जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत शेतीसह विविध प्रश्नांवर आ. देवेंद्र भुयार आक्रमक !

62

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी /
जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकाचे अमाप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत देऊन त्यांना हातभार द्या अशी आग्रही मागणी आ. देवेंद्र भुयार यांनी शुक्रवार (दि.२४) जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केली. यावेळी आ. देवेंद्र भुयार यांनी मतदारसंघातील शेती, विद्युत पुरवठा, रस्ते आदी सर्व अति महत्वाचे प्रश्न मांडले.
शुक्रवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार हे उपस्थित होते. यावेळी आ. देवेंद्र भुयार यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न मांडले. विमा कंपनीचे अधिकारी बांधावर गेले नाहीत, पंचनामे केले नाहीत. अनेक शेतकऱ्यांना पीकविमाच्या अटीशर्तीच्या मुद्यावरून नाहक वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या विमाकंपनीच्या दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आ. देवेंद्र भुयार यांनी केली. जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळात २५ टक्के अग्रिम देण्याची अधिसूचना काढावी. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा,अग्रीम, सततच्या पावसामुळे झालेले नुकसानीचे अनुदान लवकर देण्यात यावे अशा आग्रही मागण्या आ. देवेंद्र भुयार यांनी केल्या.
अतिरुष्टिमुळे मोर्शी वरूड तालुक्यातील खचलेल्या विहिरींचे सर्वेक्षण करून विहीर बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र बांधकामासाठी एन आर एच एएम अंतर्गत निधी वाढून देण्यात यावा, जिल्हा परिषद शाळेच्या शिकस्त झालेल्या इमारती बांधकामासाठी निधीची तरतूद करणे, आपत्ती सौम्मिकरण आराखडा तयार करून त्यामध्ये १९९१ मधील मोवाड पुर बाधित ३२ गावातील पुनर्वसन कामे पूर्णत्वास नेण्याकरिता निधी उपलब्ध करणे, २०२१ मध्ये मोर्शी येथे नळ दमयंती नदीला आलेल्या महापुरामुळे बाधित क्षेत्राकरीता पुलांचे व भूमिगत विद्युत वाहिनीचे कामे करणे, वरूड येथील चुडामान नदीला पूर संरक्षक भिंत बांधकाम करणे करीता निधी उपलब्ध करणे, मेडा अंतर्गत १० टक्के निधी वाढवणे यासह आदी मुद्दे मांडून मतदार संघातील विकास कामे समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा व विकास कामासाठी निधी देण्यात यावा अशा विविध लोकोपयोगी मागण्या करून त्यांच्या पूर्ततेसाठी आ. देवेंद्र भुयार यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आग्रह धरला.