शिक्षकदिनी काळ्या फीती लावून अशैक्षणिक कामाचा शिक्षकांनी केला निषेध

83

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.7सप्टेंबर):- सध्या राष्ट्रीय कार्याच्या नावाखाली शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. शिक्षकांना अध्यापन सोडून इतर कोणतीही अशैक्षणिक कामे सांगायला नको आहे, पण सध्या अध्यापन सोडून इतर सर्व अशैक्षणिक कामे करुन घेतली जात आहेत हे दुर्दैवी आहे.आम्हाला शिकवू द्या अशी शिक्षकांना मागणी करावी लागत आहे. शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे बंद करावीत या मागणीसाठी शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला आहे. पण शासन दखल घेत नसल्यामुळे शिक्षक भारतीच्या वतीने दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षकदिनी शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून शाळेत दिवसभर काळ्या फीती लावून अध्यापन करण्यात आले.

५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन.हा दिवस देशातील प्रत्येक शिक्षकांसाठी महत्वाचा असतो.या दिवशी शिक्षकांचा देशभर गौरव व सन्मान होत असतो. पण अशैक्षणिक कामाच्या ओझ्यात शिक्षक भरडला जात आहे. आम्हाला शिकवू द्या अशी शिक्षकांची मागणी आहे. अशैक्षणिक कामे आणि ऑनलाईन कामांमुळे शिक्षक बेजार झाला आहे. अशैक्षणिक कामांचा निषेध करण्यासाठी शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून शासनाच्या अशैक्षणिक कामाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला अशी माहिती शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे,चिमूर तालुका अध्यक्ष रावण शेरकुरे, सचिव कैलाश बोरकर,बंडू नन्नावरे,विशाल वासाडे, मिलिंद रामटेके, मच्छिन्द्र गोहणे, किशोर मेश्राम, प्रमोद मायकुरकर यांनी दिली आहे.