४२ लाखाची फसवणूक ऊस वाहतूक ठेकेदाराच्या अंगलट, गुन्हा दाखल

141

✒️अनिल साळवे(विशेष प्रतिनिधी)मो:-86985 66515

गंगाखेड(दि.9डिसेंबर):-तुला काय करायचे ते कर. माझी माणसं कामावर येणार नाहीत. तु जास्त शहाणपणा करू नको. नाही तर तुला जीवे मारीन, अशी धमकी ऊस वाहतूक ठेकेदार जळबा उर्फ बंडू टाळीकुटे यांनी गंगाखेड येथील जी7 चे जनसंपर्क अधिकारी हनुमंत शिवाजीराव लटपटे यांना धमकी आणि कारखान्याची तब्बल ४२ लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी टाळीकुटे यांच्यासह अन्य पाच जणांवर गंगाखेड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०२३-२४ गळीत हंगामात टॅक्टर व ट्रकसह ऊसतोड करून पुरवठा करणे, याकामी आरोपींनी जी7 शुगर साखर कारखान्याशी करार केले होते. करारानुसार आरोपींनी ७ गाड्या आणि १२६ मजूर ऊसतोड करण्यासाठी पुरविणे बंधनकारक होते. त्यापोटी तब्बल ४२ लाख रूपये आगाऊ उचल घेतली होती.

मात्र, हंगाम सुरू झाला तरीही ते कामावर न आल्याने जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे, कर्मचारी सुनील तांदळे व बाळू टोम्पे यांनी आरोपींना भेटून वाहानांसह कामावर येण्याची विनंती केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी त्या तिघांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या पाच आरोपी विरूद्ध कलम ४२०, १२० बी, ५०६ कलमान्वये गंगाखेड पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

जळबा उर्फ बंडू टाळीकुटे (रा.पांडुर्नि ता.मुखेड), धनाजी चंदर चव्हाण (रा.कोडग्याळ ता.मुखेड), चंद्रकांत मल्हारी सुरनर (रा.मालेगाव ता.लोहा), शरद विश्वनाथ देवकते (रा.मरसागंवी ता.जळकोट), तुळशीराम विठ्ठल मुळगे (रा.मरखेल ता.देगलूर) अशी आरोपींची नावे असून या प्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर हे अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, पाचही आरोपींनी अनेक कारखान्यांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे. फसवणूक करणे हा त्यांचा एकमेव धंदा आहे. तशी टोळीच सक्रीय आहे. त्यामुळे आम्ही पाठपुरावा करीत असून त्यांना कडक शासन व्हावे, अशी आमची मागणी असल्याचे फिर्यादी हनुमंत लटपटे यांनी म्हटले आहे.