चेंबर ऑफ कॉमर्स & इंडस्ट्रीजचा संवाद २०२३ संपन्न

126

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.10सप्टेंबर):- चेंबर ऑफ कॉमर्स & इंडस्ट्रीजच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पद्ग्रहण समारंभ,संवाद २०२३ व पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष पदी सलग पाचव्यांदा निवड झाल्याबद्दल शरद मैंद यांचा सत्कार सोहळा दि.९ सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजता आ.ऍड.निलय नाईक यांचे अध्यक्षतेखाली व्यापारी भवनामध्ये संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर सत्कार मूर्ती पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, प्रमुख अतिथी आ.ऍड.इंद्रनील नाईक,आ.डॉ. वजाहत मिर्झा, भाजपा जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे, भाजपा जेष्ठ नागरीक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद जिल्हेवार, शिवसेना जिल्हाप्रमुख ऍड.उमाकांत पापीनवार, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डूबेवार, सचिव प्रविर व्यवहारे,कोषाध्यक्ष गोविंद वर्मा विराजमान होते.

चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डूबेवार यांनी आपल्या प्रास्ताविकात तिन्ही आमदार महोदयांना उद्देशून स्थानिक बाजारपेठ अधिक सदृढ होण्याच्या उद्देशाने दळणवळण सुलभ व जलदगतीने होण्याकरिता मुख्य समृद्धी मार्गास पुसद शहराचा दुपदरी रस्ता जोडण्यात यावा, रिंगरोड झाल्यास शहरातील बाजारपेठेच्या विकासासाठी तो गेम चेंजेर ठरेल, शहरातील मुख्य बाजारपेठेत ट्रान्स्पोर्टिंगची जड अवजड वाहने दाखल होण्यासाठी बाजारपेठेच्या मुख्य मार्गास समकालिका मार्ग नव्याने निर्मित व्हावा, भुअंतर्गत गटार नाल्याची निर्मिती करण्यात यावी या मागण्यांसह प्रामुख्याने पुसद जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी देखील आग्रहाने केली.

नवीन कार्येकारिणी जाहीर करीत त्यांनी शहरात व्यापाऱ्यांची वाढती संख्या बघता आम्ही व्यापाऱ्यांनी वारंवार व्यापारी भवनाची मागणी केली होती त्यास प्रतिसाद देत सण २०१८ साली पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शरद मैंद यांचे माध्यमातून माजीमंत्री मनोहरराव नाईक यांनी शब्द दिला. व तो शब्द त्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांच्या हक्काची व्यापारी भवनाची वास्तू आम्हास सुपूर्द करून पूर्ण केल्याचे मत आपल्या प्रस्ताविकातून सुरज डूबेवार यांनी व्यक्त करताच टाळ्यांचा गडगडाट झाला.

आ.ऍड.इंद्रनील नाईक यांनी शहराच्या विकासासाठी सकारात्मक रित्या प्रयत्न करणार असून वर्तमान स्थितीत आपण शहराच्या विकासासाठी 30 कोटी रुपयांचा निधी आणल्याचे स्पष्ट करीत पुसद जिल्ह्याच्या निर्मितीबाबत बोलतांना त्यांनी २०२६ पर्यंत नक्कीच पुसद जिल्हा होईल असे संकेत शासन स्तरावर दिसत असल्याचे सांगितले.शहराच्या विकासात्मक कार्यासाठी आम्हा तिन्ही आमदारांना एकत्र कोणी बसवत असेल तर ते शरद मैंद आहेत. कारण याचा प्रत्यय यापूर्वीही आपण घेतला असल्याचे सांगितले. वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आ. डॉ.वजाहत मिर्झा यांनी शरद मैंद पुसद अर्बन बँकेचे अध्यक्षपद व संघर्ष हे एक मोठे समीकरण असून याचा साक्षीदार आपण असल्याचे सांगत यावर अनुभवशील भाष्य केले.

स्थानिक व्यापाऱ्यांची वरददायिनी असलेल्या अर्बन बँकेच्या अध्यक्ष पदी सलग पाचव्यांदा आरूढ झाल्याबद्दल शरद मैंद यांचा भव्यदिव्य असा सहृदय सत्कार शाल,श्रीफळ विलोभनीय पुष्पहारासह आकर्षक मानचिन्ह देऊन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते पार पडला.
चेंबरच्या वतीने आयोजित नेत्रदीपक सत्कारास उतराई होतांना शरद मैंद यांनी भव्यदिव्य आशा सत्काराबद्दल ऋण व्यक्त करीत शहरातील काही अल्प संतुष्टांना हा सत्कार सोहळा कदाचित पचनारही नाही परिणामी त्यांना पोटदुखी होऊ शकते त्यासाठी आपण मेडिकल व्यावसायिक व्यापारी बांधवांनी जुळबाच्या गोळ्याचा अधिकाधिक साठा आणून ठेवावा असा खोचक टोला शरद मैंद यांनी काहींना लगावताच व्यापारी भवनात एकच हश्या पिकला. त्यांनी आपण माजीमंत्री मनोहरराव नाईकांना देवदूत मानत असल्याचे आवर्जून सांगितले.

आ.ऍड.निलंय नाईकांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राज्यात पुसद अर्बन बँकेचे नावलौकिक असून सलग पाचव्यांदा सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषविणे गम्मतीचा खेळ नव्हे त्यासाठी कठोर मेहनत व बँकेविषयी प्रामाणिकता,पारदर्शकताच लागत असल्याचे सांगितले. कुण्या नेत्यांच्या दबावात नाही तर स्वनिर्णयातून मैंद बँक चालवितात हे वाखाणण्याजोगे उदाहरण विदर्भात केवळ पुसद शहरात बघावयास मिळत असल्याचे सांगून पुढे बोलतांना ते म्हणाले की, पुसद चेंबरच्या सर्व मागण्या आम्ही सोडविण्याचा यथावकाश प्रयत्न करू व पुसद जिल्ह्याचा प्रश्न आपण सरकार दरबारी सातत्याने लावून धरलेला आहे असे ही वक्तव्य केले.यावेळी शहरातील चेंबर ऑफ कॉमर्स अंतर्गतच्या सर्व व्यापारी संघटनांचे सभासद व्यापारी प्रामुख्याने उपस्थित होते.सदर कार्येक्रमाचे सूत्रसंचालन मनिष आनंतवार व आभारप्रदर्शन विक्रांत जिल्हेवार यांनी केले.