पानवन घटनेप्रकरणी जनता क्रांती दलाचा दहिवडीत मोर्चा

90

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔹माण तहसीलदारांना दिले निवेदन

म्हसवड(दि.5सप्टेंबर):-पानवन येथे महिलेला भर चौकात झालेल्या बेदम मारहाणीप्रकरणी जनता क्रांती दलाच्यावतीने दहिवडीमध्ये मोर्चा काढण्यात आला. मोर्चा काढून माणच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

ग्रामदैवत सिद्धनाथाच्या मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली. महापुरुषांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. मोर्चा बाजारपटांगण, मायणी चौक, फलटण चौक, बिदाल चौकमार्गे पोलीस स्टेशनपुढून तहसील कार्यालयासमोर दाखल झाला. यावेळी पानवन घटनेचा निषेध करत समाजात जातीयवाद पेरून तेढ निर्माण करणाऱ्यांना वेळीच ठेचल पाहिजे,अशा भावना यावेळी जनता क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. ‘भारतीय संविधानाचा विजय असो.!’ ही घोषणाही यावेळी देण्यात आली.

महापुरुषांच्या महाराष्ट्रात अशा घटना घडणे हे नक्कीच चुकीचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. जनता क्रांती दलाच्या सत्यवान कमाने यांनी हा लढा कोणत्याही धर्म आणि जातीच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट करत मनुवादी विचारसरणी गाडून टाकू,असे सांगितले.

यावेळी दिलेल्या निवेदनात फक्त अटक करून हा प्रश्न सुटत नाही,तर कोर्टात चार्टशीट फाईल करून त्यांना तुरुंगातच ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. भर चौकात महिलेला होणारी मारहाण ही फक्त मनुवादी विचारसरणीच करू शकते. त्यामुळे सडक्या मनुवादी विचारसरणीमुळे घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे या घटनेचा निषेधही यावेळी दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आला. अखिल भारतीय होलार समाज संघटना, लहुजी शक्ती सेना, मातंग एकता आंदोलन यांनी यावेळी जनता क्रांती दलाच्या या मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने, पश्चिम महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष विकास सकट, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष चंद्रकांत अवघडे, माण तालुकाध्यक्ष संतोष यादव,रामभाऊ सातपुते, दिलीप तुपे, ऍड.संतोष कमाने,दत्ता केंगार आनंदा साठे, सचिन बंडल, डॉ.मधुकर माने, सोहेल मुलाणी, माणिक अवघडे, चैतन्य अवघडे, नाथा तुपे,चैतन्य आवळे, दाऊदखान मुल्ला,आयाज शिकलगार, अमीर मुजावर, महादेव पाटोळे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.