माय बापहो, काहीही करा पण लेकरं शिकवा !

205

🔹गाडगे बाबांच्या वेशभूषेत खंदारे यांनी दिला संदेश

🔸वीर लहुजी गणेश मंडळाने आयोजित केले आगळे वेगळे कीर्तन

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.27संपादक):-२५ सप्टेंबर शिक्षणाशिवाय आपला उद्धार नाही, एक वेळ जेऊ नका परंतु मुलांना शिकवल्याशिवाय राहू नका, गरिबीवर शिक्षण हाच केवळ रामबाण उपाय आहे हा गाडगे बाबांचा संदेश त्यांच्या वेशभूषेमध्ये पी एस खंदारे यांनी दिला.येथील वीर लहुजी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिनांक २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आधुनिक गाडगेबाबा म्हणून प्रसिद्ध असलेले पी एस खंदारे यांचे महापुरुषांचे विचारांना समर्पित असलेले आधुनिक कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तनातून त्यांनी समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा तसेच समाजातील विविध समस्यांवर सप्रयोग प्रखरपणे भाष्य केले. कार्यक्रमाची सुरुवात पाण्याचा दिवा पेटवून झाली.

पाण्याचा प्रसादासह विविध चित्तथरारक वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी चमत्कार सादरीकरण केले व लोक शाहीर अण्णाभाऊ साठे,मुक्ता साळवे, आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावर आधारित व परखड व्याख्यान पी.एस.खंदारे यांनी केले.त्याचबरोबर करणी, भानामती या गोष्टी मानसिकदृष्ट्या आजारांचा भाग असून त्यावर मानसोपचारतज्ज्ञ उपचार करु शकतात परंतु आपण आपल्या अज्ञानामुळे भोंदू बाबा कडे घेऊन जातो भोंदू बाबा करणीच्या नावाने केवळ सर्वसामान्यांची लूट करतो असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष महा अनिस कार्याध्यक्ष शिवश्री विजय शिंदे यांनी केले.

या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सभापती मोतीराम कदम, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील गोदमले, सेवा सोसायटी अध्यक्ष अशोक नालींदे, ग्रामपंचायत सदस्य पंजाबराव घुगे, गजानन तायडे, अल्लाउद्दीन कुरेशी, महादेव साखरे, कैलास गोंडाळ, सतीश इंगळे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महेश देवळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव साखरे यांनी केले तर आभार कचरू झोंबाडे यांनी मानले.