ने.हि.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे एक दिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

144

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.29ऑक्टोबर):-नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था ब्रम्हपुरी द्वारा संचालित ने.हि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासक्रमीय शिक्षणासोबत अनेक नाविण्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन सदैव केले जाते.

नुकतेच विद्यालयात एकलव्य इंडिया फाउंडेशन, यवतमाळ व संकल्प एज्युकेशन फाउंडेशन, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी “12 वी नंतरच्या पुढील नव्या वाटा” या विषयावर एक दिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळा प्राचार्य जी. एन. रणदिवे यांचे अध्यक्षतेखाली तथा उपप्राचार्य के. एम. नाईक, पर्यवेक्षक ए. डब्ल्यू. नाकाडे, प्रा. पी.आर. जिभकाटे यांच्या प्रमुख उपस्थितित संपन्न झाली. सदर कार्यशाळेला एकलव्य इंडिया फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजू केंद्रे आणि एकलव्यचे प्रोग्रॅम असोसिएट आकाश सपकाळे मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले.

एकलव्य इंडिया फाउंडेशन, यवतमाळ हे विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सपोर्ट सिस्टीम म्हणून कार्य करीत असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्कॉलरशिप, फेलोशिप या संदर्भातील मार्गदर्शनामुळे महाराष्ट्रात अल्पावधितच नावारूपास आले आहे. कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक ब्रिटिश शासनाची ‘चेवनिंग स्कॉलरशिप’ प्राप्त करणारे , ‘फोर्ब्स इंडिया’ आणि ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या सामाजिक क्षेत्र विभागात ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्व’च्या यादीत समावेश असणारे एकलव्य इंडियाचे संस्थापक राजू केंद्रे तसेच एकलव्यचे प्रोग्रॅम असोसिएट आकाश सपकाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यशाळेमध्ये मुख्य मार्गदर्शकांनी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पहिल्या पिढीची जबाबदारी, उच्च शिक्षणाचे महत्त्व, उज्वल भविष्यासाठी 21 व्या शतकातील कौशल्ये, भारतातील सर्वोच्च शिक्षण देणारी केंद्रीय विद्यापीठे , सी.यु.ई.टी. चे महत्व, महाराष्ट्रातील नामवंत विद्यापीठे तथा महाविद्यालये, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप व फेलोशिप, हॉटेल मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, लॉ, फाईन आर्ट, फिल्म मेकिंग, पत्रकारिता इ. मधील पदवी शिक्षण व त्यातून उपलब्ध होणाऱ्या करिअरच्या संधी अशा महत्वपूर्ण अनेक बाबींवर मार्गदर्शन केले.

‘विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगातील आव्हानांना न घाबरता शिक्षकवृंदांचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण अभ्यासाने प्रथम बारावी बोर्ड परीक्षेत उच्चतम ग्रुप प्राप्त करावे व पुढे शासकीय तथा इतर स्कॉलरशिप प्राप्त करून गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाने आपले करिअर घडवावे’ असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्राचार्य जी. एन. रणदिवे यांनी केले.

डॉ.पी.एन.बेंदेवार यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना कार्यशाळेच्या आयोजनामागची विद्यालयाची भूमिका, एकलव्य व संकल्प फाउंडेशनचे कार्य इ. बद्दल माहिती दिली.सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.कु.एन.डब्लू.खाडीलकर तर आभार कु.ऋतिका राऊत हिने मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद तसेच करण बन्सोड, सुमित सहारे, गौरव बर्लावार, निकिता कडूकार, करिष्मा मेश्राम,अभिषेक वैरागडे, यश नागपुरे, अंशु देशमुख, प्रांजली राऊत,दौलत गहाणे इ.विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.