागले.अन्य जाती समूहांना आपली जात आणि धम्म कळु नये अश्या विचारांच्या लोकांची संख्या कमी नाही.तथाकथित शिकले-सवरले उच्चभ्रू व्यक्ती समूहा ऐवजी बहुसंख्य गोरगरिबांच्या खांद्यावर धम्म चळवळीची धुरा आहे.आरक्षण आणि सोयी सवलती लाटून मान-सन्मान प्राप्त करणारे आणि आंबेडकरी चळवळीला बेईमान झालेले तसेच चळवळीपासून दूर अंतर ठेवणाऱ्या/सोंग घेऊन झोपणाऱ्या व्यक्ती समूहांना जागृत करण्याचे तसेच “भारत बौद्धमय”करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न प्रत्यक्षात उत्सरविण्याचे आवाहन चळवळीसमोर उभे ठाकले कले आहे.

डॉ.आंबेडकर विसाव्या शतकातील सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतीचे मुख्य प्रणेते होते.बाबासाहेब केवळ एक क्रांतिकारक राजकीय नेता नव्हते तर ते एक अभ्यासक सम्यक विचारवंत आणि खऱ्या अर्थाने एक महापुरुष होते.मात्र आजही त्यांना अधिकांश लोक केवळ बौद्ध समाजाचे कैवारी समजतात.बौद्ध व्यतिरिक्त अन्य समूहांनी आंबेडकराचे लोककार्य कधी समजूनच घेतले नाही.त्यांचे अनुयायी सुद्धा सर्वव्यापक आंबेडकर सांगन्यास कमी पडलेत हे वास्तव नाकारता येत नाही.सर्वव्यापक बाबासाहेब मांडण्याऐवजी आमचेच बाबासाहेब असे सांगत सुटल्याने व्यापक आंबेडकर मर्यादित केलेत.आमचे बाबासाहेब म्हणण्या ऐवजी आपले बाबासाहेब म्हणण्यास आपणच कमी पडलो हे वास्तव आहे. त्यातही मागासवर्गीयांनी विशेषता बौद्ध समाजाला मिळणाऱ्या सोयी-सवलती केवळ बाबासाहेबांमुळेच मिळते मात्र इतरांना मिळत नाही असा गैरसमज पसरत असल्याने अन्य समाज समूह आंबेडकरांच्या कर्तृत्वाकडे नकारात्मक भावनेने पाहतो व पाहू लागला आहे.वेळोवेळी आवश्यक तेंव्हा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने नेहमीच ही बाब पुढे आली आहे.ही बाब खोडून सर्वव्यापक आंबेडकरी विचारधारा जगासमोर मांडण्याचे आवाहन चळवळी समोर आहे. स्वातंत्र्योत्तर काळात विभिन्न समूहाच्या आंदोलनाच्या तुलनेत आंबेडकरी चळवळीच्या यशस्वी आंदोलनाची संख्या अधिक आहे. आंदोलनाच्या यशात नेत्याऐवजी कार्यकर्त्यांच्या रक्तात भिनलेला आंबेडकर हे मुख्य कारण आहे.

बहुजन समाजाचे हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी तसेच अन्य अत्याचाराच्या विरोधात यशस्वी आंदोलने झालीत.होत आहे.(काही अपवाद वगळता पुर्वी प्रमाणे नाहीत) ही आंदोलने बहुजन समाजासाठी असतात.सहभागी मात्र काही अपवाद वगळता अधिकांश संख्या ही बौद्धांचीच असते. बहुजनासाठी असणारे आंदोलन हे बौद्धाचेच आंदोलन आहे असे म्हणणाऱ्याची संख्या कमी नाही. भविष्यात गैर बौद्ध समाज हा जागृत होईल या अपेक्षेतून आवश्यक तेव्हा लढण्यासाठी बौद्ध समाज रस्त्यावर उतरतो. यशासाठी जिवाचे रान करतो. अधिकांश बहुजन समाज हा हेआंदोलन केवळ बौद्धांच्या सोयी सवलती शाबुत ठेवण्यासाठी आहे असे समजून आंदोलनापासून दूर अंतर ठेवतात.शिवाय बहुजन समाजातील असूयेने ग्रस्त बौद्धांच्या विरोधकांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच आहे.वैचारिक अज्ञानातून बहुजनाचा शत्रू कोण आणि हितचिंतक कोण हे समजण्यास गफलत करीत आहे.विरोधकापेक्षा स्वकियाशी लढण्यास अधिक शक्ती खर्च होत आहे.आपणच आपले शत्रू समजत असेल तर कुणासाठी आणि कशासाठी आंदोलन करायचे असा यक्ष प्रश्न आहे.बहुजनाच्या हक्कासाठी बौद्ध समूहांनी किती आंदोलने करायची, किती दिवस रस्त्यावर उतरायचे यावरही विचारमंथन करण्याची गरज आहे.

