आधुनिक डिजिटल युगात वाचन संस्कृती लोप पावली

46

🔹आ.डॉ.गुट्टे यांची खंत : बक्षीस वितरण सोहळा संपन्न

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.27जून):-वाढत्या तंत्रज्ञानामुळे काळ गतिमान झाला आहे. पुस्तकांची जागा हातातील मोबाईलने घेतली आहे. फोरजीकडून फाईव्हजीकडे जाताना आतंरिक संवाद कमी होत आहे. संवेदनाही विसरत चालल्या आहेत. त्याचा परिणाम वाचन वर्तमान पिढीवर होत आहे. त्यामुळे आधुनिक डिजिटल युगात वाचन संस्कृती लोप पावली आहे, अशी खंत गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केली.

महापुरूषांच्या कार्य-कर्तृत्वाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून आ.डॉ.रत्नाकर‌ गुट्टे (काका) मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘अभिवादन महामानवांना’ सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेतील विजेत्यांना आ.डॉ.गुट्टे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

महापुरूषांची जंयती वैचारिक पध्दतीने साजरी व्हावी तसेच
वाचन संस्कृती वाढावी, अशा हेतूने मित्र मंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते संदीप माटेगावकर यांच्या प्रमुख संकल्पनेतून काही महिन्यांपूर्वी पूर्णा तालुक्यातील ताडकळस, फुलकळस, देऊळगाव व गणपूर केंद्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये हि परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये ४२ शाळेतील १६७८ मुलांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २६० विद्यार्थ्यांचे शाळेची आकर्षक बॅग, पॅड, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन कौतुक तसेच सहभागी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचाही प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना मुख्य आयोजक वक्ते संदीप माटेगावकर म्हणाले की, महाराष्ट्र हि महापुरूषांची भूमी आहे. त्यांचे विचार सामाजिक एकोपा जपण्यासाठी आवश्यक आहेत. जगातल्या सर्व महापुरूषांनी मानवतेचा विचार सांगितला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तो विचार समजावा. त्यांनी महापुरुष वाचावेत, म्हणून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हि परीक्षा घेतली, याचे समाधान वाटले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार, प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी मा. विठ्ठलराव भुसारे, स्पर्धेचे मुख्य आयोजक जिल्हा संपर्क प्रमुख संदीप माटेगावकर, फुलकळसचे केंद्रप्रमुख डॉ. सिद्धार्थ मस्के, केंद्रप्रमुख प्रभु मोरे, केंद्रप्रमुख संजय कांबळे, केंद्रप्रमुख राजू भाग्यवंत, ॲड.मिलिंद क्षीरसागर, युवक तालुकाध्यक्ष मारोती मोहीते, भाजपा युवा मोर्चाचे पवनराजे पारवे, शिवाजीराव आवरगंड, माऊली रूद्रवार, इस्माईल शेख, मारोती मोहित महागावकर, दत्तराव पौळ, उध्दवराव शिंदे, उत्तम नाना आंबोरे, पशुपती शिराळे, लक्ष्मण मिसाळ, अंकुश गिराम, व्यंकटी पवार, पत्रकार सुरेश मगरे, प्रभाकर सातपुते यांच्यासह बक्षीस पात्र सर्व विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली झोळी फाटकी होईल जिल्हा परिषद शाळेच्या मुलांसाठी असा उपक्रम घेणे, हि फार मोठी गोष्ट आहे. कष्टकरी, शेतकरी, मजूर आणि गोरगरीबांच्या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचे भाग्य आ.डॉ.गुट्टे यांच्यामुळे मिळाले. महापुरूष वाचणे काळाची गरज आहे, याची जाणीव मुलांना या वयात झाली तर उद्याची पिढी संस्कारी आणि सुसंस्कृत घडेल. रोजगार, उद्योगधंदे, करिअर, दिव्यांग अशा विविध विषयांवर भरीव काम करणाऱ्या आमदार साहेबांचे हात फार समृद्ध आहेत. ते भरभरून देतात. उद्या कदाचित घेताना आपली झोळी फाटकी होईल, अशा शब्दात प्राथमिक जिल्हा शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी म्हटले. त्यास टाळ्यांची दाद मिळाली.

द्यायचे आहे म्हणून काहीही देऊ नका बक्षीस काय द्यायचे? याविषयी साहेबांशी बोललो. तेव्हा शाळेची बॅग, पॅड, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्याचे ठरले. मात्र, बॅगा व पॅड मजबूत आणि टिकाऊ घे. वाटल्यास मुंबई किंवा पुणे येथे जाऊन ये. पण, लेकरांना चांगलं आणि दर्जेदार साहित्य दे. पैशाची काळजी करू नकोस. द्यायचे आहे म्हणून काहीही देऊ नकोस, अशी स्पष्ट तंबी साहेबानी दिली होती. याची आठवण मुख्य आयोजक जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते संदीप माटेगावकर यांनी बोलताना सांगितली.