सहाव्या धम्मविचार साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी विश्वास सुतार यांची निवड

108

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.19डिसेंबर):- ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि संगीतकार विश्वास सुतार यांची रविवार दि. 14 जानेवारी 2024 रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या सहाव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे, प्रा. श्रीकृष्ण अडसूळ, डॉ. सतीशकुमार पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे आदी मान्यवर यापूर्वीच्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष राहिले आहेत.संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व संमेलनाच्या निमंत्रक ॲड. करुणा विमल यांनी विश्वास सुतार यांना दिले.

धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था तथागत बुद्धांच्या मानवतावादी विचारांना घेऊन काम करणारी महत्त्वपूर्ण अशी संस्था असून या संस्थेच्या वतीने धम्म विचारांचा जागर करण्यासाठी दर वर्षी धम्मविचार साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते.या वर्षीच्या सहाव्या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षदासाठी विश्वास सुतार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून विश्वास सुतार ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि संगीतकार म्हणून महाराष्ट्रभर सुपरिचित आहेत. महात्मा बसवण्णा : जीवन आणि संघर्ष, नाळ, विद्रोही संत तुकाराम : जीवन व कार्य, मुलास पत्र, भारतीय संविधान आणि लोक, तुकाराम नावाचा संत माणूस, हिंदी वेब साहित्य या गाजलेल्या पुस्तकासह दहा हुन अधिक ग्रंथांचे त्यांनी लेखन व संपादन केले आहे. स्पष्ट, परखड, संयमी व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक म्हणून त्यांना महाराष्ट्रभर ओळखले जाते. साहित्य व सामाजिक क्षेत्रातील मनाचे व सन्मानाचे 10 हुन अधिक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. विश्वास सुतार हे संवेदनशील मनाचे आणि ऐतिहासिक लेखन करणारे साहित्यिक व समीक्षक म्हणून ओळखले जातात.विश्वास सुतार हे वास्तववादी लेखन करणारेही लेखकआहेत.धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, आयोजित धम्मविचार साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी विश्वास सुतार यांची निवड झाल्याबद्दल साहित्य व सामाजिक क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.