७५ वर्षानंतरही बसस्थानकाची प्रतिक्षा! पालमकर रस्त्यावर, पूर्णात समस्यांचा डोंगर

141

🔸आ.डॉ.गुट्टे विधानसभेत संतापले : बसस्थानकाचा मार्ग मोकळा!

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.19डिसेंबर):-भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तरी झाली. अनेक सरकारे आली आणि गेली. मात्र, माझ्या गंगाखेड विधानसभेतील पूर्णा व पालम येथील नागरिकांना रस्त्यावरच उभे राहून लालपरीची वाट पाहावी लागते, हि दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे पूर्णा येथील मोडकळीस आलेल्या व पालम येथे नसलेल्या बसस्थानकाचा विषय शासन कधी मार्गी लावणार? असा रोखठोक सवाल करून स्थानिक आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी प्रवाशांचा आवाज विधानसभेत पोहोचवला.

एकीकडे पूर्णा येथे बसस्थानक आहे.‌ मात्र, ते अतिशय जीर्ण झाले असून मोडकळीस आले आहे. तिथे प्रवाशांसाठी कोणत्याही सोई-सुविधा उपलब्ध नाहीत. तर दुसरीकडे पालम येथे सार्वजनिक बसस्थानक नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते.‌ दोन्ही ठिकाणच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रवाशांना उन्हपावसात रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. पूर्णामध्ये जमीन उपलब्ध आहे. तर पालम येथे जमीन सुध्दा उपलब्ध नाही. हि परिस्थिती पाहून आ.डॉ.गुट्टे यांनी गेल्या दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. त्या प्रयत्नास शासनाने सकारात्मक दृष्टीने बघून बसस्थानक बांधकामाचा विषय मार्गी लावावा.‌

तसेच या विषयी पालम येथील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुध्दा केले होते. त्यावेळी शासनाच्या वतीने दिलेले लेखी आश्वासन पाळण्याची गरज आहे, याचा विचार संबंधित मंत्री आणि विभागाने करायला हवा, असाही आग्रह आ.डॉ.गुट्टे यांनी विधानसभेत लावून धरला.

पूर्णा मधील मोडकळीस आलेल्या बसस्थानकातून लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तर पालम येथे बसस्थानकच नसल्याने लोकांची मोठी अडचण होते. लोकांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांचा आश्रय घ्यावा लागतो. बसस्थानक नसलेले पालम हे मराठवाड्यातील बहुदा एकमेव ठिकाण असेल, म्हणून सरकारने यासंबंधी गांभीर्याने विचार करण्याची मागणी आ.डॉ.गुट्टे यांनी केली.

दरम्यान, आ.डॉ.गुट्टे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक नोंद घेतली आहे. त्यामुळे पूर्णा व पालम बसस्थानकाचा विषय मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.