स्थलांतरित कोण आहेत?

54

[जागतिक स्थलांतरित दिवस विशेष]

आज जगभरात आंतरराष्ट्रीय स्थलांतराविषयी लोकांमध्ये जागरूकता आणि सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. जागतिक शांततेसाठी, कामाच्या शोधात किंवा इतर कारणांमुळे इतर देशांमध्ये स्थायिक झालेल्या लोकांच्या समस्या गांभीर्याने समजून घेणे आणि सोडवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस दरवर्षी १८ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांना शिक्षित करणे, आहे की प्रत्येक स्थलांतरित व्यक्तीशी आदराने वागणे ही मूलभूत गरजांपैकी एक आहे. आजचं सर्वात मोठं प्रहसन हे आहे, की स्थलांतर ही एक मोठी समस्या आहे, खरंतर ती संधीसारखी असली पाहिजे. श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींचा सदरील मार्गदर्शक लेख वाचाच…. 

आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणजे काही कारणास्तव आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून दुसऱ्या देशात राहणे किंवा आसरा घेणे. स्थलांतरित लोक त्यांचे वास्तव्य कायमचे सोडून दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या देशात घरे बनवतात. जे इतर देशांमध्ये स्थायिक होतात, त्यांना आंतरराष्ट्रीय स्थलांतरित म्हणतात. स्थलांतरितांच्या समस्या सामान्य लोकांपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. यात पोटापाण्याचा प्रश्न निकाली काढणार्‍या मजूर, कामगार, कर्मचारी वर्गांचा समावेश असतो. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहपरिवार जातात. ज्यामुळे त्यांचे सामान्य जीवन जगणे कठीण होते. स्थलांतरित कामगारांचे हक्क आणि त्यांच्या कुटुंबाला पुनर्वासित करून संरक्षण देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने १८ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन म्हणून जाहीर केला आहे.

जगभरात यादवीचा परिणाम सामाजिक स्थितीवर झाला आहे. सीरिया आणि आफ्रिकेतून युरोपात निर्वासित येतात. स्थलांतरित आणि निर्वासित यावर जगभर सध्या ऊहापोह सुरू आहे. निर्वासित आणि स्थलांतरित हा केवळ शब्दच्छल नसून या दोन भिन्न संकल्पना आहेत आणि त्यांमध्ये कायद्यानेही फरक करण्यात आला आहे. मात्र, त्या सरसकट चुकीच्या पद्धतीने वापरल्या जात असल्याचे मत निरीक्षकांनी नोंदविले आहे. एखाद्या देशात युद्ध अथवा यादवी माजली असेल, तर सर्वस्व गमावलेले नागरिक भीतीने आणि आशेने दुसऱ्या देशाचा आसरा घेण्याची धडपड करतात. बांगलादेश युद्धाच्या दरम्यान असे अनेक निर्वासित भारतात आश्रयासाठी आले होते. किंवा आज सीरिया, अफगाणिस्तान आणि युक्रेन या देशांतील परिस्थितीने निराश झालेले, गांजलेले नागरिक अन्य देशांमध्ये वास्तव्यासाठी जागा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. बहुतेक देशांतील कायद्यांनुसार निर्वासितांना किमान संरक्षण देणे भाग असते; तसेच मायदेशात त्यांच्या जीवाला धोका असेल, तर त्यांना परतही पाठवता येत नाही. मात्र, स्थलांतरितांकडे कायदेशीर कागदपत्रे असतील, तरच संबंधित देशांत त्यांना वास्तव्यासाठी परवानगी मिळू शकते. अमेरिकेत निर्वासित राजकीय आश्रयासाठी दावा करू शकतात.

संधीच्या शोधात असलेल्या विकसनशील आणि गरीब देशांतील नागरिक अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्रिटन, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये स्थलांतर करतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारखे देश लोकसंख्या वाढीसाठी काही अटींसह स्थलांतराला प्रोत्साहन देतात.

स्थलां‌तरितांमुळे संबंधित देशात काही सांस्कृतिक आणि सामाजिक प्रश्न उभे राहात असले, तरी कौशल्याधारित रोजगारामध्ये या नव्या लोकसंख्येचा उपयोगच होताना दिसतो. विशेषतः भारत, चीन, फिलिपिन्ससारख्या देशांमधून स्थलांतर झालेल्या नागरिकांनी हे सिद्ध केले आहे. मात्र, निर्वासितांचे काय करायचे? स्थलांतरितांना प्रवेश देताना शिक्षण, गुणवत्तेला अधिक महत्त्व दिले जाते. निर्वासितांबाबत अशी शक्यता पडताळणे कठीण असते. मग हा विस्थापित समाज मूळ समाजावर भार होऊन राहणार का? निर्वासितांमुळे निर्माण होणारे प्रश्न कसे हाताळायचे? योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यांना परत पाठवून द्यायचे की दुय्यम नागरिकत्व द्यायचे, असे अनेक प्रश्न सध्या उभे आहेत. निर्वासितांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने या प्रश्नावर केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करणेही अवघड बनले आहे. भारतात आज हे प्रश्न युरोपात आहेत, तेवढे गंभीर नसले, तरी भविष्यात धोका उद्भवू शकतो.
निर्वासितांना संबंधित देशाच्या विकासात सहभागी करून घ्या, त्यांची कौशल्ये, गुणवत्ता आणि महत्त्वाकांक्षांचा उपयोग देशाच्या समृद्ध वाढीसाठी करून घ्या, असा एक सूर उमटतो आहे.

मेक्सिकोमध्ये ग्वाटेमाला निर्वासितांचा उपयोग कृषी आणि पाटबंधारे क्षेत्रात करून घेण्यात आला. जॉर्डनमध्ये उत्पादन क्षेत्रात निर्वासितांचा उपयोग झाला. याच पद्धतीने युरोपातही त्यांचा उपयोग करून घेता येईल, असे सामाजिक निरीक्षकांचे म्हणणे आहे. हे झाली एक बाजू. मात्र, निर्वासितांचा प्रश्न जगभरात मोठ्या प्रमाणात वाढत असताना त्या संदर्भात एक सर्वंकष आंतरराष्ट्रीय धोरण का नाही, हा खरा प्रश्न आहे. विविध कारणांमुळे अनेक देशांतून होत असलेल्या विस्थापनाच्या आणि विस्थापितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या धोरणाची गरज प्रकर्षाने भासते आहे. या धोरणाच्या निमित्ताने विस्थापितांच्या प्रश्नांचा अभ्यास होऊ शकेल, त्यांच्या अडचणींचा बारकाईने विचार होऊ शकेल. शिवाय त्यांच्या विस्थापनाला कारण असलेल्या मूळ प्रश्नांना भिडण्याचा दृष्टिकोनही विकसित होऊ शकेल. विस्थापितांचे लोंढे रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि निर्वासितांचे पुनर्वसन या दोन मुद्द्यांवर आधारित अभ्यास करून एक प्रकल्प आखला गेला आणि त्यात निर्वासितांचा मूळ देश, संबंधित देश, संयुक्त राष्ट्रे आणि निधी हे प्रमुख घटकांना समाविष्ट केले गेले, तर हा गंभीर प्रश्न हाताळण्यास मदत होईल. एवढेच नव्हे, तर निर्वासित हे स्थलांतरितांप्रमाणेच मुख्य प्रवाहाचा भाग बनतील, या आशेला जागा राहील, एवढे मात्र निश्चित!

!! जागतिक स्थलांतरित दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन व सुलेखन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.पोटेगावरोड, गडचिरोली.फक्त मधुभाष- ७१३२७९६६८३