मेजर सुर्यकांत मुंडे यांचा सपत्नीक सत्कार : शहरात मिरवणूक

36

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2जुलै):-देशाच्या सीमेवर उभे राहून तुमचं आमचं संरक्षण करणाऱ्या जवानांनाही परिवार असतो. भाव-भावना असतात.‌ सगळे सण उत्सव त्यांच्या अनुपस्थितीत कुटुंबियांना करावे लागतात. मात्र, कर्तव्याची जाणीव ठेवून तसभरही मागे न हटणाऱ्या सैनिकांच्या मनात जाज्वल्य देशभक्ती असते. त्या देशभक्तीला त्यागाची परंपरा आहे, असे गौरवोद्गार गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी काढले.

गंगाखेड तालुक्यातील मौजे.बडवनी येथील सुपुत्र मेजर सुर्यकांत मुंडे यांचा सपत्नीक सेवापूर्ती सत्कार आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.‌ त्यापूर्वी मेजर मुंडे यांची झेलीम आणि हलगीच्या कडकडाटात शहरातून उत्साही मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये मुलींनी कवायती सादर करून सैनिकांच्या कार्याला उजाळा दिला.

हे भारतीय सैन्यात ३४ वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा माजी सैनिक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात मेजर मुंडे यांचा यथोचित सत्कार गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. लोकांचा उत्साह पाहून मेजर मुंडे यांच्यासह परिवार भावुक झाला. भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. देशभक्तीच्या वातावरणात महिलांनी मेजर मुंडे यांचे औक्षणही केले.

पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा गावांना अभिमान असतो. त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घेतला पाहिजे. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे.

यावेळी माजी सैनिक संघटनेचे अशोक आयनिले, माजी सुभेदार विश्वनाथ सातपुते, कळमनुरीचे वैजनाथ मुंडे, मार्केट कमिटी संचालक संभुदेव मुंडे, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, उध्दव शिंदे, माजी सरपंच भगीरथ फड, माजी सैनिक मारोती लटपटे, वक्ते विनोद आण्णा भोसले, जेष्ठ मुख्याध्यापक माणिक नागरगोजे उपस्थित होते.