चिमुर अतिरिक्त जिल्हा नको, स्वतंत्र जिल्हाच पाहिजे- जिल्हा परिषदचे माजी सदस्य गजानन बुटके

66

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.5ऑगस्ट):- चिमुर स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या ४० वर्षोपासुन विविध राजकिय पक्ष व लोकप्रतिनिधींनी आंदोलने केली आहे. गेल्या काही दिवसापासुन सत्ताधारी चिमुर अतिरिक्त जिल्हा घोषित करण्याच्या तयारीत आहेत. जनतेची स्वतंत्र जिल्हाची मागणी असताना अतिरिक्त जिल्हा देणे हा जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. चिमुरकरांना अतिरिक्त जिल्हा नको तर चिमुर स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपुर जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे सरचिटणीस तथा माजी जि. प. सदस्य गजानन बुटके यांनी चिमुर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

चिमुर ला अतिरिक्त जिल्हा घोषित करतांना नागभिड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही या तालुक्यांचा समावेश या नवनिर्मीत अतिरिक्त जिल्हयात करू नये अशी भुमीका महाराष्ट्र विधीमंडळाचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात घेतली आहे. यावरून वडेट्टीवारांच्या विरोधात चिमुर परिसरात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वडेट्टीवारांनी संबंधीत तालुक्यांचा समावेश करू नये याचा अर्थ स्वतंत्र चिमुर जिल्हाच्या मागणीला विरोध होत नाही. असे गजानन बुटके यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

गेल्या १० वर्षापासुन सत्तेतील लोकप्रतिनीधींनी चिमुर जिल्हा निर्माण करण्याकरीता कुठल्याही प्रकारचे आंदोलन केले नाही. तथा या संबंधाने कोणताही पाठपुरावा केला नाही. स्वतंत्र जिल्हाची मागणी असतांना अतिरिक्त जिल्हा घोषित करून सत्ताधाऱ्यांनी जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापुर्वी भिसी व तळोधी (बाळापुर) येथे अतिरिक्त तहसिल कार्यालयाचे फक्त फलक लावले आहेत. या जनतेची कुठल्याही प्रकारची कामे होत नाही. तोच प्रकार अतिरिक्त चिमुर जिल्ह्याचा संदर्भात होऊ शकतो. वास्तविक पाहता चिमुर येथे उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकाऱ्याचा दर्जा असतो. हे माहित असतांना सुद्धा सत्ताधारी अतिरिक्त जिल्हयाचे नाट्य का करीत आहे?. हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरू शकतो. स्वतंत्र जिल्हा निर्माण व्हावा या मागणी करीता जनतेच्या सहकार्याने आंदोलन करणे सुरूच राहील असे मत गजानन बुटके यांनी व्यक्त केले.

पत्रकार परिषदेला गजानन बुटके यांच्या सोबत कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत बंडे, जावाभाई शेख, सुधिर जुमडे, शुभम बोबडे आधी उपस्थित होते.