आंबेडकरी कार्यकर्ता भटकल्यागत असला तरी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी/चळवळीसाठी,आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात पेटून उठण्यासाठी निळा झेंड्याखाली एकत्र येण्यास वेळ लागत नाही.नेतृत्व बदलले किंवा संधीसाधू असले तरी कार्यकर्त्यांमध्ये डॉ.आंबेडकर यांच्या कार्याप्रतीती असलेली निष्ठा,तोच जोम,उत्साह कायम आहे आणि राहील यात शंका नाही.आंबेडकरवादी कार्यकर्त्याच्या रक्तात आंबेडकर रक्तात/नसा-नसात भिनला आहे.मात्र वैचारिक शत्रु ओळखण्यात कमी पडत आहे.आणि माहीत असले तरी सतेच्या हव्यासापोटी डोळेझाक केले जाते.त्यामुळे चळवळीची दिशा बदलते.त्यासाठी वैचारिक दृष्ट्या त्यांना प्रगल्भ करण्याची आवश्यकता तर आहेच शिवाय चळवळी बरोबरच त्याच्या हाताला स्थायी स्वरूपातील रोजगार संधी मिळवून देणे तितकेच आवश्यक आहे म्हणजेच त्यांना आर्थिक स्वयंनिर्भर करणे गरजेचे आहे.
सध्या सोशल मीडिया तरुणाचे मुख्य आकर्षण केंद्र बनले आहे. मिडीया प्रचार व प्रसाराचे प्रमुख व प्रभावी माध्यम आहे यात शंका नाही.मात्र सोशल मीडिया वापराच्या काही मर्यादाही आहे हे आपण समजून घेतले पाहिजेत.सध्यास्थितीत सोशल मीडियाच्या वापरात इतरापेक्षा बौद्धांची विशेषता बौद्ध युवकांची संख्या कमी नाही. काहींनी तर प्रचार व प्रसारासाठी सोशल मीडियाला प्रभावी माध्यम बनविले आहेत.त्यातच स्वतः मेसेज लिहिन्याऐवजी आलेला मेसेज खात्री न करता जसाच्या तसा इतरांना पाठविण्याची सवय झाली आहे.इतरांमध्ये सूडाची/द्वेषाची भावना निर्माण होणार नाही व आंबेडकरांचे सर्व व्यापक कार्य सकारात्मकरित्या कसे मांडता येईल यादृष्टीने बघणे गरजेचे आहे.ऐन उमेदीच्या वयात आंबेडकरी कार्यकर्ता सोशल मीडियाच्या आहारी जाणार नाही तसेच वाचन व लेखन कौशल्य कमी होणार नाही याबाबतही काळजी घेणे आवश्यक आहे.
आजची स्थिती गंभीर आहे. विषमतावादी चातुर्वर्ण्य वर्णव्यवस्था अर्थात जातीयवादी व्यवस्था प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अधिक भक्कम होत आहे. विषमतावादी नीती यशस्वीपणे पुढे रेटत आहे.परंतु आंबेडकरी समाज विविध गटातटात विखुरलेला आहे.भविष्याचा वेध घेत सर्वांना सोबत घेऊन चळवळ गतिमान करण्याची आवश्यकता आहे.ही ताकद आंबेडकरी कार्यकर्त्यात निश्चितच आहे.प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनविण्याचे सामर्थ कार्यकर्त्यात आहे. म्हणूनच प्रबोधनाची चळवळ गतिमान करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह साहित्यिक,कलावंत,विचारवंत नोकरदार वर्ग इत्यादींनी स्वतःची जबाबदारी ओळखून चळवळीत सहभागी होण्याची आवश्यकता काळाची गरज आहे.असे झाल्यास आंबेडकरी चळवळीचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल राहील यात शंका नाही.

✒️प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे(मु भांबोरा ता.तिवसा जि.अमरावती)मो:-९९७०९९१४६४
———————————————————